सिटी बेल ∆ पनवेल ∆ वार्ताहर ∆
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाने पनवेल तालुक्यामध्ये पक्षाच्या मोर्चेबांधणीचे काम हाती घेतले असून अनेक दिवसांपासून पनवेलमध्ये शिवसेना शिंदे गटाचे शिलेदार कोण याचीच चर्चा रंगली होती. या चर्चेला सोमवारी पुर्णविराम देत शिंदे गटाचे राज्याचे सचिव संजय मोरे यांनी राज्याचे मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते मुंबई येथील रत्नसिंधू बंगल्यावर पनवेल व उरण जिल्ह्याच्या मुख्य पदाधिका-यांना पदाचे लेखी पत्र देऊन मोर्चेबांधणीचे काम सूरु केले.
यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कट्टर समर्थक रामदास शेवाळे यांना पक्षाने पनवेल जिल्ह्याचा संपर्क नेता म्हणून पद दिले आहे. संपर्क नेत्याची जबाबदारी ही स्थानिक पनवेलमधील विविध घडामोडीवर भूमिका मांडण्यापासून ते स्थानिक पातळीवरील राजकीय व सामाजिक घटनांची माहिती थेट पक्षप्रमुखांपर्यंत पोहचविणे तसेच पक्षबांधणीसाठी नवीन जबाबदारींचे वाटप करणे अशी विविध कामांची जबाबदारी शेवाळे यांच्यावर सचिव मोरे यांनी सोपविली आहे.
रामदास शेवाळे यांच्यासोबत पनवेलच्या महानगपालिका क्षेत्रासाठी अँड. प्रथमेश सोमण यांना पदभार पक्षाने सोपविला आहे. रुपेश ठोंबरे यांच्याकडे पक्षाने तालुका प्रमुख ही जबाबदारी दिली असून शिवसेनेतून नूकतेच शिंदे गटात सामिल झालेले माजी रायगड जिल्हा परिषद सदस्य परेश पाटील यांना पनवेलच्या ग्रामीण परिसरासाठी उपजिल्हा प्रमुख नेमण्यात आले आहे. ग्रामीण पनवेलची जबाबदारी परेश पाटील यांना देण्यात आली आहे.
मुंबई येथील पद वाटप करण्याच्या कार्यक्रमावेळी मावळचे खासदार श्रीरंग बारणे, शिवसेनेचे शिंदे गटाचे सचिव संजय मोरे, आमदार महेंद्र थोरवे हे उपस्थितीत होते.
Be First to Comment