Press "Enter" to skip to content

मतदानाच्या आकडेवारीनंतर सत्तेचे दावे प्रतिदावे सुरू

निवडणूकपूर्व टळलेल्या महाआघाडीचीच अपरिहार्यता ? पोलादपूर नगरपंचायतीत पहिल्या टप्प्यामध्ये त्रिशंकूची शक्यता !

सिटी बेल | पोलादपूर | शैलेश पालकर |

नगरपंचायत पोलादपूरच्या पहिल्या टप्प्यातील 13 प्रभागांच्या निवडणुकांसाठी मतदान झाल्यानंतर एकूणच मतदानाच्या आकडेवारीनंतर सत्तेचे दावे प्रतिदावे सर्वच गटांकडून तसेच उमेदवारांकडून विजयाचे दावे केले जात आहेत. निवडणुकपूर्व महाआघाडीच्या प्रयत्नांना नगरपंचायतीतील सत्ताधाऱ्यांनी धुडकावल्यानंतर आता 13 प्रभागांच्या मतदानानंतर त्रिशंकू नगरपंचायत होण्याची चिन्हे कायम असून दुसऱ्या टप्प्यातील चार प्रभागांच्या निवडणुकीनंतर त्रिशंकू अवस्था न बदलल्यास निवडणुकप्रक्रिया संपल्यानंतर शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांना पोलादपूर नगरपंचायतीमध्ये महाआघाडीची सत्ता स्थापन करावी लागण्याची लक्षणे स्पष्ट झाली आहेत.

प्रभात 1 मध्ये 471 पैकी मतदारांनी 86 मतदान केल्याने शून्य विरूध्द शिवसेना हे समीकरण दिसण्याचे आवाहन शिवसेना नेत्यांकडून करण्यात आल्याचे चित्र दिसून येणार आहे. शिवसेनेच्या नगराध्यक्षा सुनीता पार्टे यांची बिनविरोध निवड होण्याच्या या प्रभागामध्ये अचानक काँग्रेस पक्षाने मीनल जगताप यांचा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने येथे मतदारांना मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले नव्हते. परिणामी, झालेले मतदान शिवसेनेचे की काँग्रेसचे याबाबत कोणीही दावे केले तरी गुप्त मतदानातून काय बाहेर पडेल, हे सांगणे कोणासही शक्य नाही. या प्रभागात शिवसेनेचे प्राबल्य हे मतदानाची टक्केवारी घटल्यानंतरही कायम राहिल असा दावा केला जात आहे. प्रभाग 3 मध्ये 227 मतदारांपैकी 185 जणांनी केलेल्या मतदानामध्ये काँग्रेस आणि भाजपला मतदान किती आणि शिवसेनेला किती याबाबतचे दावे मतमोजणीनंतरच उघडकीस येणार असले तरी याठिकाणी काँग्रेस सातत्याने काँग्रेसलाच यश मिळाल्याने फारसा फरक पडणार नाही. प्रभाग 4 मध्ये 452 मतदारांपैकी 323 जणांनी मतदान केले असल्याने चुरस वाढली असली तरी काँग्रेस पक्षाच्या बाजूने कौल जाण्याची शक्यता शिवसेनेकडून नवीन चेहऱ्यास संधी दिल्याने निर्माण झाली आहे. प्रभाग 5 मध्ये 292 मतदारांपैकी 197 मतदान केल्याने काँग्रेस आणि शिवसेनेच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक उमेदवारांनीही विजयाचा दावा केला आहे. प्रभाग 6मध्ये एकूण मतदार 245 असून 187 मतदानापैकी भाजपाने 113 मतदानावर दावा सांगितला असून काँग्रेस आणि शिवसेनेच्या उमेदवारांनी देखील मोठया विजयाची अपेक्षा केली आहे. प्रभाग 7 मध्ये 354 एकूण मतदार असून त्यापैकी 285 मतदारांनी हक्क बजावला. याठिकाणी काँग्रेस पक्षाला मोठया अपेक्षा असून शिवसेनेने लावलेल्या ताकदीतून भाजपाकडून होणारी वजाबाकी कितपत प्रभावी ठरेल, यावर सर्व गणित अवलंबून आहे. प्रभाग 9 मध्ये 241 मतदारसंख्या असून 186 मतदारांनी मतदान केले असल्यास भाजपाला किती मतदारांनी मत दिले, याबाबत अंदाज व्यक्त करताना शिवसेनेच्या प्रचारसभेत या प्रभागातून अर्ज मागे घेतला पण विरोधकांनी प्रभाग 1 मधून अर्ज मागे घेतला नसल्याची चर्चा होते. यात आघाडीची मानसिकता कुठेतरी ध्वनित होत आहे. प्रभाग 11 मध्ये एकूण मतदान 294 असून 243 मतदान झाल्याने काँग्रेस आणि शिवसेनेतील थेट लढतीमध्ये भाजपाचे मतदान कोणाला झाले, यावरून विजयाचा कल दिसून येणार आहे. प्रभाग 12 मध्ये 188 मतदारांपैकी 150 मतदान झाले. याठिकाणी तिरंगी लढतीमध्ये थेट लढतीचेच चित्र दिसून येणार असल्याचे शिवसेनेच्या प्रचारसभेमध्ये इंजिन चालणार नसल्याची टीका झाल्याने जाणवत आहे. या प्रभागातून विशिष्ट बहुजन समाजाला उमेदवारी डावलल्याने मतदारांचा कौल बदलण्याची चिन्हे दिसून येत आहे. प्रभाग 13 मध्ये 246 मतदानापैकी 207 मतदान झाल्याने दूरके रिश्तेदारांमध्ये काँटेकी टक्कर झाल्याचे उघड असून अभासे आणि राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवारांनी चुरस वाढविताना शिवसेना आणि भाजपाच्या दोन्ही उमेदवारांना चक्रावून सोडले आहे. प्रभाग 15 मध्ये एकूण मतदान 289 असून 239 मतदारांनी चौरंगी लढतीत भाजप राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेमध्ये लढत होऊन मनसेची मते दुसऱ्या तिसऱ्या क्रमांकाच्या उमेदवारांमधील मतांचा फरक वाढविणारी ठरणार आहेत. प्रभाग 16 मध्ये एकूण मतदार 123 असून त्यापैकी 107 मतदान झाले असून खा.सुनील तटकरे यांच्या शहरातील जाहिर सभेदरम्यान या प्रभागात जोरदार प्रचार झाल्याने त्या प्रचाराचा परिणाम निकालावर होऊन या प्रभागातील हॅटट्रिक मोडेल अथवा कसे हे ठरणार आहे. भाजपाच्या उमेदवाराने याठिकाणी घेतलेली मते निर्णायक ठरतील की फक्त मागील दोन निवडणुकांप्रमाणे तिसऱ्या उमेदवाराने दोन अंकी संख्यादेखील न गाठण्याचा प्रघात कायम राहिल, हे समजून येईल. प्रभाग 17 मध्ये एकूण मतदार 224 असून 197 मतदारांनी हक्क बजाविला आहे. राजकीय नेतृत्वाचा चेहरा कसा, हे या प्रभागावर अवलंबून होते. पालकमंत्री ना.अदिती तटकरे यांनी तसेच आ.गोगावले यांनी या प्रभागामध्ये फार मेहनत घेतली तर खेडचे नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनीदेखील यावेळी मनसे उमेदवारांसाठी घेतलेली मेहनत लक्षणीय होती.

13 प्रभागातील 3 भाजप आणि 2 राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवारांनी विजयाचा दावा केला असल्याने काँग्रेस आणि शिवसेनेला किती जागा मिळतील, या शक्यतेमुळे नगरपंचायत पोलादपूरच्या दुसऱ्या पंचवार्षिक निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यामध्ये त्रिशंकू सत्तेची चिन्हे दिसून येत आहेत. यामुळेच दुसऱ्या टप्प्यातील 4 प्रभागातील निवडणुकीचा परिणाम सत्ता कोणाची हे स्पष्ट करणार असल्याने सत्ता आल्याच्या थाटात काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी तसेच शिवसेनेने हुरळून न जाता उर्वरित चार जागांसाठी अधिक मेहनत घेतल्यासच निर्विवाद सत्ता प्राप्तीचे योग असून सक्षमपणे विरोध करण्यासाठी भाजपाचे नगरसेवक नगरपंचायतीमध्ये पोहोचण्याची शक्यता आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.