बारसोलि येथे शिवमंदिर प्राणप्रतिष्ठा आणि कलशारोहण सोहोळा संपन्न
धर्म जपा,आई वडील जपा आणि परमार्थ करा : ह.भ.प. राध्येशाम महाराज गाढे
सिटी बेल • धाटाव • शशिकांत मोरे •
मानवता या शब्दाचा सोप्या शब्दात अर्थ होतो, माणसाची एकता म्हणजे माणुसकी, प्रत्येक माणसाचा मग तो धर्म,जात कोणत्याही देश-शहराचा असो एकच उद्देश असावा म्हणून धर्माला जपा त्याचप्रमाणे मुलांचे आई-वडिलांवर प्रेम असतेच पण ते प्रेम कृतीतूनही व्यक्त व्हायला हवे.मुलांचे प्रेम कृतीतून व्यक्त झाल्यावर आई-वडिलांनाही आनंद होतो म्हणून आई वडिलांना जपा.आणि साधुसंतांनी ज्या मोठ्या अर्थाची सिद्धता किंवा प्राप्ति करून घेतली तो परमार्थ करायला विसरू नका असे एक अभ्यासू कीर्तनकार म्हणून महाराष्ट्रभर ओळख असलेले येवला येथील ह भ.प. राध्येशाम महाराज गाढे यांनी आपल्या मार्गदर्शपर प्रबोधनात बोलताना सांगितले.
रोहा तालुक्यातील धाटाव (बारसोली) येथील शिवमंदीर प्राणप्रतिष्ठापना व कलशारोहण सोहळ्या समयी आयोजित कार्यक्रमात संबोधित करताना ते बोलत होते.राष्ट्रसंत जगद्गुरु तुकोबारायांच्या उभारिला हात, जगीं जाणविली मात,देव बैसले सिंहासनीं । आल्या याचका होय धनी,एकाच्या कैवाडें । उगवे बहुतांचें कोडें,दोहीं ठायीं तुका ।नाहीं पडों देत चुका या चार चरणांच्या निवडलेल्या अभंगावर कीर्तन केले.अभंगातील अनेक दाखले देत संपुर्ण जग मागील दोन वर्ष खूप मोठया महसंकटाला सामोरे गेलय.तुम्ही आम्ही सर्वजण यातून काहीतरी शिकलोय.कुठली वेळ कधी येईल हे सांगता येत नाही, आपल्या जवळची माणसं जवळची राहिली नाहीत, वेळेला दूरची उपयोगी पडली पण घरातल्यांनी सुद्धा पाहिले नाही हे सर्व कारोना पासून शिकलो हे आपल्या वाणीतून सांगत असताना या ठिकाणी रोहिदास पाशिलकर आणि दिनेश पाशिलकर यांनी आपल्या मातोश्रीच्या अपेक्षेप्रमाणे सुसज्ज आणि सुंदर अशा मंदिराची स्थापना केल्याचे कौतुक केले.तर विठोबा रखुमाई आणि ओम् नम शिवायच्या गजरात दोन हातांनी उंचावून टाळ्या वाजविण्याचा येथील श्रोत्यांना मोह मात्र आवरला नसल्याचे पहावयास मिळाले.
याठिकाणी स्वरगंधर्व गायनाचार्य हभप रविदास महाराज जगदाळे व रवी महाराज मरवडे यांनी त्यांना उत्तम साथ दिली तर मृदुंगमनी बाळा महाराज काळे व ज्ञानेश्वर दळवी महाराज यांची कीर्तनाला उत्तम साथ मिळाली.गाढे महाराजांच्या मंत्रमुग्ध कीर्तनाचे अनेक जण भारावून गेल्याचे दिसून आले.
दोन दिवस सुरू असलेल्या या सोहळ्यात मूर्तींची ग्रामप्रदक्षिणा घेत असताना भव्य मिरवणूक काढण्यात आली.याठिकाणी मिरवणुकीत लहान मुले,तरुण वर्ग,ग्रामस्थ व महिला मोठ्या उत्साहाने सहभागी झाल्या होत्या.लेझिम आणि ढोल ताशांच्या गजरात निघालेल्या मिरवणुकीत सारेच तल्लीन झाल्याचे पहावयास मिळाले.
तर या कार्यक्रमासाठी विजयराव मोरे,मधुकर पाटील,विनोद पाशिलकर, अशोक मोरे,सुदर्शन कंपनीचे व्यवस्थापक विवेक गर्ग,माधुरी सणस, विशाल घोरपडे,नीलिकोन कंपनीचे मालक मुकुंदभाई तुराकिया,प्रदीप देशमुख,अनिल भगत,किशोर मोरे, वरसे सरपंच नरेश पाटील,रामा म्हात्रे यांसह विभागातील सामाजिक, राजकीय क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.याठिकाणी नव्याने स्थापन करण्यात आलेल्या शिवमंदिरात दर्शनासाठी भाविकांनी प्रचंड गर्दी केली होती.तर पंचक्रोशीतील सांप्रदाय मंडळी सुद्धा मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Be First to Comment