Press "Enter" to skip to content

उरणच्या रणरागिणीचा राष्ट्रस्तरीय गौरव

अनू पाटील यांना मानाचा’ सिंधुताई सपकाळ नारीशक्ती पुरस्कार’ प्रदान !

तृप्ती भोईर : उरण

“प्रसिद्धी, संपत्ती आणि स्वार्थ यापेक्षा राष्ट्रप्रेम आणि निष्ठेचा कृतिशील संदेश समाजाला देणे, हाच खरा धर्म आहे,” हा विचार कृतीत आणणाऱ्या उरणमधील मुळेखंड येथील ज्येष्ठ समाजसेविका सौ. अनु सुभाष पाटील यांना सामाजिक क्षेत्रातील त्यांच्या अतुलनीय योगदानाबद्दल ‘सिंधुताई सपकाळ नारीशक्ती गौरव पुरस्कार २०२६’ देऊन सन्मानित करण्यात आले आहे.

१५ मार्च रोजी कला साधना सामाजिक संस्था, नवी मुंबई यांच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित एका दिमाखदार सोहळ्यात हा गौरव करण्यात आला.

अनु पाटील यांचा प्रवास म्हणजे २००७ मध्ये BYF या संस्थेच्या माध्यमातून सुरू झाला. २०१४ पर्यंत उरण परिसरातील महिला बचत गटांच्या समन्वयक म्हणून त्यांनी पायाभूत काम केले. त्यानंतर २०२० पासून ‘आई माऊली ग्राम संघ’ चाणजे आणि ‘सागर किनारा प्रभाग’ (उरण पश्चिम विभाग) अंतर्गत २५० महिला बचत गटांच्या अध्यक्षा म्हणून त्या कार्यरत आहेत. केवळ कागदोपत्री गट न चालवता, महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी करण्यासाठी त्यांनी जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायतीच्या शासकीय योजना घराघरांत पोहोचवल्या आहेत.

कला साधना संस्थेने अनु पाटील यांच्या कार्याचा गौरव करताना विशेष नमूद केले की, देशाचे स्वातंत्र्य, समता, बंधुता, धर्मनिरपेक्षता आणि एकात्मता टिकवण्यासाठी त्या सातत्याने झटत आहेत. एक स्वावलंबी समाज घडवण्यासाठी त्यांनी केलेले सामाजिक कार्य हे खरोखरच ‘निष्काम कर्मयोगाचा’ उत्तम आदर्श आहे. महिलांना केवळ बचत गटा पुरते मर्यादित न ठेवता त्यांच्या आरोग्यासाठी शिबिर आणि स्वयंरोजगारासाठी विविध उपक्रम राबवून त्यांनी महिलांच्या जीवनाला नवी दिशा दिली आहे.

महिलांच्या अडीअडचणीत ढाल बनवून उभ्या राहणाऱ्या अनुताई पाटील यांच्या कार्याची दखल यापूर्वी महाराष्ट्र शासनाने अहिल्याबाई होळकर पुरस्कार देऊन घेतली आहे तसेच कलश इंटरटेनमेंट चा नारी सन्मान पुरस्कारही त्यांच्या खाती जमा आहे आता माईंच्या सिंधुताई सपकाळ यांच्या नावाने मिळालेला हा पुरस्कार त्यांच्या ध्येयनिष्ठ आणि प्रामाणिकपणाची पोचपावती ठरली आहे.

हा पुरस्कार स्वीकारताना अनु पाटील यांच्या डोळ्यात कृतज्ञ चे भाव होते “हा एक केवळ सन्मान नसून हजारो माता भगिनींनी त्यांच्यावर टाकलेला विश्वास आहे, पुरस्कार मिळणे ही जबाबदारीची जाणीव आहे ,समाजातील शेवटच्या घटकातील महिलेच्या डोळ्यातील अश्रू पुसण्यासाठी आणि तिला स्वाभिमानी आयुष्य जगण्याचे बळ देण्यासाठी त्या हे सेवेचे कार्य यापुढेही तितक्यात तन्मयतेने आणि मायेने अखंड चालू ठेवणार आहेत.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.