रायगड पोलीस कल्याण शाखा व माणुसकी प्रतिष्ठान जीतनगर महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने उपक्रम
सिटी बेल | अलिबाग | अमूलकुमार जैन |
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाचे औचित्य साधून रायगड पोलीस आणि माणुसकी प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी भाषा संवर्धन पंधरवडा अंतर्गत
अलिबाग तालुक्यातील थळ ग्रामपंचायत हद्दीतील मौजे वायशेत येथे मराठी शाळेत मराठी अंताक्षरी कार्यक्रम घेण्यात आला.
यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना माणुसकी प्रतिष्ठानचे संस्थापकीय अध्यक्ष डॉ. राजाराम हुलवन यांनी सांगितले की,२७ फेब्रुवारी या तारखेला कविवर्य विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस मराठी भाषा दिन म्हणून उत्साहात साजरा केला जातो… एखादा दिवस साजरा करणे खूप सोपं होत चालंय.. पण आपण खरोखर आपली मातृभाषा टिकावी म्हणून काही प्रयत्न करतोय का? किंवा करायला हवेत तर कोणते प्रयत्न करायला हवेत ? हजारो वर्षापूर्वी लिहिला गेलेला श्रवणबेळगोळ येथे गोमटेश्वराच्या पुतळ्याखाली मराठी भाषेतील पहिला शिलालेख आढळतो. तर मराठीतील आद्यग्रंथ म्हणून `ज्ञानेश्वरीचा’ उल्लेख करतात. मातृभाषेचे महत्त्व ओळखून ज्ञानेश्वरांनी संस्कृत भाषेतील भगवद्गीता प्राकृत भाषेत अनुवादित केली.
मातृभाषेबद्दल असणारा आदरभाव व्यक्त करताना ज्ञानेश्वर म्हणतात, “माझा मऱ्हाटीचि बोलु कवतुके परी अमृतातेही पैजेसी जिंके ॥’ मराठी ही इंडो-युरोपीय भाषाकुलातील एक भाषा आहे. भारतातील प्रमुख २२ भाषांपैकी मराठी एक आहे. महाराष्ट्र आणि गोवा ह्या राज्यांची मराठी ही अधिकृत राजभाषा आहे. मराठी मातृभाषा असणाऱ्या लोकसंख्येनुसार मराठी ही जगातील पंधरावी व भारतातील चौथी भाषा आहे. त्याचप्रमाणे डॉ. राजाराम हुलवान यांनी मुलांना आपली कला कशी जोपासावी व मराठी भाषेचा अभिमान असला पाहिजे याबद्दल मोलाचे मार्गदर्शन केले.

रायगड जिल्हा परिषद मॉडेल शाळा वायशेत येथे रायगड जिल्हा पोलीस व माणुसकी प्रतिष्ठान कार्यकारी अध्यक्ष तानाजी आगलावे यांच्या प्रमुख उपस्थित हा कार्यक्रम घेण्यात आला या कार्यक्रमांमध्ये रायगड जिल्हा परिषद शाळेचे सर्व शिक्षक उपस्थित होते.
मराठी अंताक्षरी कार्यक्रमात सातवी आठवीच्या मुलांचा सहभाग होता कार्यक्रमाचे संयोजन नियोजन रायगड जिल्हा शिक्षक समन्वयक संदीप वारगे यांनी केले होते. कार्यक्रमाच्या वेळी माणुसकी उपाध्यक्ष सतीश कणसे, सचिव विशाल आढाव, सदस्य विपुल जगदाळे, माणुसकी कार्यकारी सदस्य अंकुश पाटील हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गावंड यांनी केले.








Be First to Comment