Press "Enter" to skip to content

नागोठणे शहरातील राष्ट्रवादीच्या ६७ पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्राचे वाटप

मिळालेल्या नियुक्तीपत्रांचा वापर फ्रेममध्ये लावण्यासाठी न करता संघटन वाढीसाठी करा : आ. अनिकेत तटकरे

दुसऱ्याच्या बापाला बाप म्हणण्याची आमची पद्धत नसल्याचा विरोधकांना मारला टोला

सिटी बेल • नागोठणे • महेश पवार •

राष्ट्रवादी पक्ष संघटनेच्या वाढीसाठी रोहा तालुक्यातच नव्हे तर जिल्ह्यात कुठे होत नसेल एवढे काम माझा नागोठणे विभाग करीत आहे. नागोठणे शहर व विभागात साहेब, ताई व माझ्या माध्यमातून भरपूर निधी देऊन विकासकामांच्या बाबतीत विभागाला नेहमीच झुकते माप दिले आहे. तरीही नागोठणे ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीत आपल्याला अपयश आले हे दुर्दैव. मात्र आपापसातील मतभेद बाजूला ठेवून काम केले की काय होते हे नागोठणे पोटनिवडणुकीत आपण दाखवून दिले आहे. त्यामुळेच भविष्यातही मिळालेल्या नियुक्तीपत्रांचा वापर फ्रेममध्ये लावण्यासाठी न करता संघटन वाढीसाठी करा असे आवाहन आमदार अनिकेतभाई तटकरे यांनी कार्यकर्त्यांना केले. खा. शरद पवार यांच्या मुंबईतील “सिल्व्हर ओक” बंगल्यावर झालेल्या हल्ल्याचा निषेध ठरावही यावेळी करण्यात आला.

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे विभागीय नेते भाई टके व राष्ट्रवादीच्या पेण-सुधागड विधानसभा मतदार संघाचे उपाध्यक्ष विलास चौलकर यांच्या मार्गदर्शनाखाली शहर अध्यक्ष बाळासाहेब टके व त्यांच्या संपूर्ण टीमकडून आयोजित केलेल्या एका देखण्या कार्यक्रमात खा. सुनील तटकरे यांच्या आशिर्वादाने तसेच ना. आदितीताई व आ. अनिकेतभाई यांच्या सुचनेनुसार शहरातील राष्ट्रवादी, युवक राष्ट्रवादी व महिला अशा ६७ पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देण्याचा कार्यक्रम येथील हॉटेल इंद्रप्रस्थच्या सभागृहात उत्साहात संपन्न झाला त्यावेळी आ. अनिकेतभाई तटकरे बोलत होते.

विकास कामांचे प्रस्ताव हे कोणाच्या माध्यमांतून गेलेत हे महत्वाचे असल्याने आम्ही आणलेल्या कामांनाच ती आम्ही आणल्याचे छातीठोकपणे म्हणत असतो. दुसऱ्याच्या बापाला बाप म्हणण्याची आमची पद्धत नाही असा टोलाही यावेळी आ. अनिकेतभाई तटकरेंनी यावेळी विरोधकांना लगावला व उद्धव ठाकरे हे केवळ एक पक्षाचे मुख्यमंत्री नसून ते महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री असल्याने जोपर्यंत उद्धवजी मुख्यमंत्री आहेत तोपर्यंत आदितीताईच पालकमंत्री राहणार असून मला पेणचा आमदार व्हायचे नसले तरी पेणचा भावी आमदारही राष्ट्रवादीचाच असेल असे सूतोवाचही यावेळी आ. अनिकेतभाई तटकरे यांनी केले.

या कार्यक्रमाला राष्ट्रवादीचे विभागीय नेते भाई टके, शिवरामभाऊ शिंदे, सदानंद गायकर, मधुकर ठमके, हरेष काळे, विलास चौलकर, लियाकतशेठ कडवेकर, बाळासाहेब टके, पांडुरंग गायकर, चंद्रकांत गायकवाड, हिराजी शिंदे, राजेंद्र शिंदे, प्रमोद जांबेकर, सचिन कळसकर, विनायक गोळे, दिनेश घाग, अखलाक पानसरे, अतुल काळे, राजेश पिंपळे, कुणाल तेरडे, सुजाता जवके, प्रितमताई पाटील, आशा शिर्के, अमिता शिंदे, स्नेहल काळे, निष्ठा विचारे, प्रतिभा तेरडे, श्वेता चौलकर, अॅड. सोनल जैन, मेघना कोळी, सुधाकर जवके, बिपीन सोष्टे, प्रकाश मोरे, नितीन पत्की, विक्रांत घासे आदींसह कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.

या कार्यक्रमात शिवरामभाऊ शिंदे, सदानंद गायकर, विलास चौलकर, सुजाता जवके, प्रितमताई पाटील यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हिराजी शिंदे यांनी केले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.