प्लस आणि मायनसची चार सूत्रे लक्षात ठेवली तरी जीवनाचे सार्थक होईल — विक्रम देशमुख
सिटी बेल | कर्जत | संजय गायकवाड |
आपण विद्यार्थी दशेत आहात त्यामुळे आपल्या समोर अनेक प्रलोभने येतील परंतु त्यांचा मोह टाळा. जीवनाचे सार्थक होण्यासाठी मायनस – प्लस, प्लस – प्लस, प्लस – मायनस आणि मायनस – मायनस ही चार सूत्रे लक्षात ठेवा. शेवटच्या दोन सूत्रांच्या वाटेलाही जाऊ नका अन्यथा जीवनाला काहीच अर्थ राहणार नाही. मात्र पहिली दोन सूत्रे अंगिकारली तर जीवनाचे सार्थक नक्की होईल. आपण आपले ध्येय्य ठरवा आणि आपापल्या क्षेत्रात आपण उच्च शिखरावर जाण्यासाठी प्रयत्नशील रहा मात्र चांगले नागरिक होण्याकडे पण लक्ष द्या. मतदान करणे आपले कर्तव्य आहे हे लक्षात ठेवून लोकशाही चे जतन करा’ असा महत्वपूर्ण सल्ला तहसीलदार विक्रम देशमुख यांनी येथे विद्यार्थ्यांना दिला. यावेळी त्यांनी प्रश्नोत्तरे घेऊन विद्यार्थ्यांची शाळाच घेतली.
राष्ट्रीय मतदार दिनाचे औचित्य साधून कोंकण ज्ञानपीठ राहुल धारकर फार्मसी महाविद्यालयात विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धांच्या पारितोषिक वितरण समारंभाचे आयोजन सेमिनार हॉल मध्ये करण्यात आले होते. याप्रसंगी तहसीलदार विक्रम देशमुख , नायब तहसीलदार सुधाकर राठोड, परिविक्षाधीन तहसीलदार प्रकाश मेहेत्रे, महाविद्यालयीन विकास समिती सदस्य विजय मांडे, प्राचार्य डॉ. मोहन काळे, मंडल अधिकारी आप्पा राठोड आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
प्राचार्य डॉ. काळे यांनी उपस्थितांचे स्वागत करून प्रास्ताविकात महाविद्यालयाचा चढता आलेख सादर केला. त्यानंतर स्पर्धांमध्ये यशस्वी ठरलेल्या विद्यार्थ्यांना व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. विजय मांडे यांनी, ‘आपण आपल्या क्षेत्रात प्रामाणिक रहा. कोणत्याही प्रसंगाला सामोरे जाताना सत्याची कास सोडू नका. कितीही मोठे झालात तरी आपल्या महाविद्यालयाला विसरू नका. सर्वांचा आदर ठेवा.’ असे सांगितले. सूत्रसंचालन प्रा. मनीषा चौधरी तर आभार प्रदर्शन प्रा. अमोल बोराडे यांनी केले. याप्रसंगी प्रा. निलोफर खान, प्रा. शिल्पा गजबे, प्रा. तनिष्का ठाकरे, रेवती देशपांडे यांच्यासह शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.








Be First to Comment