वाचा श्री.नंदकुमार मरवडे यांचा बहिण-भावाचे निरपेक्ष भावनेचं प्रतिक असणा-या रक्षाबंधन या सणाची महती सांगणारा लेख
रक्षाबंधन
भारत देशाची संस्कृती फार मोठी आहे. आपल्या देशाला अनादी कालापासून सांस्कृतिक वारसा लाभला आहे.सा-या जगात भारतीय संस्कृतीकडे आदराने पाहिले जाते. याच संस्कृतीने आपल्याला विविध नीतीधर्म व संस्कार शिकविले आहेत.याच संस्कृतीच्या शिकवणीच्या माध्यमातून दरवर्षी आपण विविध सणक्षसमारंभ मोठ्या उत्साहात साजरे करतो.आपले सर्व सण हे आपली संस्कृती,पर्यावरण,ऋतू व शेतीशी निगडीत आहेत. बहिण-भावाच्या प्रेमाचे पवित्र बंधन असणारा रक्षाबंधन हा सण दरवर्षी संपूर्ण देशात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या दिवशी बहिण आपल्या भावाला प्रेमाने राखी बांधून भावाचे मन प्रेमाने जिंकून घेते.तर भाऊ देखील बहिणीच्या राखीचे उपकार न विसरता बहिणीवर आलेले संकट व अडीअडचणीच्या वेळी धाऊन जाऊन राखी बद्दल क्रुतज्ञपणाची भावना व्यक्त करतो.जगातील सर्व नात्यात बहिण-भावाचे प्रेम हे नि:स्प्रुह व नि:स्वार्थी मानले जाते.रक्षाबंधनाच्या दिवशी बहिण आपल्या भावाकडे जाऊन त्याच्या हातावर राखी बांधते.
भारतीय संस्कृती ही जगात सर्वोच्च व मानवी जीवनाचे महानता दर्शविणारी आदर्श संस्कृती समजली जाते.स्त्रीला भोगवस्तू अथवा सुखवस्तू न समजता तिच्या महानतेचे दर्शन हे याच संस्कृतीमधून आपल्याला घडते. याच संस्कृतीने स्त्रीची पूजा केली आहे.’यत्र नार्यस्तू,पूज्यन्ते रमन्ते तत्र देवता’,म्हणजे जिथे स्त्रीची पूजा केली जाते,तिचा सन्मान केला जातो.तिथे देवता नांदत असतात किंवा तो परिवार,तो समाज,तो समूह,तो देश कुठेही मागे पडत नाही.असे मनूने म्हटले आहे स्त्रीयांकडे भोगवस्तू न पाहता माता-भगिनींच्या द्रुष्टीकोनातून पाहण्याची शिकवण ही आपल्या भारतीय संस्कृतीनेच दिली आहे.
आज आपल्या आजूबाजूला समाजात निट डोकावून पाहिले तर स्त्रीयांवर अन्याय, अत्याचार घडणाऱ्या घटना या नेहमीच घडत आहेत.आज समाज एवढा पुढारलेला झाला असला तरी स्त्री ही तशी असुरक्षितच राहिली आहे. आपण शाळेत प्रतिज्ञा बोलते.भारत माझा देश आहे. सारे भारतीय माझे बांधव आहेत.मग ज्यावेळी एखाद्या स्त्रीवर भर रस्त्यावर अन्याय,अत्याचार होतो,त्यावेळी कुठे जाते आपली शिकवण,ती देखील कोणाची तरी माता-भगिनी आहे.हे आपण न पाहता,अन्याय घडणाऱ्या स्त्रीकडे आपण आपलीच माता-भगिनी समजून अन्यायाचा प्रतिकार केला तर शाळेत शिकलेली प्रतिज्ञा ही ख-या अर्थाने आपल्या मनावर बिंबली असल्याचे दिसून येईल.
रक्षाबंधन या सणाकडे केवल संकुचित व्रुत्तीने न पाहता आपण व्यापकद्रुष्टीने पहायला शिकले पाहिजे. समाजात आज किणीतरी अनाथ मुले,मोठी व वयस्कर माणसे वावरत असतात.की ज्यांना या जगात कोणीही नसल्याने कायमच दुर्लक्षित राहिलेले असतात. तर या रक्षाबंधनाच्या निमित्ताने त्यांच्याकडे जाऊन त्यांच्या हातावर राखी बांधून बंधूभावाचे नाते त्यानिमित्ताने ध्रुड करता येईल.आपण पाहतोच की,देशाचे प्राणपणाने रक्षण करणारे कितीतरी जवान असे आहेत की,त्यांना बहिणी नाहीत अशा जवानांसाठी संपूर्ण देश भरातून विविध सामाजिक संस्था व व्यक्ती या आपल्या जवानांना राख्या पाठवून त्यांच्या बद्दल क्रुतज्ञपणाची भावनाच व्यक्त करीत असतात. यामधून दुहेरी हेतू साध्य केला जाऊ शकतो ज्यांना बहिणी नाहीत त्यांना व ज्यांना बहिणी आहेत त्यांनाही राखी बांधली जाते आणि आपले रक्षण करणारे हे आपले शूर जवान बंधू त्यांच्याबद्दल प्रेम,माया,आपुलकी व क्रुतज्ञता व्यक्त केली जाते.
रक्षाबंधनाच्या निमित्ताने बहिण भावाकडे जाऊन भावाला प्रेमाचं प्रतिक असणारी राखी बांधून बहिण आपले रक्षण व सुरक्षिततेबद्दल निश्चिंत राहते.भावानेही निरपेक्ष भावनेतून बांधलेल्या राखीची आठवण ठेऊन ज्या ज्या वेळी बहिणीवर एखादा प्रसंग,संकट येईल त्यावेळी धाऊन जाऊन तिचे रक्षण केले पाहिजे.तरच ख-या अर्थाने रक्षाबंधनाचे महत्व व हा सण साजरा करण्याची भावना आपल्या मनावर बिंबली असल्याचे समजले जाईल.
श्री.नंदकुमार मरवडे,
श्री.क्षेत्र तळवली तर्फे अष्टमी,
ता.रोहा,जि.रायगड.
Be First to Comment