भगवान महावीरांच्या विचारांचे आदर्श समाजांनी डोळ्यासमोर ठेवले पाहिजे — पं.पु.आचार्य भगवान श्री. देवकीर्ती सुरीश्वर महाराज
सिटी बेल • पेण • वार्ताहर •
जैन समाजातील धर्मगुरू भगवान महावीर स्वामी यांची जीवनशैली अतिशय सुंदर असून त्यांनी भुतलावर असणा-या प्रत्येक जीवजंतू, प्राणीमात्रांवर प्रेम करण्याची शिकवण देऊन माणसांनी कोणतीही मोह, माया न बाळगता सुख आणि शांतीचे पाईक बनून जीवनात पीडा बिना, पैसा बिना, पाप बिना जीवन हेच साधूंचे जीवन आहे. त्यामुळे समाजानी त्यांच्या विचारांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवला पाहिजे असे वक्तव्य पं.पु.आचार्य भगवान श्री. देवकीर्ती सुरीश्वर महाराज यांनी केले.
पेण शहरातील प्रसिद्ध कापड व्यापारी रविंद्र जैन यांची मुलगी प्रणाली रविंद्र जैन वय २८ हिचा दीक्षा महोत्सव कार्यक्रम २१ एप्रिल रोजी पं.पु.आचार्य भगवान श्री देवकीर्ती सुरीश्वर महाराज तसेच स्वाध्वी परमवर्धना श्री.जी.महाराज यांच्या उपस्थितीत पेण येथील तालुका क्रीडा संकुल येथे होणार आहे.
या दिक्षा महोत्सवाची जय्यत तयारी जैन समाजाच्या वतीने मागच्या आठ दिवसांपासून सुरू आहे. या दिक्षा महोत्सवानिमित्त उपस्थित असणारे देवकीर्ती सुरीश्वर महाराज यांनी अधिक बोलताना सांगितले की पेण शहरात पहिल्यांदा असा दिक्षा घेण्याचा कार्यक्रम होत आहे.हा आनंद आम्हाला जसा आहे त्याहीपेक्षा जास्त आनंद दिक्षा घेणा-या प्रणालीला आहे.
भगवान महावीर स्वामी यांच्या तपवनाचा अभ्यास तीने केला असून त्यानुसार ती तन,मन,धन, मोह, माया या सर्व गोष्टी मागे टाकून आपल्या नवीन आयुष्याची सुरुवात करणार आहे.त्यामुळे येणाऱ्या पीढीने महावीरांच्या विचारांशी संघटीत होणे गरजेचे आहे असे त्यांनी शेवटी सांगितले.
तर यावेळी प्रणाली जैन हिने सांगितले की माझे शिक्षण बीएससी आयटी मधून झाले असून मला शैक्षणिक ओढ असतांनाच एकीकडे भगवान महावीर स्वामी यांच्या जीवन प्रणालीची माहीती घेत गेली असता त्याची मला आवड निर्माण झाली आणि भगवंताची इच्छा होते तेव्हा आपोआप आपण त्याकडे वळतो तसेच काही महिन्यांपूर्वी मी महाराजांच्या तपामध्ये ४७ दिवस राहत असताना मला याची आवड निर्माण झाली.
भगवान महावीर स्वामी यांनी सांगितलेल्या प्रत्येक गोष्टींचा अभ्यास केला तर आपल्याला समजेल आपण केलेले कार्य हे चांगल्या मार्गी लागले तर मानवाला ख-या अर्थाने सुख निर्माण होणार आहे. त्यामुळे माझ्या मनाची तयारी करुन मी सर्व काही त्याग करीत दिक्षा घेत असल्याचा आनंद वाटत आहे.यावेळी जैन समाज अध्यक्ष किर्तीकुमार बाफणा, दिलीप जैन, पेण नगरपालिकेचे सभापती दर्शन बाफणा, प्रकाश जैन, रविंद्र जैन, अशोक जैन, संदिप पुनमिया आदिंसह समाजातील महिला, पुरूष मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Be First to Comment