पोलादपूर लोहारे येथे भारतीय कामगार कर्मचारी महासंघाचे शनिवारी राज्यस्तरीय कामगार-कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीर
30 व्या मेळाव्यात होणार माणुसकीचे दर्शन घडविणाऱ्या व्यवस्थापन सेवाव्रतींचा गौरव
सिटी बेल • पोलादपूर • शैलेश पालकर •
भारतीय कामगार कर्मचारी महासंघाच्या 30 व्या राज्यस्तरीय कामगार कार्यकर्ता शिबीराचे आयोजन येत्या शनिवार, दि.9 एप्रिल 2022 रोजी पोलादपूर तालुक्यातील लोहारे येथे करण्यात आले आहे. या शिबिरामध्ये माणुसकीचे दर्शन घडविणाऱ्या व्यवस्थापन सेवाव्रतींचा गौरव करण्यात येणार असल्याची माहिती भा.का.क.महासंघाचे प्रसिध्दी प्रमुख माधव मंत्री यांनी प्रस्तुत प्रतिनिधीस दिली आहे.
कोरोनाचा भयंकर राक्षस गाडून आपण लढाई जिंकलेली आहे. नुकताच धुमधडाक्यात साजरा झालेला गुढीपाडवा विजयाचा आणि नवनिर्मितीचा प्रतिक मानला जातो. कोरोनाच्या संकटकाळात आपण अनेक माणसे जोडली. काही ठिकाणी उद्ध्वस्त होत चाललेल्या कामगारवर्गाच्या जीवनचक्राला गतीमान करण्यासाठी कंपनी-कारखाना व्यवस्थापनाने उचललेला खारीचा वाटा कामगारांचे-त्यांचे संसार सुरळीत राहण्यासाठी मानवी जीवन समृध्द करुन गेला. या पार्श्वभूमीवर भारतीय कामगार कर्मचारी महासंघाच्या 30 व्या राज्यस्तरीय कामगार कार्यकर्ता शिबीरानिमित्त कनोक्टिंग डॉट्स संकल्पनेअंतर्गत सेवाव्रती व्यवस्थापन आणि व्यक्तींप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात येणार आहे. शिबीरानिमित्त मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील लोहारे येथील बालाजी हॉलिडे होम, ता.पोलादपूर, जिल्हा रायगड येथे विविध मान्यवरांच्या उपास्थिंतीत शनिवार दि. 9 एप्रिल रोजी संध्याकाळी 4 वाजता महासंघ सन्मान सोहळा रंगणार आहे. याच शिबिरामध्ये संध्याकाळी 7 वाजता आणि रविवार दि. 10 एप्रिल रोजी सकाळी साडेनऊ वाजल्यापासून जेष्ठ कामगार नेते व बँकिंग तज्ञ विश्वास उटगी, फायझर लि.चे संचालक माधव सावरगावकर, थरमॅक्स लि.एच.आर.हेड, सुहास गर्दे, एच.आर. सल्लागार मंदार सालकाडे, महाराष्ट्र संघटीत व असंघटीत कामगार सभा कार्याध्यक्ष रत्नाजी देसाई या मान्यवरांची श्रम कायदे, टे्रड युनियनची ऐतिहासिक पार्श्वभूमी, व्यवस्थापन व कामगार संबंध, भविष्य निर्वाह निधी, ई.एस.आय.सी., अर्थव्यवस्थेचा विकास व विनाश या विषयांवर व्याख्याने होणार आहेत. याप्रसंगी भारतीय कामगार कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष ऍड.शशिकांत पवार आणि सरचिटणीस आमदार भाई जगताप हे उपस्थित राहणार आहेत.
कामगार हिताय कामगार सुखाय हे ब्रीद जोपासताना महासंघाने गेल्या 33 वर्षात आपले वेगळेपण सिध्द केलेले आहे. युनियन चालविताना कामगार क्षेत्रात अतुलनीय कामगिरी करणा-या कामगार नेत्यांचा सातत्याने 1 मे रोजी गौरव करुन अग्रेसर राहिलेला आहे. संपूर्ण हिंदुस्थानात युनियन क्षेत्रामध्ये भा. का. क. महासंघाला पहिली आय.एस.ओ. युनियन होण्याचा बहुमान प्राप्त झालेला आहे. आजच्या स्पर्धेच्या युगामध्ये जबाबदारी तुमची-आमची सर्वांची या तत्वाने वाटचाल करायची असून नोकरी व्यवसाय यामध्ये वरच्या पायरीवर जाण्यासाठी नाविन्याची कास धरुन कामगारांमध्ये कर्तृत्वाचे नवे मापदंड निर्माण व्हायला पाहिजे,यासाठी या शिबिराप्रसंगी कामगार व कर्मचारी क्षेत्रातील सहकाऱ्यांनी आवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहन यावेळी माधव मंत्री यांनी केले आहे.
Be First to Comment