
पनवेल मध्ये गुढीपाडव्याची भव्य शोभायात्रा ; ‘वंदे मातरम्’ १५० वर्षे थीमने रंगला नववर्ष स्वागत सोहळा
पनवेल (प्रतिनिधी) पनवेल शहरात गुढीपाडव्याच्या निमित्ताने निघालेल्या भव्य शोभायात्रेत यंदा उत्साह, ऊर्जा आणि सांस्कृतिक वैभवाचा अक्षरशः महासागर उसळवला. मराठी नववर्षाचे जल्लोषात स्वागत करत संपूर्ण शहर भगव्या रंगात न्हाऊन निघाले होते. नववर्ष स्वागत समिती पनवेल यांच्या वतीने आयोजित या शोभायात्रेने ‘भव्यतेचा नवा उच्चांक’ गाठला.
या दिमाखदार शोभायात्रेला शहरातील आद्यक्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह येथून उत्साहात सुरुवात झाली. त्यानंतर ही मिरवणूक कर्मवीर भाऊराव पाटील चौक, टपाल नाका शनी मंदिर , महात्मा गांधी मार्ग, मिरची गल्ली, कापड बाजार, जय भारत नाका आणि लोकमान्य टिळक मार्ग या प्रमुख मार्गांवरून जल्लोषात मार्गक्रमण करत स्वातंत्र्यवीर सावरकर चौक येथे भव्य समारोपास पोहोचली.


टिळक रोड, यशोमंगल नाका आणि सावरकर चौक परिसरात नववर्ष स्वागत समिती पनवेल आणि श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ यांच्या उभारलेली आकर्षक सजावट, रोषणाई आणि भगव्या पताकांनी सजलेले रस्ते पाहताना प्रत्येकाच्या डोळ्यांचे पारणे फिटत होते. ढोल-ताशांचा कडकडाट, लेझीमचा थरारक ताल, पारंपरिक वेशभूषेत सजलेले युवक-युवती आणि ‘जय भवानी, जय शिवाजी’च्या घोषणांनी वातावरण अक्षरशः दणाणून गेले.
यंदाच्या शोभायात्रेचे सर्वात मोठे आकर्षण ठरली ‘वंदे मातरम्’ या राष्ट्रगीताच्या १५० वर्षांच्या गौरवाची भव्य थीम. देशभक्तीने भारलेले चित्ररथ, जिवंत देखावे आणि प्रभावी सादरीकरणांनी उपस्थितांच्या अंगावर रोमांच उभे केले. स्वातंत्र्य, संस्कृती आणि राष्ट्रीय अभिमान यांचा संगम या मिरवणुकीत ठळकपणे अनुभवायला मिळाला.
परिसरातील तब्बल १४ संस्थांचे भव्य आणि आकर्षक चित्ररथ या शोभायात्रेत सहभागी झाले होते. प्रत्येक चित्ररथाने आपल्या कलात्मकतेने आणि संदेशाने प्रेक्षकांची मने जिंकली. तसेच युवानाद ट्रस्ट तर्फे ध्वज–लेझीम–ढोल पथकात सुमारे १५० मुलांनी सहभाग घेत पारंपरिक सादरीकरणाने वातावरण भारून टाकले.


या दिमाखदार सोहळ्यात भाजपचे महाराष्ट्र प्रदेश चिटणीस आमदार प्रशांत ठाकूर, पनवेल महानगरपालिकेचे महापौर नितीन पाटील, भाजप उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, युवा नेते प्रीतम म्हात्रे, ज्येष्ठ नेते जयंत पगडे, जिल्हा सरचिटणीस चारुशीला घरत, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शिवदास कांबळे, महीला व बालकल्याण सभापती ममता म्हात्रे, नगरसेवक अजय बहिरा, राजू सोनी, सुमित झुंजारराव, नगरसेविका रुचिता लोंढे, प्रीती जॉर्ज, शिवानी घरत, अभिषेक पटवर्धन, केदार भगत, अमित ओझे, रुपेश नागवेकर, माधुरी गोसावी यांच्यासह तसेच नगरसेवक आणि विविध पक्षांचे मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उत्साह, परंपरा, संस्कृती आणि देशभक्तीचा संगम साधणारी पनवेलची ही शोभायात्रा ‘भव्य, दिव्य आणि अविस्मरणीय’ ठरली आणि नववर्षाच्या स्वागताला या शोभायात्रेने खऱ्या अर्थाने ऐतिहासिक उंचीवर नेऊन ठेवले.




Be First to Comment