पनवेल चांद्रसेनीय कायस्थ प्रभु समाजाच्या वतीने श्रीरामजन्मोत्सव सोहळा उत्साहात साजरा
सिटी बेल • पनवेल •
रविवार दिनांक १० एप्रिल रोजी रामनवमीच्या निमित्ताने पनवेलच्या चांद्रसेनीय कायस्थ प्रभु समाजाच्या वतीने श्रीराम जन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. विशेष म्हणजे या रामजन्मोत्सव सोहळ्याला शंभर वर्षांहून अधिक वर्षांची परंपरा आहे. सुप्रसिद्ध उद्योजक राजुशेठ गुप्ते यांच्या पुढाकाराने पूर्णत्वास आलेल्या लक्ष्मीनारायण मंदिर जीर्णोद्धार प्रक्रियेमुळे,नवीन मंदिरात प्रथमच हा सोहळा होत असल्याने यंदाच्या रामजन्मोत्सव उत्सवाला प्रचंड उत्साहाची किनार होती. पनवेलच्या चांद्रसेनीय कायस्थ प्रभु समाजातील अनेक मान्यवरांची या सोहळ्याला उपस्थिती होती.
पनवेल मधील चांद्रसेनीय कायस्थ प्रभु समाजाचे लक्ष्मीनारायण मंदिर,प्रभु आळी, छत्रपती शिवाजी पथ येथे आहे. या मंदिरात विविध धार्मिक सोहळे मोठ्या उत्साहात साजरे करण्यात येतात. यापैकी एक मोठा उत्सव म्हणजे रामनवमीनिमित्त श्रीराम जन्मोत्सव सोहळा. पनवेलच्या चांद्रसेनीय कायस्थ प्रभु समाजातील बांधवांच्या श्रीकृष्ण क्लब ने साधारण शंभर वर्षांपूर्वी श्री राम जन्मोत्सव सोहळा साजरा करण्यास सुरुवात केली. तेव्हापासून प्रतिवर्षी समाज बांधवांच्या वतीने मोठ्या उत्साहात श्री लक्ष्मीनारायण मंदिरात हा सोहळा साजरा केला जातो.
जवळपास पावणे चारशे वर्ष जुने असणाऱ्या या मंदिराचा नुकताच सुप्रसिद्ध उद्योजक राजुशेठ गुप्ते यांच्या पुढाकाराने जीर्णोद्धार संपन्न झाला. श्री लक्ष्मी व श्री नारायण यांच्या मूर्त्यांची प्रतिष्ठापना मोठ्या थाटामाटात संपन्न झाली. अत्यंत सुबक व प्रसन्नतेची अनुभूती देणारे असे हे मंदिर निर्माण झाले आहे. नूतन मंदिरामध्ये प्रथमच श्री राम जन्मोत्सव सोहळा साजरा होत असल्याने समाज बांधव मोठ्या उत्साहाने सोहळ्यात सहभागी झाले होते.
चंद्रसेनिय कायस्थ प्रभू समाजाच्या महिला मंडळाच्या वतीने मध्यान्ह मुहूर्तावर राम जन्माचा पाळणा, भजने, श्रीराम गीते सादर केली जातात. याकरिता वैशाली कुलकर्णी, नीलिमा वैद्य, वैशाली वैद्य, उज्वल दिघे, प्रतिभा हजरनीस, सानिका पत्की, गौरी राजे, नीलिमा गडकरी व त्यांच्या सहकाऱ्यांनी सुश्राव्य गीते सादर केली. त्यानंतर नैवद्य दाखवून प्रभू श्रीरामांची आरती केली जाते. सुंठवड्याचा प्रसाद वाटला जातो,मनोभावे दर्शन घेतल्यानंतर महाप्रसादाचे आयोजन केलेले असते.
कोरोना विषाणू संक्रमणात लादल्या गेलेल्या लॉक डाऊन मुळे गेली दोन वर्षे रामनवमी उत्सव साजरा होत नव्हता. अवघ्या तीन ते चार सदस्यांच्या उपस्थितीत श्रीराम जन्मोत्सवाची औपचारिकता पूर्ण केली जात होती. कोरोना विषाणू प्रसार थांबविण्यासाठी लादलेले निर्बंध हटविले गेल्याने आणि नूतन वास्तूत पहिल्यांदा श्री राम जन्मोत्सव सोहळा होत असल्याने यंदाचा सोहळा आमच्यासाठी दुग्धशर्करा योग असल्याची प्रतिक्रिया चांद्रसेनिय कायस्थ प्रभू समाजाचे अध्यक्ष योगेश राजे यांनी दिली.
ग्लोबल कायस्थ कॉन्फरन्स या समाजाच्या वैश्विक पातळीवर काम करणाऱ्या संघटनेच्या काँकलेव्ह करता पनवेल चांद्रसेनीय कायस्थ प्रभु समाजाने दिलेल्या भरीव योगदानाबद्दल ग्लोबल कायस्थ या संस्थेच्या नवीन कुमार, रुचिता सिन्हा आणि विजय सिन्हा यांनी प्रशस्तीपत्र आणि सन्मानचिन्ह देऊन चंद्रसेनिय कायस्था प्रभू समाज,पनवेल यांचा गौरव केला. यावेळी अध्यक्ष योगेश राजे, सुप्रसिद्ध उद्योजक राजुशेठ गुप्ते, उपाध्यक्ष नितीन देशमुख, सचिव गिरीश गडकरी, खजिनदार श्रीकृष्ण चित्रे, सहसचिव संदीप देशमुख, सुप्रसिद्ध उद्योजक राजाभाऊ गुप्ते, प्रदीप गुप्ते आदी मान्यवर यांच्यासह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Be First to Comment