सिटी बेल ∆ उरण ∆ विठ्ठल ममताबादे ∆
किमान पेन्शन दरमहा रुपये ९०००/- द्या व पेन्शनला महागाई भत्ता लागू करा. अंतरीम वाढ म्हणून कोशीयारी समितीच्या शिफारशी लागू करा.उच्च वेतनावर, वेतनानुसार पेन्शन लागू करा. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना आरोग्य सुविधा लागू करा.या विविध मागण्यासाठी ईपीएस ९५ पेन्शन धारकांच्या न्याय्य हक्काकरीता संघर्ष करणाऱ्या विविध संघटनांनी एकत्रित येवून पेन्शनर्स एकता संघर्ष मंचाची स्थापना केली आहे व पुढील लढा एकत्रित करण्याचा निर्णय घेतला आहे.त्या अनुषंगाने पेन्शन धारकांना न्याय मिळवून देण्याच्या उद्देशाने पेन्शनर्स एकता संघर्ष मंचच्या माध्यमातून २५ ऑगस्ट २०२२ रोजी संपूर्ण भारतात विभागीय भविष्य निधी कार्यालया समोर एकाच वेळी निदर्शने करण्यात येणार आहे.
पंतप्रधान मा. मोदी यांच्या सरकारने २०१४ च्या निवडणूकपूर्वी दिलेल्या आश्वासनांचा भंग करून ६७ लाख ईपीएस ९५ पेन्शनर्सचा एक प्रकारे विश्वासघात केला आहे. संपूर्ण आयुष्य सरकारी-निमसरकारी, सहकार तसेच खाजगी उद्योगात कर्मचारी राबले म्हणूनच देशाचा विकास झाला. देशाची उभारणी करण्यात पुढाकार घेणाऱ्या १८६ उद्योगातील सुमारे ६७ लाख पेन्शनर्सना वृद्धापकाळात वाढत्या महागाईच्या काळात अत्यंत तुटपुंज्या पेन्शन मध्ये जगावं लागते व त्यांना आंदोलने करावी लागतात हे मोठे दुर्दैव आहे. पेन्शन वाढीकरीता पैसा नाही असे कारण मोदी सरकार देते. परंतू देशी-विदेशी कॉर्पोरेट्स-भांडवलदारांना लाखो कोटी रूपये करात सूट दिली जाते. मात्र सर्व सामान्य माणसावर कर वाढवले जातात. आता सहनशक्तीचा अंत झाला आहे.तीव्र आंदोलना शिवाय पर्याय उरलेला नाही व त्याचाच एक भाग म्हणून २५ ऑगस्ट २०२२ रोजी देशभरातील सर्व विभागीय भविष्य निधी कार्यालयावर निदर्शन आंदोलने केली जाणार आहेत व मा. पंतप्रधान मोदीजी यांना पेन्शनवाढी बाबत निवेदन दिले जाणार आहे.अशी माहिती निवृत्त कर्मचारी (1995) समन्वय समिती राष्ट्रीय संघटना नई दिल्ली या संघटनेचे महाराष्ट्र उपाध्यक्ष रमेश ठाकूर यांनी दिली आहे.
पेन्शनवाढीच्या मागणीची पूर्तता लवकरच झाली नाही तर तीव्र लढ्याचा इशाराही सदर संघटनेच्या माध्यमातून देण्यात आला आहे. ईपीएस ९५ पेन्शनरांनी सन्मानाने जीवन जगण्याच्या अधिकाराच्या या निदर्शन आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन निवृत्त कर्मचारी (1995) समन्वय समिती राष्ट्रीय संघटना नई दिल्ली या संघटनेचे महाराष्ट्र उपाध्यक्ष रमेश ठाकूर यांनी केले आहे.या लढ्यात पेन्शनर्स एकता संघर्ष मंच चे सर्व पदाधिकारी,ऑल इंडिया को-ऑर्डिनेशन कमिटी ऑफ ईपीएफ पेन्शनर्स असोसिएशन,निवृत्त कर्मचारी १९९५ समन्वय समिती, ऑल इंडिया ईपीएफ पेन्शनर्स फेडरेशन, राज्य परिवहन निवृत्त कर्मचारी संघटना (ST), महाराष्ट्र राज्य पेन्शनर्स संघटना सहभागी होणार आहेत.देशातील सर्व पेन्शनरांनी यामध्ये सहभाग घ्यावा असेहि आवाहन पेन्शनर्स एकता संघर्ष मंच तर्फे करण्यात आला आहे.
Be First to Comment