Press "Enter" to skip to content

लेख : श्रीरामनवमीच्या निमित्ताने…..

श्रीरामनवमीचा इतिहास आणि महत्त्व, जाणुन घ्या हा उत्सव साजरा करण्याची पद्धत

श्रीविष्णूचा सातवा अवतार श्रीराम याच्या जन्माप्रीत्यर्थ श्रीराम नवमी साजरी करतात. या तिथीला नेहमीपेक्षा 1 हजार पटीने कार्यरत असलेल्या श्रीरामतत्त्वाचा लाभ मिळण्यासाठी ‘श्रीराम जय राम जय जय राम ।’ हा नामजप जास्तीतजास्त करावा. श्रीराम म्हणजे अनेक भाविकांची श्रद्धाज्योत ! धर्माच्या सर्व मर्यादा पाळणारा अर्थात् ‘मर्यादापुरुषोत्तम’, आदर्श पुत्र, आदर्श बंधु, आदर्श पति, आदर्श मित्र, आदर्श राजा, आदर्श शत्रु असा सर्वार्थाने आदर्श ठरेल असा कोण, असे विचारताच डोळ्यांसमोर नाव येते ते म्हणजे ‘श्रीराम’ ! आदर्श राज्याला आजही रामराज्याचीच उपमा देतात. सनातन संस्थेद्वारा संकलित या लेखात आपण श्रीरामनवमीचा इतिहास आणि महत्त्व, हा उत्सव साजरा करण्याची पद्धत आणि रामनामाचे महत्व यांविषयी जाणून घेणार आहोत.रामनवमीला श्रीरामाची उपासना आणि नामजप करून रामराज्य स्थापनेचा संकल्प करूया !

1. तिथी : रामनवमी हा उत्सव चैत्र शुद्ध नवमी या तिथीला साजरा करतात.

2. इतिहास : श्रीविष्णूचा सातवा अवतार श्रीराम याच्या जन्माप्रीत्यर्थ रामनवमी साजरी करतात. या दिवशी पुष्य नक्षत्रावर, माध्यान्ही, कर्क लग्नी सूर्यादी पाच ग्रह असतांना अयोध्येत रामचंद्रांचा जन्म झाला.

3. श्रीरामनवमीचे आध्यात्मिक महत्त्व : देवता अन् अवतार यांच्या जन्मतिथीला त्यांचे तत्त्व भूतलावर जास्त प्रमाणात कार्यरत असते. रामनवमी या दिवशी श्रीरामतत्त्व नेहमीपेक्षा 1000 पटीने कार्यरत असते. रामनवमीला ‘श्रीराम जय राम जय जय राम ।’ हा नामजप, तसेच श्रीरामाची अन्य उपासना भावपूर्ण केल्याने श्रीरामतत्त्वाचा जास्तीतजास्त लाभ मिळण्यास साहाय्य होते.

4. श्रीराम जय राम जय जय राम – श्रीरामाच्या नामजपाचा अर्थ : ‘रामसे बडा रामका नाम‘, असे म्हटलेलेच आहे. ‘रामाचे एक नाम विष्णुसहस्रनामाच्या बरोबरीचे आहे’, अशी रामनामाची महती साक्षात् शिवाने गायिली आहे. देवतेचा नामजप भावपूर्ण झाला, तरच तो देवापर्यंत लवकर पोहोचतो. नामजप करतांना त्यातील अर्थाकडे लक्ष देऊन केला, तर तो अधिक भावपूर्ण होण्यास मदत होते. यासाठी ‘श्रीराम जय राम जय जय राम ।’ या नामजपातील शब्दांचा अर्थ समजून घेऊया. ‘श्रीराम‘ हे श्रीरामाचे आवाहन आहे. ‘जयराम’ हे ‘नमः’ प्रमाणे शरणागतीचे दर्शक आहे.
5. रामनवमीच्या दिवशी पूजाविधी करण्याची पद्धत : प्रभु श्रीरामांचा जन्म माध्यान्हकाळी म्हणजे दुपारी 12 वाजता साजरा करतात. रामजन्मोत्सव साजरा करतांना प्रभु श्रीरामांच्या मूर्तीची किंवा प्रतिमेची पंचोपचार किंवा षोडशोपचार पूजा करावी. श्रीरामासाठी तुळशी आणि चाफ्याच्या फुलांचा हार घालावा. दुपारी 12 वाजता शंखनाद करून ‘प्रभु श्रीरामचंद्र की जय !’ असा जयघोष करावा आणि त्यानंतर श्रीरामाचा पाळणा लावावा. त्यानंतर आरती करावी. नैवेद्याला सुंठवडा (सुंठेचे आणि साखरेचे एकत्रित मिश्रण) ठेवावा. त्यानंतर तो सर्वांना प्रसाद म्हणून वाटावा.

6. उत्सव साजरा करण्याची पद्धत : कित्येक राममंदिरांतून चैत्र शुद्ध प्रतिपदेपासून नऊ दिवस हा उत्सव चालतो. रामायणाचे पारायण, कथाकीर्तन आणि राममूर्तीला विविध शृंगार, अशा प्रकारे हा उत्सव साजरा होत असतो. नवमीच्या दिवशी दुपारी रामजन्माचे कीर्तन होते. माध्यान्हकाळी, कुंची (बाळाच्या डोक्याला बांधायचे एक वस्त्र. हे वस्त्र पाठीपर्यंत असते.) घातलेला एक नारळ पाळण्यात ठेवून तो पाळणा हालवतात आणि भक्तमंडळी त्यावर गुलाल अन् फुले उधळतात. (काही ठिकाणी नारळाऐवजी श्रीरामाची मूर्ती पाळण्यात ठेवतात.) याप्रसंगी श्रीरामाचा पाळणा (रामजन्माचे गीत) म्हटला जातो.’ त्यानंतर श्रीरामाच्या मूर्तीची पूजा करतात आणि प्रसाद म्हणून सुंठवडा देतात. काही ठिकाणी सुंठवड्याबरोबर महाप्रसादही देतात.

7. रामनवमीला रामराज्य स्थापनेचा संकल्प करूया !

रामराज्यातील प्रजा धर्माचरणी होती; म्हणूनच तिला श्रीरामासारखा सात्त्विक राज्यकर्ता लाभला आणि आदर्श असे रामराज्य उपभोगता आले. तसेच आपणही धर्माचरणी अन् ईश्वराचे भक्त बनलो, तर पूर्वीसारखेच रामराज्य (धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्र) आताही अवतरेल !

नित्य धर्माचरण आणि धर्माधिष्ठित राज्यकारभार यांद्वारे आदर्श राज्यकारभार करणारा मर्यादा पुरुषोत्तम म्हणजे प्रभु श्रीराम ! प्रजेचे जीवन संपन्न करणारे; गुन्हेगारी, भ्रष्टाचार आदींना स्थान नसलेले अशी रामराज्याची ख्याती होती. असे आदर्श राज्य (हिंदु राष्ट्र) स्थापण्याचा निर्धार करूया.

संदर्भ : सनातन संस्थेचा ग्रंथ ‘श्रीराम’

संपर्क क्र.: 9920015949

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.