Press "Enter" to skip to content

‘गुल्हर’ चं म्युझिकल मोशन पोस्टर लाँच

सिटी बेल | मनोरंजन प्रतिनिधी |

काही आशयघन मराठी चित्रपटांनी नेहमीच आपल्या अनोख्या टायटलमुळं लक्ष वेधून घेण्याचं काम केलं आहे. टायटलचं आकर्षण आणि कथानकातील अनोखेपणाच्या बळावर मराठी चित्रपटांनी साता समुद्रापार झेप घेत आंतरराष्ट्रीय पातळीवरील विविध सिनेमहोत्सवांमध्ये मराठीची पताका मानानं फडकवण्याचं काम केलं आहे. अशांपैकीच एक असलेला ‘गुल्हर’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘गुल्हर’ या आगामी चित्रपटाचं मोशन पोस्टर नुकतंच लाँच करण्यात आलं आहे.

शांताराम (आप्पा) मेदगे, शिवाजी भिंताडे, अनुप शिंदे आणि अबिद सय्यद यांनी आयडियल व्हेंचर आणि आर. के. फिल्मच्या बॅनरखाली ‘गुल्हर’ या चित्रपटाची निर्मिती केली आहे. बऱ्याच चित्रपटांसाठी सहाय्यक दिग्दर्शन म्हणून काम केल्यानंतर ‘बाबो’ या चित्रपटाद्वारे दिग्दर्शनाकडे वळलेल्या रमेश चौधरी यांनी ‘गुल्हर’चं दिग्दर्शन केलं आहे. चित्रपटाद्वारे रसिकांसमोर वेगळे पैलू सादर करण्याची हातोटी असणाऱ्या चौधरी यांनी ‘गुल्हर’मध्ये नेमकं काय दाखवण्याचा प्रयत्न केला आहे याची उत्सुकता टायटलमुळं वाढली आहे. नुकत्याच रिलीज झालेल्या मोशन पोस्टरनं ती अधिक ताणण्याचं काम केलं आहे. या चित्रपटाच्या मोशन पोस्टरमध्येही काहीसं अनोखेपण जाणवतं. मोशन पोस्टरची सुरुवात आयडियल व्हेंचर आणि आर. के. फिल्म्स प्रस्तुत या नावापासून होते. उत्सुकता वाढवणाऱ्या पार्श्वसंगीतासह मोशन पोस्टर पुढे सरकतं. त्यानंतर एक कोरा फळा समोर येतो, ज्यावर ‘गोष्ट एका उनाड मनाची’ हि टॅगलाईन आणि त्यामागोमाग ‘गुल्हर’ हे चित्रपटाचं टायटल येतं. अचानक असं काहीतरी घडते की फळा असलेली भिंतच तुटते आणि त्यासोबत त्या फळ्यालाही तडा जातो. नेमकं काय घडतं आणि या चित्रपटात काय पहायला मिळणार याबाबत कुतूहल जागवणारं ‘गुल्हर’चं हे मोशन पोस्टर सध्या सगळीकडे चर्चेचा विषय ठरलं आहे.

कथानकाबाबत एका वाक्यात सांगायचं तर चालीरीतींविरोधात रणशिंग फुंकत प्राणीमात्रांवर दया करायला शिकवणारी गोष्ट ‘गुल्हर’मध्ये पहायला मिळणार आहे. ही गोष्ट गुल्हर नावाच्या एका ११ वर्षांच्या मुलाच्या दृष्टिकोनातून पहायला मिळणार आहे. या चित्रपटात विनायक पोद्दार, रवी काळे, भार्गवी चिरमुले, सुरेश विश्वकर्मा, माधव अभ्यंकर, किशोर चौगुले, रुक्मिणी सुतार, शिवानी बावकर, शिवाजी भिंताडे, अनुप शिंदे, मंजिरी यशवंत आदी कलावंतांच्या भूमिका आहेत. चित्रपटाची कथा मोहन पडवळ यांची असून, पटकथा व संवादलेखन संजय नवगिरे यांनी केलं आहे. कुमार डोंगरे यांनी छायालेखन व संकलन केलं आहे. संगीतकार पद्मनाभ गायकवाड यांनी या चित्रपटातील गीतांना संगीत दिलं असून नृत्य दिग्दर्शन विशाल पाटील यांनी केलं आहे. पार्श्वसंगीत केदार दिवेकर यांचे असून साऊंड डिझाईन निखिल लांजेकर आणि हिमांशू आंबेकर यांनी केलं आहे. शशी भालेराव व सुभाष हांडे यांनी निर्मिती व्यवस्थापक म्हणून काम पाहिलं आहे. हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.