यशस्वी करिअरसाठी ध्येयनिश्चिती, सातत्य, परिश्रम आणि नियोजन आवश्यक : तहसीलदार दिप्ती देसाई
सिटी बेल | पोलादपूर | शैलेश पालकर |
कोणत्याही क्षेत्रात यशस्वी करिअर करण्यासाठी ध्येयनिश्चिती, सातत्य, परिश्रम व नियोजनाची असल्याचे मत पोलादपूरच्या तहसीलदार दिप्ती देसाई यांनी व्यक्त केले. श्रीमती देसाई येथील शिवाई शिक्षण प्रसारक मंडळ, महाड संचलित सुंदरराव मोरे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या करिअर कट्टा उपक्रमाच्या उदघाटन कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून बोलत होत्या.
प्रारंभी महाविद्यालयातील करिअर कट्टा नामफलकाचे उदघाटन देसाई यांच्या हस्ते करण्यात आले. महाराष्ट्र शासनाचा उच्च आणि तंत्रशिक्षण विभाग तसेच महाराष्ट्र तंत्रज्ञान आणि सहाय्यता केंद्र यांच्या विद्यमाने महाविद्यालयीन तरुणांना स्पर्धा परीक्षा, बँकिंग, उद्योजकता आदी विविध क्षेत्रात यशस्वी करिअर करण्यासाठी मार्गदर्शन देणारे माध्यम म्हणून करिअर कट्टा हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
या उपक्रमांतर्गत विविध क्षेत्रातील यशस्वी शासकीय, प्रशासकीय अधिकारी स्पर्धापरीक्षा तज्ञ, यशस्वी उद्योजक, शेतकरी आदींचा विद्यार्थ्यांशी संवाद घडवून आणला जातो. अशाच प्रकारच्या संवादाचे आयोजन करिअर कट्टयाच्या उदघाटनानिमित्त सुंदरराव मोरे महाविद्यालयातील करिअर गाईडन्स व प्लेसमेंट सेल या विभागातर्फे करण्यात आले. करिअर कट्टा उपक्रमाचे समन्वयक प्रा. सुनील गवळी यांनी प्रास्ताविकामध्ये उपक्रमाची माहिती दिली.
पोलादपूर तहसीलदार दिप्ती देसाई यांनी, ग्रामीण भागातील असल्याने कुटुंबाला फारशी शैक्षणिक पार्श्वभूमी नाही, असा कोणत्याही प्रकारचा न्यूनगंड न बाळगता विद्यार्थ्यांनी महाविद्यालयीन जीवनापासूनच एमपीएससी, यूपीएससी तसेच बँकिंग आणि इतर क्षेत्रातील स्पर्धा परीक्षांची माहिती करून त्यांचा नियोजनबध्द अभ्यास केल्यास अनेक प्रकारच्या उत्तम करिअर विषयक संधी त्यांना मिळू शकतील असे मत व्यक्त केले.
शनिवार-रविवार पोलादपूर तहसील कार्यालयाच्या वतीने अशा विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी वायफाययुक्त हॉल उपलब्ध करून देण्याची तहसील कार्यालयाची तयारी असल्याचे सांगून विद्यार्थ्यांनी शासनातर्फे राबवल्या जाणाऱ्या या उपक्रमांचा अधिकाधिक फायदा घ्यावा असे आवाहन तहसिलदार देसाई यांनी केले.
आपल्या अध्यक्षीय मनोगतामध्ये महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दिपक रावेरकर यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षा विषयी असणारी आपली उदासीनता सोडणे अत्यंत आवश्यक असल्याचे सांगून बिहार, उत्तरप्रदेश या मोठया संख्येने आयएएस व आयपीएस अधिकारी निर्माण करणाऱ्या राज्यातील विद्यार्थ्यांप्रमाणे शालेय जीवनापासूनच स्पर्धा परीक्षामधील यशस्वी महाराष्ट्रीय विद्यार्थ्यांचे प्रमाण नक्कीच वाढेल असे मत व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या अखेरीस करिअर कट्टा उपक्रमाचे सहसमन्वयक प्रा. डॉ.सुदर्शन दवणे यांनी सर्वांचे आभार मानले.








Be First to Comment