सिटी बेल | उरण | विठ्ठल ममताबादे |
रयतेचे राज्य यावे, यासाठी आयुष्य वेचणारे छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजीराजे यांची प्रेरणा घेऊन आई-वडिलांचे ऋण फेडा आणि सामाजिक शैक्षणिक चळवळ उभी करून शिवरायांच्या विचारांची शिवक्रांती घडवून आणूया असे कळकळीचे आवाहन नितळस-पनवेल येथील शिवचरित्रकार विवेक परशुराम भोपी यांनी दिघोडे येथे केले.
शिवरायांप्रमाणेच संभाजी राजांचा इतिहाससुद्धा आदर्शदायी आहे.छत्रपती संभाजीराजे यांचा इतिहास विलासी प्रवृती, रंगेल असा वेगळा मांडला गेला. छत्रपती संभाजीराजे नेमके कसे होते, हे युवा पिढीला कधी कळू शकलेच नाही. त्यामुळे संभाजींचा खरा इतिहास जाणून घ्यायचा असेल, तर औरंगजेबाचा इतिहास वाचा. मुघलांना थरकाप आणणारे असे संभाजीराजे होते.

अतिशय पराक्रमी, शूर असे ते होते. संभाजीराजांनी अवघ्या २४ व्या वर्षी औरंगजेबाला सळो की पळो करून सोडले. हा खरा इतिहास आहे. छत्रपती शिवाजी महाराज, संभाजीराजे यांच्या पराक्रमांची गाथा मांडताना विवेक भोपी यांनी सध्याच्या सामाजिक, शैक्षणिक वाटचालीकडे लक्ष वेधले. शिवाजी महाराज, संभाजीराजे यांचे शौर्य, पराक्रमाचा आलेख मांडताना, आपणही या समाजाचे काही तरी देणं लागतो, ही भावना त्यांनी उपस्थितांच्या मनात रुजवली. मुलांना शिकवा – कलेक्टर, अधिकारी बनवा. थोरांचे विचार आत्मसात करून मुलांना आई-वडिलांची सेवा, आदर करण्याची शिकवण द्या, असे आवाहन त्यांनी केले. मुलांचे हट्ट, लाड पुरवा, पण त्यांच्या मनात वाईट प्रवृतीचा शिरकाव होणार नाही, याची काळजी घ्या.आई-वडिलांचा आदर करा, असे भावनिक आवाहन त्यांनी तरुणाईला केले.
स्वराज्य रिक्षा चालक मालक सामाजिक संस्था दास्तान फाटा, दिघोडे व धुतुम आयोजित संस्थेच्या पाचव्या वर्धापण दिनानिमित्त “शिवचरित्र व्याख्यान” उत्साहपूर्ण वातावरणामध्ये पार पडले.यावेळी संस्थेचे अध्यक्ष अॅड. निग्रेश पाटील, सामाजिक कार्यकर्ते अजित म्हात्रे,रायगड भूषण राजू मुंबईकर,रमण कासकर व आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रांचालन नितेश पंडित यांनी केले.








Be First to Comment