सिटी बेल ∆ कर्जत ∆ संजय गायकवाड ∆
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ , कर्जतच्या वतीने गणेशोत्सवात स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून शालेय विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धा व समरगीत सादरीकरणाचे आयोजन कपालेश्वर मंदिराच्या सभागृहात करण्यात आले होते. यावेळी विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवून उस्फुर्त प्रतिसाद दिला.
या स्पर्धांमध्ये शारदा मंदिर मराठी माध्यम, इंग्लिश मिडीयम स्कुल, स्वातंत्र्य सैनिक दत्तात्रेय डोंबे विद्या निकेतन, अभिनव ज्ञान मंदिर, शिशु मंदिर, विद्या विकास मंदिर, शारदा मंदिर इंग्लिश मिडीयम स्कुल, गुड शेफर्ड कॉन्व्हेंट स्कुल या शाळांनी भाग घेतला होता.

पारितोषिक वितरण समारंभ नगराध्यक्ष सुवर्णा जोशी यांच्या हस्ते आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी माजी नगरसेवक भालचंद्र जोशी, जेष्ठ पत्रकार विजय मांडे, संतोष पेरणे, मंडळाचे अध्यक्ष आशिष गोखले व्यासपीठावर उपस्थित होते. समरगीत सादरीकरण करणाऱ्या शाळांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले तर चित्रकला स्पर्धेत यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह व रोख पारितोषिके देऊन सन्मानित करण्यात आले.
याप्रसंगी नगराध्यक्ष जोशी यांनी ‘कर्जतचे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ गेली 85 वर्षे येथील नागरिकांच्या तसेच ग्रामीण भागातील ग्रामस्थांच्या मदती साठी सदैव तत्पर असते. हे मंडळ कर्जतकरांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी विविध उपक्रम राबवत असते. तसेच विद्यार्थ्यांना व्यासपीठ उपलब्ध व्हावे यासाठी प्रयत्नशील असते.’ असे स्पष्ट केले. भालचंद्र जोशी, मांडे व पेरणे यांनीही आपले विचार व्यक्त केले. सूत्रसंचालन राजाभाऊ कोठारी यांनी केले. याप्रसंगी अभिजीत मराठे, सदानंद जोशी, निलेश परदेशी, पंकज शहा, गणेश ठोसर, अमित मराठे, बंटी लोवंसी आदींसह शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते.

चित्रकला स्पर्धा निकाल :
पहिला गट : पाचवी वी ते सातवी
प्रथम – कु. अपर्णा कांबळे ( गुड शेफर्ड कॉन्व्हेंट स्कुल ), द्वितीय – कु. मेहनुर शेख ( विद्या विकास मंदिर ), तृतीय – कु. वेदांत हरपुडे ( अभिनव ज्ञान मंदिर ), उत्तेजनार्थ – कु. इशिका लोवंसी.
दुसरा गट : आठवी ते दहावी
प्रथम – कु. प्रथमेश लाड ( कर्जत इंग्लिश मिडीयम स्कुल ), द्वितीय – कु. तृप्ती हंकारे ( गुड शेफर्ड कॉन्व्हेंट स्कुल ), तृतीय – कु. प्राची घोलप ( कर्जत इंग्लिश मिडीयम स्कुल ), उत्तेजनार्थ – कु. यश पाटणकर ( स्वातंत्र्य सैनिक दत्तात्रेय डोंबे विद्या निकेतन )








Be First to Comment