कामगार भारतीच्या माध्यमातून उत्तम गॅलवा कंपनीच्या कामगारांना पगारवाढ
सिटी बेल • पेण • वार्ताहर •
कामगार भारती माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनच्या माध्यमातून ताबांटी हद्दीतील उत्तम गॅलवा कंपनीच्या कामगारांना दरमहा सुमारे १० हजार ७०० रुपयांची भरघोस पगारवाढीचा करार झाला असल्याचे युनियनचे जनरल सेक्रेटरी हिराजी पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
यावेळी युनियनचे उपाध्यक्ष गौतम पाटील, सचिव संजय बांदिवडेकर, हेमंत सिंग तसेच कामगार प्रतिनिधी राजन पेरवी, दिपक घरत, अमोल पाटील, योगेश टेगे, महेश ढेंणे आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी त्यांनी अधिक सांगितले की, उत्तम गॅलवा कंपनीच्या कामगारांना गेली आठ वर्षं कोणतीही पगारवाढ कंपनीने केली नव्हती. त्यामुळे या कामगारांनी कामगार भारती माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनचे सभासदत्व स्विकारले असता कामगारांच्या हितासाठी सातत्याने लढणारी युनियन कामगारांसाठी पुढे येऊन सदर युनियनच्या पदाधिकाऱ्यांनी कंपनी व्यवस्थापनाची भेट घेऊन कामगारांना ८ वर्षाची वेतन वाढ द्यावी तसेच इतर सोई सुविधा द्याव्यात अशी मागणी केली.
परंतु कंपनी व्यवस्थापकानीं याकडे पुर्णपणे दुर्लक्ष केले असता युनियनने कामगार आयुक्तांसोबत बैठक घेऊन या मुजोर व्यवस्थापना विरोधात आवाज उठवला सुरूवातीला एक दिवस आणि नंतर २८ मार्च ते १५ एप्रिल असा कमी बंद आंदोलन सुरू केल्याने अखेर कंपनी व्यवस्थापनाने नरमाईची भूमिका घेत कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक सुमित आहुजा यांच्या सोबत कामगार भारती युनियनच्या पदाधिका-यांची बैठक होऊन याबाबत सविस्तर चर्चा झाली असता सदर चर्चेत कामगारांना प्रति महिना १० हजार ७०० रूपये पगार वाढ तसेच वाढीव बोनसपोटी ५ हजार रुपये देण्याचे मान्य करण्यात अल्याने कामगारांनी कामगार भारती युनियनच्या पदाधिकाऱ्यांचे धन्यवाद मानले.
![](https://citybell.in/wp-content/uploads/2022/04/img-20210920-wa00307849398910969900238-738x1024.jpg)
Be First to Comment