सिटी बेल ∆ रसायनी ∆ राकेश खराडे ∆
गणपती बाप्पा मोरया…पुढच्या वर्षी लवकर या…अशा एक ना अनेक आरोळ्या देत रसायनी पोलीस ठाण्याच्या गणरायाला अनंत चतुर्दशीच्या दुसऱ्या दिवशी वाजत गाजत भावपूर्ण वातावरणात निरोप देण्यात आला.

रसायनी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील मोहोपाडा तलाव, रिस पुल,कांबे गणेश घाट,वावेघर गणेश घाट, तळेगाव वाडी घाट,कासप गणेश घाट येथे दिड दिवस,पाच दिवस,सात दिवस आणि अनंतचतुर्दशीच्या गणेशाचे विसर्जन करण्यासाठी परिसरात चोख पोलीस बंदोबस्त करुन गेले दहा दिवस रसायनी पोलीस सार्वजनिक गणपती व घरगुती गणपती यांच्या सेवेत दिवसरात्र मग्न होते. अनंतचतुर्दशीच्या गणपतींचे विसर्जन झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी रसायनी पोलीस ठाण्याच्या गणपतीची वरिष्ठ पोलिस निरीक्षक कैलास दादाभाई डोंगरे, सहाय्यक पोलिस निरीक्षक गोरक्षनाथ बाळवडकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक मुल्ला , पोलिस उपनिरीक्षक धनाजी काळे, पोलिस उपनिरीक्षक म्हामुणकर, पोलिस उपनिरीक्षक पवार यांच्यासह पोलीस कर्मचा-यांनी मनोभावे पूजन करून आरती केली तर काही पोलिस कर्मचा-यांनी बाप्पाला नवसाचे साकडेही घातले.

यानंतर रसायनी पोलिस ठाण्यातून पाताळगंगा पूल अशी वाजत-गाजत विसर्जन मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत रसायनी पोलिसांनी पिवळ्या रंगाचा कुडता परिधान केला होता तर महिला पोलिसांनी नववारी साडीचा वेश परिधान केला होता. या मिरवणुकीत रसायनी पोलिस कर्मचा-यांनी कुटूंबियांसह बाप्पाला निरोप देताना डिजे व बॅजोच्या तालावर थिरकत बाप्पाची विसर्जन मिरवणूक पाताळगंगा श्री रसेश्वर शिव मंदिरानजीकच्या पाताळगंगेच्या नदी पात्रात गणरायाचे विसर्जन करत बाप्पाला भक्तिभावाने निरोप दिला.








Be First to Comment