सिटी बेल ∆ कर्जत ∆ संजय गायकवाड ∆
शिवसेनेमध्ये बंडखोरी झाल्यानंतर शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी काही पदाधिकाऱ्यांच्या उचलबंगड्या केल्या तर काही पदाधिका-यांच्या नव्याने नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. माथेरान शहर प्रमुखपदी प्रसाद विश्वनाथ सावंत यांची नियुक्ती करण्यात आली असून गेली अनेक वर्षे हे पद सांभाळणाऱ्या चंद्रकांत चौधरी यांना या पदावरून हटविण्यात आले आहे.
शिवसेनेतून बंडखोरी करून शिंदे गट बाजूला झाला त्यावेळी एका सोशल मीडियावरील पोस्ट मुळे माथेरान मधील शिवसैनिकांमध्ये वादा वादी झाली होती. त्यानंतर कर्जतमध्ये दुपारच्या वेळेस प्रसाद सावंत यांची गाडी अडवून त्यांना दहा – बारा जणांनी मारहाण केली होती. या मारहाणीत त्यांची गाडी फोडली होती तसेच सावंत जखमी झाले होते. त्यावरूनही उलट सुलट चर्चा ऐकायला मिळत होत्या. त्यांच्यावर नवी मुंबईत उपचार होत असतानाच कर्जतमध्ये एकनिष्ठ शिवसैनिकांची बैठक आयोजित केली होती. त्यावेळी युवा सेनेचे आदित्य ठाकरे यांनी बैठकीपूर्वी नवी मुंबईत हॉस्पिटलमध्ये जाऊन सावंत यांची भेट घेऊन त्यांच्या तब्बेतीची विचारपूस केली होती.
शिवसेनेत फूट पडण्याआधी सुमारे अठरा ते वीस वर्षे शहरप्रमुखपद चंद्रकांत चौधरी यांच्याकडे होते. मात्र आता नगरपरिषद निवडणुकीच्या तोंडावर पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशावरून त्या पदावरून चौधरी यांना हटवून प्रसाद सावंत यांनी नियुक्ती करण्यात आल्याने माथेरान मधील एकनिष्ठ शिवसैनिकांमध्ये उत्साहाचे वातावरण पसरले आहे.
Be First to Comment