सिटी बेल ∆ रसायनी ∆ राकेश खराडे ∆
सार्वजनिक उपक्रमांच्या वित्त विभागीय मंत्रालयाद्वारे आलेल्या हिल (इं) लि. च्या दोन युनिट बंदबाबत आणि रसायनी युनिट निर्गुंतवणूक संबंधित प्रदर्शित झालेल्या पत्रकाच्या अनुषंगाने हिल (इं) लि. कंपनीच्या पुढील वाटचालीस सेव्ह हिल जॉईन्ट युनियन कौन्सिल च्या पदाधिकाऱ्यांनी केंद्रीय मंत्री मनसूख मांडवीया यांची भेट घेतली.
यावेळी कामगारांना कंपनीकडून येणाऱ्या थकीत रक्कमेसाठी आर्थिक निधी मिळवून देण्याची मागणी करत विविध प्रश्न मांडले असता केंद्रीय मंत्री मनसूख मांडवीया यांनी कंपनी संबंधी त्रिस्तरीय कमिटी स्थापन करून पुढील प्रक्रिया केली जाणार असल्याचे सांगितले.
रसायनी कामगार सेनेचे अध्यक्ष तथा केंद्रीय मंत्री आणि खासदार आनंदराव अडसूळ यांच्या मार्गदर्शनानुसार व मावळ मतदार संघाचे खासदार श्रीरंग (आप्पा) बारणे यांच्या महत्वपूर्ण सहकार्याने हिल (इं) लिमिटेड च्या प्रलंबित विषयासंबंधी केमिकल फर्टीलायझर तथा आरोग्य मंत्री मनसूख मांडवीया यांच्यासोबत चर्चा करण्यात आली. यावेळी चर्चा करताना मांडवीया यांनी कंपनीसंबंधी त्रिस्तरीय कमिटी स्थापन करून पुढील प्रक्रिया केली जाणार असल्याचे सांगितले.
नवी दिल्ली, येथे कंपनीच्या प्रलंबित विषयासंबंधी केमिकल फर्टीलायझर तथा आरोग्य मंत्री मनसूख मांडवीया यांना भेट दिल्यानंतर केमिकल आणि पेट्रोकेमिकल विभागाचे जॉईंट सेक्रेटरी सुशांत कुमार पुरोहित यांसोबत भेट घेऊन कंपनीच्या विषयांवर चर्चा करण्यात आली.
यावेळी सेव्ह हिल जॉईंट युनियन कौन्सिलचे सर्व पदाधिकारी, हिल (इं) लि. चे डायरेक्टर मॅनेजर – शशांक चतुर्वेदि, डायरेक्टर फायनान्स – डी एन व्ही श्रीनिवासा राजु, जी. एम- एच/आर सुनील गोर आदींना एकत्रित घेऊन पुरोहित यांच्या दालनात चर्चा करण्यात आली. यावेळी उपस्थित युनियन कौन्सिलने, कंपनीबाबत सकारात्मक विचारांनी चर्चा केली असल्याने जॉईंट सेक्रेटरी यांनी पदाधिकाऱ्यांचे आभार मानले. तसेच आर्थिक निधी मिळवून देण्यासाठी आम्ही सुद्धा कंपनी मॅनेजमेंट सोबत जिकिरीने प्रयत्न करत असल्याचे त्यांनी सांगितले.
तसेच डेप्युटी जॉईंट सेक्रेटरी नवले यांनी सुद्धा कंपनीच्या सुधारित वाटचालीसाठी आम्ही कंपनीच्या सोबत असल्याचे सांगितले आहे.
तसेच मंत्री यांच्या दालनात असलेल्या खासदार उदयनराजे भोसले तसेच महाराष्ट्र भवन येथे उपस्थित असलेल्या मराठी अभिनेत्री आणि शिवसेनेचे महिला नेत्या दीपाली सय्यद यांनी देखील सर्व पदाधिकाऱ्यांना कंपनीच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. या सर्व प्रवासासाठी खासदार श्रीरंग आप्पा बारणे आणि एच.आय.एल रसायनी कामगार सेना युनियनचे अध्यक्ष तथा केंद्रीय मंत्री आनंदराव अडसूळ यांच्या पाठपुराव्याने या बैठका पार पडल्याने सेव्ह हिल जॉईंट युनियन कौन्सिलच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी त्यांचे आभार मानले आहे. तसेच या दरम्यान मनसूख मांडवीया यांनी घेण्यात आलेल्या निर्णयानंतर सेव्ह हिल जॉईंट युनियन कौन्सिल चे पदाधिकारी आता पुढील प्रक्रियेच्या प्रतीक्षेत आहेत.
Be First to Comment