Press "Enter" to skip to content

निष्कर्ष जुलै महिन्यात प्रकाशित होणार

मुलांमध्ये पर्यावरणाविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी ‘प्रथम’ संस्थेतर्फे केला गेला ग्रामीण भागातील प्लॅस्टिक कचऱ्याच्या समस्येवर अभ्यास

सिटी बेल ∆ पनवेल ∆

देशातील ग्रामीण भागातील घन कचरा व्यवस्थापन समजून घेण्यासाठी प्रथम संस्थेच्या वतीने संशोधनात्मक अभ्यास करण्यात आला. प्रथम संस्था ज्या गावांमध्ये विविध उपक्रम राबवित असते, त्या गावांमध्ये मे 2022 मध्ये हा अभ्यास केला गेला. हा संशोधनात्मक अभ्यास करण्यासाठी देशातील 15 राज्यांमधील 70 जिल्ह्यांत पसरलेल्या 700 गावांमधल्या 8400 घरांचा समावेश करण्यात आला होता. हा अभ्यास प्रथमचे 700 कार्यकर्ते व स्वयंसेवकांद्वारे करण्यात आला. अभ्यासाशी संबंधित विविध माहिती गोळा करण्यासाठी घरे, शाळा, हॉटेल्स किंवा ढाबे, रुग्णालये तसेच भंगारवाले व ग्रामपंचायत सदस्यांना भेटी देण्यात आल्या.

ग्रामीण भारतातील मुलांसाठी लर्निंग फॉर लाइफ (Learning for life) हा अभ्यासक्रम तयार करण्याकरिता, प्लॅस्टिक कचऱ्यामुळे निर्माण होणाऱ्या समस्यांचे विविध पैलू समजून घेणे हे या अभ्यासाचे मुख्य उद्दिष्ट होते. परिसर अभ्यास ( EVS ईव्हीएस) हा विषय भारतातील मुलांच्या औपचारिक अभ्यासक्रमाचा एक भाग आहेच. पाठ्यक्रमातील इतर विषयांप्रमाणे परिसर अभ्यास हा विषयदेखील फक्त पुस्तकी ज्ञानापुरताच मर्यादित राहण्याच्या धोक्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. प्रथमच्या लर्निंग फॉर लाइफ अभ्यासक्रमांतर्गत लवकरच एक नवीन उपक्रम सुरू करण्यात येणार आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील मुले 4 एक्स फ्रेमवर्क संकल्पनेचा उपयोग करून पर्यावरणाविषयी सजग होऊ शकतील. 4- एक्स म्हणजे एक्सपोज (Expose), एक्सप्लोअर (Explore), एक्सपेरिमेंट (Experiment) आणि एक्सचेंज ( Exchange). या फ्रेमवर्कच्या माध्यमातून मुले आधी त्या विषयाचे ज्ञान मिळवतील, मग त्यांना त्यांच्या गावातील समस्या शोधण्यासाठी प्रोत्साहित केले जाईल. या समस्यांची संभाव्य उत्तरे मिळवण्यासाठी मुले प्रयोग करतील आणि नंतर मुले आपले अनुभव इतरांना सांगतील.

या अभ्यासात समोर आलेले निष्र्कष आणि निरीक्षणे एका अभ्यासक्रमात समाविष्ट केली जातील, जेणेकरून मुलांना विविध प्रकारचे प्लॅस्टिक, त्यांपासून होणाऱ्या संभाव्य समस्या आणि प्लॅस्टिक कचऱ्याची विल्हेवाट लावण्याच्या विविध पद्धर्तीची ओळख करून देण्यात येईल. हाती आलेल्या प्राथमिक आकडेवारीनुसार पॉलिथिन पिशव्या, प्लॅस्टिक रॅपर्स, सॅशे अशी अनेक प्रकारची बहुस्तरीय व लवचिक प्लॅस्टिकची उत्पादने एकतर जाळून टाकली जातात किंवा इतर घरगुती कचऱ्याबरोबरच त्यांची विल्हेवाट लावण्यात येते. तीस टक्क्यांपेक्षा कमी कुटुंबांना प्लॅस्टिक जाळल्यावर होणाऱ्या दुष्परिणामांविषयी माहिती आहे आणि ग्रामीण भागातील बहुतेक घरांत अशा प्रकारची प्लॅस्टिक उत्पादने नियमितपणे • जाळली जातात. 4- एक्स (4 Ex) फ्रेमवर्कवर आधारित शिक्षण कार्यक्रमाअंतर्गत ग्रामीण भागातील लोकांमध्ये ह्या समस्येविषयी जागरूकता निर्माण होईल आणि घर आणि गाव पातळीवर या समस्येचे निराकरण करण्यासाठी ते सर्वजण सहभागी होतील अशी अपेक्षा आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.