“सुजलाम सुफलाम वंदे मातरम” या थीम वर केले सादरीकरण
पनवेल / प्रतिनिधी
जनता केंद्रित सामाजिक उपक्रम राबविण्यासाठी सुपरिचित असणाऱ्या पनवेलच्या गार्गीज ग्रुपने शोभायात्रेस एक वेगळीच झळाळी प्राप्त करून दिली. सुजलाम सुफलाम वंदे मातरम! अशी थीम घेत गार्गीज ग्रुपने शोभा यात्रेच्या माध्यमातून सामाजिक संदेश देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. त्यांच्या या भावस्पर्शी सादरीकरणाने पनवेलकरांची मने जिंकली.
वंदे मातरम या स्फूर्ती गीताच्या रचनेला दीडशे वर्ष पूर्ण झाल्याबद्दल पनवेल मधून निघालेल्या शोभायात्रेमध्ये वंदे मातरम् या कॉमन थीम वर सहभागी समूहांना सादरीकरण करावयाचे होते.गार्गीज ग्रुपने वंदे मातरम मधील प्रत्येक शब्दाचा अर्थ विशद करून सांगणारे सादरीकरण केले तसेच आपल्या भारत देशाला सुजलाम सुफलाम ठेवण्यासाठी ज्या नवदुर्गांचा आशीर्वाद प्राप्त झाला आहे अशा स्त्री शक्तींचे वेशभूषेच्या माध्यमातून उत्तम सादरीकरण शोभा यात्रेत करण्यात आले. विशेष उल्लेखनीय म्हणजे यावेळी पारंपारिक देवतांच्या सादरीकरणाला आधुनिकतेची कल्पक जोड देण्यात आली होती. स्त्री शक्तीचे प्रतीक झालेल्या देवता दुचाकी वाहनांवर आरूढ झाल्या होत्या. इतकेच नव्हे तर दुचाकी वाहनांना देवींच्या वैशिष्ट्यांनी सजविण्यात आले होते. दुचाकी वाहनांच्या पाठीमागे फलकांवर जनसंदेश देखील लिहिण्यात आले होते.
गार्गीज ग्रुपने सादर केलेल्या सुजलाम सुफलाम वंदे मातरम मध्ये ग्रुपच्या प्रेसिडेंट कविता ठाकूर यांनी अन्नपूर्णा माता साकारली होती तर गौरी धात्रक यांनी गंगा मातेची वेशभूषा साकारली. रश्मी माणिकपूर भारत माता झाल्या होत्या तर भूमातेची भूमिका प्रेरणा गायकवाड यांनी उत्तमरीत्या साकारली. महाराष्ट्राच्या साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असणारी तुळजापूरची भवानी माता अनिता डोंगरे यांनी साकारली होती तर मनीषा वाणी यांनी लक्ष्मी मातेचे रूप साकारले. आशा गनिगा यांनी कालिका देवीची वेशभूषा साकारली तर तन्वी गायकवाड या विद्येची देवता सरस्वती माता झाल्या होत्या. वैशाली अंबवडे यांनी संतोषी मातेचे प्रतिरूप सुंदररित्या साकारले होते. तिच्यातला तो आणि त्याच्यातली ती यांचे प्रतीक असणारी अर्धनारी नटेश्वर वेशभूष स्मिता झेमसे यांनी सुंदर रित्या सादर केली.लक्ष्मी साळवे यांनी वंदे मातरम या गीतातील प्रत्येक शब्दाचे महत्त्व विशद करणारे सादरीकरण केले तर पूर्वा वैद्य यांनी वंदे मातरम या गीताची महती उपस्थितांना विशद केल.
गार्गीज ग्रुप संस्थापिका रश्मी मोरे यांनी ही अनोखी संकल्पना साकारली होती ज्यात अध्यात्मिक सांस्कृतिक आणि पारंपारिक वारशास राष्ट्रप्रेम आणि मानव कल्याणाची जोड देण्यात आली होती. आमच्या प्रतिनिधीशी बोलताना त्यांनी सांगितले की पनवेल तसेच नवीन पनवेल शाखेतील २५ ते ३० सदस्या शोभायात्रेत सहभागी झाल्या होत्या. हिंदू नववर्ष शोभा यात्रेच्या किमान १५ ते २० दिवस अगोदर सर्व सदस्य सादरीकरण करता अथक परिश्रम घेत होत्या. अलंकार, वस्त्र, मुकुट, फलकांवरची माहिती, दुचाकी सजविण्याकरता लागणारे साहित्य यांची निवड करताना अत्यंत सखोल अध्ययन केले गेले. सध्या परीक्षांचा हंगाम सुरू आहे त्यामुळे कित्येक सदस्य भगिनींना इच्छा असून देखील सहभागी होता आले नाही. कित्येक सदस्यांनी घरातील मुलांच्या परीक्षा असून देखील शोभायात्रेत त्यांचे योगदान दिले.
प्रेसिडेंट कविता ठाकूर म्हणाल्या की नवदुर्गा आणि स्त्री शक्ती यांच्या माध्यमातून वंदे मातरमचे महत्व सांगत असतानाच आम्ही सामाजिक संदेश देण्याचा देखील प्रयत्न केला. अन्नधान्याची नासाडी करू नका, विजेचा अपव्य टाळा, नद्या आणि तलाव दूषित करू नका यासारखे सामाजिक संदेश देण्याचा आम्ही प्रामाणिक प्रयत्न केला.






Be First to Comment