नागोठण्याचे प्रसिद्ध व्यापारी राकेश जैन यांच्या वार्षितप सोहळ्याची शोभायात्रेने सांगता
सिटी बेल • नागोठणे • महेश पवार •
नागोठणे येथील प्रसिद्ध तरुण व्यापारी, तपस्वी राकेश चंपालाल जैन यांच्या वार्षितप सोहळ्याची रथातून काढण्यात आलेल्या भव्य शोभायात्रेने सांगता झाली. राकेश जैन यांच्याकडून करण्यात आलेला उपवास शिवसेना नेते राजिप सदस्य किशोरभाई जैन यांच्या हस्ते उसाचा रस पाजुन सोडविण्यात आला.
जैन समाजात वार्षितप उपवासाला फार महत्व असते. या उपवासाद्वारे वर्षभर देवाची भक्ती करण्याचे भाग्य लाभते अशी भावना जैन समाजाची असते. नागोठण्यातील प्रसिद्ध तरुण व्यापारी राकेश चंपालाल जैन यांनी १३ महीन्याचे (४०० दिवस) उपवास पकडले होते. वार्षितप म्हणजे एक दिवस उपवास करीत फक्त गरम पाणी प्यायचे असते. हा पहिल्या दिवसाचा उपवास करतांना सूर्यास्तनंतर पाणी बंद करण्यात येते. तर दुसऱ्या दिवशी उपवास करतांना एकाच ठिकाणी बसून दोन वेळा जेवण घेण्यात येत असते. दुस-या दिवसाचा उपवास करतांना सूर्यास्तानंतर जेवण आणि पानी बंद करण्यात येते.
अशाप्रकारचा हा वर्षितप उपवास असतो. बुधवार दि ४ एप्रिल रोजी अक्षय तृतीयाच्या शुभ मुहूर्तावर तपस्वी राकेश चंपालाल जैन यांचा वर्षितप पालिताना तीर्थंदीपति आदेश्वर देवाच्या कृपेने निर्विघ्नपणे पूर्ण झाले. त्यानिमित्ते नागोठणे छत्रपती शिवाजी महाराज चौक ते बाजारपेठ मार्गे आराधना भवन पर्यंत भव्य शोभायात्रा काढण्यात आली होती. या शोभायात्रेत तपस्वी अमर रहे ! तपस्वीनो जय जयजयकार ! च्या घोषणा देण्यात आल्या. या घोषणांनी संपूर्ण बाजारपेठ परिसर दणाणून गेला होता.
शोभायात्रेची सांगता झाल्यानंतर पूजा अर्चा करून जैन समाजाचे नेते किशोरभाई जैन यांच्या हस्ते राकेश जैन यांना इक्षुरस (ऊसरस) पाजून उपवास (पारणा) सोडविण्यात आला. ह्या भक्तिमय कार्यक्रमांस नागोठणे गावातील जैन बांधव, नागरिक व पाहुणे मंडळी बहुसंख्येने उपस्थित होते.








Be First to Comment