हर हर महादेवाच्या जयघोषात देवाचा लग्न सोहळा थाटामाटात
सिटी बेल • धाटाव • शशिकांत मोरे •
कोरोनाच्या सावटामुळे मागील दोन वर्षानंतर चैत्र महिन्यात भरविण्यात आलेल्या रोहा तालुक्यातील ऐतिहासिक वारसा लाभलेल्या आणि महाराष्ट्रातील आगळीवेगळी बहुजन समाजाच्या प्रथा ,परंपरा जपणाऱ्या तळाघर येथील प्रसिद्ध स्वयंभू महादेवाच्या दोन दिवस अलोट गर्दी झाली होती.
दरवर्षी रामनवमीच्या आदल्या दिवशी याठिकाणी महादेवाचे लग्न लागते.हे लग्न पाहण्यासाठी आणि या यात्रेचा आनंद घेण्यासाठी रोहा, मुरूड, श्रीवर्धन,तळा,म्हसळा याठीकानाहून लाखो भाविक सहभागी झाल्याचे पहावयास मिळाले.हर हर महादेवाच्या जयघोषात देवाचा लग्न सोहोळा थाटामाटात संपन्न झाला.
श्री तीर्थक्षेत्र स्वयंभू महादेव मंदीर तळाघर येथे देवाचा लग्न पारंपारिक पद्धतीने धार्मिकविधी , मंगलाष्टके बोलुन झाला, तालुक्यातील खारगाव येथील नवरदेव तर धाटाव गावची नवरी असते.लग्न सोहळा पाहण्यासाठी तालुक्यासह जिल्ह्यातून मोठया प्रमाणात नागरीक उपस्थित होते.
सुतार , चांभार , वाणी , शिंपी , तेली , परिट , जंगम , ब्राह्मण , मराठा , कुणबी , कराडी , कोळी , लोहार , कुंभार , आगरी , नाभिक असे बारा बलुतेदार या देवाच्या यात्रेकरीता दरवर्षी मोठ्या उत्साहाने येत असतात. दोन दिवस ही यात्रा सुरू असते, यात्रेचा मानसन्मान हा पुरातन आहे, पेशवे व सिद्धी यांच्यात झालेल्या करारात या यात्रेच्या लग्न सोहळ्याचा उल्लेख असल्याचे सांगण्यात येते.
धाटाव पंचक्रोशीतील तळाघर, लांडर, बोरघर ,वाशी, महादेववाडी ,धाटाव यात्रा पंच कमिटी असते, यावेळी
लग्न सोहळ्यास लागणारी मातीची भांडी दमखाडीचे कुंभार देतात, तळाघरेचे मोरे दिपमाळ लावतात, खारगाव येथून पालखी येते, मानाचे निमंत्रण देण्याचामान बामुगडे घराण्याकडे आहे, सोनगावचे ग्रामस्थ तेलवण, वरातीचे निमंत्रण देतात ,धाटाव गावातून काठी तेलवणाच्या दिवशी येते, शिवपार्वतीची प्रतिष्ठापना उत्तर काठीवर होते, वारळची काठी मंदिरासमोर उखळात उभी करतात, किल्ला व तळाघर गावातील करवला करवली ऊभे असतात, मंगलाष्टक बोलण्यासाठी धाटाव , लांडर, भुवनेश्वर ,देवकान्हे येथील जंगम होतें,
लग्न सोहळ्याच्या वेळी सुतार व भगत महादेवाची मूर्ती मांडीवर घेउन विवाह सोहळ्यास बसतात, नवरी कडील धाटाव व नवरदेवाकडील खारगावची मंडळी व पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते,.या ठिकाणी निघणाऱ्या मानाच्या काठ्यची पूजा आ. अनिकेत तटकरे यांच्या हस्ते करण्यात आली.यासमयी विजय मोरे,विनोद पशिलकर,अनिल भगत,सुरेश मगर यांसह परिसरातील नागरिक,बहुजन समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.तर लग्न सोहळ्यास रोहा पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक संजय पाटील उपस्थीत होते.
यात्रेत काठी नाचवण्याची परंपरा आहे, तालुक्यासह जिल्ह्याच्या अन्य तालुक्यातून काठया येतात, लग्न सोहळ्याच्या दुसऱ्या दिवशी मोठी यात्रा भरते यात्रेस मोठया प्रमाणात गर्दी असते, कोरोनामुळे गेली दोन वर्षे यात्रा उत्सव होऊ शकला नसला तरी यावेळी कोरोनाच्या सर्व नियामांचे पलान यावेळी करण्यात आले, लग्न सोहळ्यास यात्रेस नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
याठिकाणी काव्या नाचवण्याचा प्रकार हा अतिशय विहंगमय असतो.लाकडी पाळण्यांबरोबर आकाश पाळणे , मिठाईची दुकाने , हॉटेल्स , लहान मुलांची खेळणी , वस्तु , मौत का कुवा , करमणूक साधने अशा विविध प्रकारची रेलचेल सुरु होती.
खालुवाजाच्या निनादात सुरू असलेल्या काठ्यांच्या भव्य मिरवणुकीने उपस्थित भाविकांबरोबर लहानग्यांचा आनंद काही औरच असल्याचे दिसले. रामजयंती निमित्त २ दिवस भरलेल्या या यात्रेत किमान २० ते २५ लाखांची उलाढाल होत असल्याने दिवसेंदिवस या यात्रेची व्याप्ती वाढतच आहे.म्हसळा श्रीवर्धन मुरुड , तळा , रोहा तालुवासयतील बहुजन समाजाला सामावून घेणारा हा रामनवमी उत्सव म्हणजे एकात्मीकतेचे प्रतीक असल्याची भावना अनेकांनी बोलून दाखविली.
Be First to Comment