Press "Enter" to skip to content

ऐन हंगामात कुंडलिका नदीवरील राफ्टिंगवर बंदी

पर्यटकांची पर्यटनस्थळांकडे पाठ, स्थानिक व्यवसाईकांवर ओढवले संकट, कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न गंभीर

रिव्हर राफ्टिंग व्यवसायावर आधारित लहान मोठे व्यवसाय ठप्प, स्थानिकांवर उपासमारीचे संकट

राफ्टिंग सुरू करा : अन्यथा जनआंदोलनाचा स्थानिकांचा इशारा

सिटी बेल ∆ रायगड़ ∆ धम्मशील सावंत ∆

महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील कोलाड इथली वर्षाचे 12 ही महिने चालणारी कुंडलिका नदीवरील राफ्टिंग जगप्रसिद्ध आहे. 2003 साली निसर्गाच्या सानिध्यातील , नदीच्या खळखळणाऱ्या निथळ पाण्यावर सुरू झालेली सर्वात सुरक्षित राफ्टिंग पर्यटकांसाठी खास आकर्षण व पर्वणी ठरतेय. रिव्हर राफ्टिंगचा साहसी खेळ व थरार अनुभवण्यासाठी हजारो पर्यटक इथं दैनंदिन येतात. मौजमस्ती करतात, सुट्टीच्या दिवसात तर इथल्या व्यवसायांना दुपटीने उभारी मिळते. पर्यटनावर आधारित रोजगाराला यातून चालना मिळते, मात्र आजमितीस ऐन हंगामात येथील राफ्टिंगवर बंदी घालण्यात आलीय. काही मोजक्या लोकांच्या आडमुठे धोरणामुळे राफ्टिंग व्यवसाय बंद पडलाय. शासनाची ई निविदा प्रक्रिया पूर्ण करून कोलाड रिव्हर राफ्टिंग एल एल पी यांना ठेका मिळाला असूनही काम करू दिले जात नाहीये, या ना त्या कारणाने अडवणूक केली जातेय. हे कुठं तरी थांबले पाहिजे, अशी मागणी कोलाड रिव्हर राफ्टिंग एल एल पी चे ठेकेदार आकाश चौधरी व राकेश शिंदे यांनी केलीय. साजे रवाळजे व कामत याठिकाणी राफ्टिंग चालते, नजीकच्या 6 गावातील ग्रामस्थ, तरुण याच रिव्हर
राफ्टिंग व्यवसायावर अवलंबून आहेत. या व्यवसायावर निर्भर असणारा प्रत्येक घटक आज उपासमारीच्या खाईत लोटला गेलाय. पर्यटकांचे खास आकर्षण हे राफ्टिंग असून राफ्टिंगवरच बंदी असल्याने नाराज झालेल्या पर्यटकांनी रिव्हर राफ्टिंगक्षेत्र व नजीकच्या पर्यटनस्थळांकडे अक्षरश: पाठ फिरवलीय, राफ्टिंग बंद असल्याने एकूणच पर्यटकांची संख्या रोडावलीय, तर स्थानिक व्यवसाईकांवर देखील उपासमारीचे संकट ओढवलेय , पर्यटनावर आधारित रोजगाराच्या संधी ठप्प झाल्यात.

रिव्हर राफ्टिंग व्यवसायावर आधारित लहान मोठे व्यवसाय डबघाईला आलेत. स्थानिकांवर उपासमारीचे संकट ओढवलेय, कोव्हिडं महामारीत कर्जबाजारी झालेले व्यवसायिक आता रोजगारावर गदा आल्याने चिंतातुर झालेत. रिक्षाचालक, मिनिडोअर चालक, हॉटेल व रिसॉर्ट मधील कामगार, गाईड यांचा दैनंदिन रोजगार बुडतोय, सनासुदीच्या दिवसात मुलांना कपडे घ्यायचीही ऐपत राहिली नसल्याची कैफियत इथल्या स्थानिक व्यवसाईकांनी मांडलिय. रिक्षाचे हप्ते, राफ्टिंग साहित्य खरेदीसाठी खरेदीसाठी घेतलेले कर्ज फेडावे कसे असा प्रश्न अनेकांना सतावतोय, पर्यटक आलेच नाहीत तर कुणाच्याही हाताला काम नाही, तर र कमाई नसल्याने कुटुंबाचे पालन पोषण, मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न गंभीर झालाय. राफ्टिंग सुरू झाली नाही तर आत्महत्या करण्याची वेळ येईल अशी चिंता राफ्टिंग क्षेत्रातील लहान मोठ्या व्यवसाईकांनी व्यक्त केलीय.

प्रशासनाने यशस्वी मध्यस्थी करून रिव्हर राफ्टिंगवरील बंदी उठवा, राफ्टिंग व्यवसाय जलद सुरू करा, कुंडलिकेचे समृद्ध पर्यटन पुन्हा एकदा बहरुद्या, आम्हाला पुन्हा रोजगार मिळुद्या अशी मागणी स्थानिक करतायेत. राफ्टिंग बंद झाल्यामुळे येथील लहान मोठे हॉटेल, टपऱ्या, दुकाने , रिसॉर्ट व्यवसायावर गंभीर परिणाम झालाय. इथले रोजगार व व्यवसाय बंद झालेत, अशा परिस्थितीत आम्ही खायचे काय, जगावे कसे , कुटुंबाचा उदरनिर्वाह कसे करावे असा सवाल येथील स्थानिक व्यवसायिकांनी उपस्थित केलाय. राफ्टिंग व्यवसाय सुरू करून स्थानिकांच्या रोजगाराचा प्रश्न सोडवा , अन्यथा व्यापक स्वरूपाचे जनआंदोलन छेडू असा इशारा साजे , रवाळजे विभागातील स्थानिक ग्रामस्थ व व्यवसाईक व राफ्टिंग ठेकेदारांनी प्रशासनाला दिलाय.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.