सिटी बेल ∆ कर्जत ∆ संजय गायकवाड ∆
कर्जत तालुक्यात आज अनंत चतुर्दशीच्या एकूण 1121 गणरायाना भावपूर्ण निरोप देण्यात आला. भाविकांनी नदी तसेच गावाजवळ असलेल्या तलाव व ओढ्यांमध्ये गणरायाचे विसर्जन करीत बाप्पाला निरोप दिला. यंदाही गणेशोत्सव अत्यंत साधेपणाने साजरा करण्यात आला.
कर्जत तालुक्यातील कर्जत पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सार्वजनिक 9, खाजगी 424. नेरळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खाजगी 663 आणि माथेरान पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खाजगी 25 अशा एकूण 1121 गणेशमूर्तींचे पुढच्या वर्षी लवकर या च्या गजरात आज अनंत चथुर्दशीच्या दिवशी विसर्जन करण्यात आले. नगरपरिषद क्षेत्रात विसर्जन ठिकाणी नगरपरिषदेने नदीत निर्माल्य टाकून पाणी दूषित होऊ नये म्हणून निर्माल्य एकत्र करण्यात येत होते.
कर्जत सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या गणरायाचे विसर्जन वेगळ्या पद्धतीने केले जाते. लोकमान्य टिळक चौकात अभिनव ज्ञान मंदिर प्रशाला, स्वातंत्र्य सैनिक दत्तात्रेय डोंबे विद्या निकेतन, विद्या विकास मंदिर, जनता विद्या मंदिर, शिशु मंदिर या शाळांमधील विद्यार्थ्यांनी लेझीम, कवायत सादर केली. सूत्रसंचालन राजाभाऊ कोठारी यांनी केले. मंडळाचे सचिव मंगेश जोशी यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून विसर्जन मिरवणुकीचा प्रारंभ करण्यात आला.

ही मिरवणूक महावीर पेठ मार्गे जकातनाका – मुख्य बाजारपेठ – कपालेश्वर मंदिर मार्गे गणेश घाटावर नेऊन गणरायाचे भावपूर्ण विसर्जन करण्यात आले. याप्रसंगी मंडळाचे अध्यक्ष आशिष गोखले, अभिजीत मराठे, सदानंद जोशी, निलेश परदेशी, पंकज शहा, रामराव पाटील, गणेश ठोसर, अमित मराठे, बंटी लोवंसी, संदीप भोईर, रोनक कोठारी आदींसह शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते.
अनिरुद्ध उपासना ट्रस्ट च्या कार्यकर्त्यांनी संपूर्ण मिरवणुकीत सहभागी होऊन सहकार्य केले. पोलीस निरीक्षक के. डी. कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस बंदोबस्त चोख होता.
काही विभागातील गणेशमूर्ती एकाच वेळी वाहनांतून उल्हास नदीच्या घाटावर आणून त्यांचे विसर्जन केले. दहिवली, मुद्रे बुद्रुक, मुद्रे खुर्द, आकुर्ले गावातील भाविकांनी आपापल्या गणेश घाटांवर जाऊन गणरायाचे भावपूर्ण वातावरणात विसर्जन केले. गुंडगे आणि भिसेगाव येथील भाविकांनी कर्जत मधील गणेश घाटावर येऊन आपल्या गणेश मूर्तींचे विसर्जन केले. काही गावांमध्ये तलावात गणेश विसर्जन करण्यात आले.








Be First to Comment