सिटी बेल ∆ कर्जत ∆ संजय गायकवाड ∆
अभिनव प्रबोधिनी ट्रस्ट च्या शारदा मंदिर विद्यालय क्रांती दिनाचे औचित्य साधून स्वातंत्र्य सैनिक आणि निवृत्त सैनिकांचा सन्मान करण्यात आला. यावेळी त्यांनी सांगितलेले अनुभव ऐकताना उपस्थितांचे डोळे पाणावले.
विद्यालयाच्या सभागृहात क्रांती दिन समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. स्वातंत्र्य सैनिक महादेव जुन्नरकर यांच्या हस्ते हुतात्मा भाई कोतवाल व हुतात्मा हिराजी पाटील यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. निवृत्त सैनिक प्रकाश महाडिक यांच्या हस्ते क्रांती ज्योत प्रज्वलित करण्यात आली. याप्रसंगी संस्थेचे कार्याध्यक्ष गणेश वैद्य, निवृत्त सैनिक मनोहर कदम, रमाकांत मोदी, श्रीकांत ओक, रवींद्र खराडे व्यासपीठावर उपस्थित होते. मुख्याध्यापिका अंजली किसवे व छाया नगरकर यांनी उपस्थितांचे स्वागत केले.
गणेश वैद्य यांच्या हस्ते स्वातंत्र्य सैनिक व निवृत्त सैनिकांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी रमाकांत मोदी यांनी सैन्यात असताना आलेले अनुभव सांगितले. प्रकाश महाडिक यांनी ‘आपला एक पाय युद्धात गमावला असला तरी देशा बद्दलचा आदर किंचितही कमी झाला नाही. उलट युवकांनी सैन्यात दाखल व्हावे.’ असे आवाहन केले. त्यांनी अनुभव सांगताना त्यावेळचे प्रत्यक्ष चित्र उभे केले. हे ऐकताना उपस्थितांचे डोळे पाणावले. महादेव जुन्नरकर यांनी, ‘विद्यार्थ्यांनी मोठ्यांचा आदर केला पाहिजे. त्यांचा अपमान होईल असे कृत्य करू नये. बाहेर पडताना आई – वडिलांना नमस्कार करून निघा. तुम्हाला काही कमी पडणार नाही. वैद्य यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन प्रफुल्ल देशमुख यांनी केले.
सुरुवातीला विद्यार्थिनींच्या लेझीम पथकाने मान्यवरांचे स्वागत केले. त्यांनतर स्वातंत्र्याचा 75 वा वाढदिवसाच्या पार्श्वभूमीवर उपस्थित पाहुण्यांचा हस्ते 75 दीप प्रज्वलित केले. यावेळी शिक्षक, पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.








Be First to Comment