Press "Enter" to skip to content

शेतकऱ्यांना हव्यात आपल्या जमिनी परत

अन्यथा… तहसील कार्यालयासमोर आत्मदहन करणार : माजी आमदार सुरेश लाड यांचा प्रशासनाला इशारा

सिटी बेल | अलिबाग | अमूलकुमार जैन |

खालापूर येथील नंदनपाडा, गोहे, गोठीवली येथील जागा न्युमिलेनियम कंपनीने घेतली होती. या जागेचा मोबदला कंपनी प्रशासनाकडून शेतकऱ्यांना वेळेत पैसे मिळाले नसल्यामुळे शेतकरी आपली जमिन आपल्या नावावर करून मागत आहेत. याबाबीवर विचार करून जमिन शेतकऱ्यांचा नावावर करण्यात याव्या, अन्यथा 23 डिसेंबर रोजी खालापूर येथील तहसील कार्यालयासमोर अन्यायग्रस्त शेतकऱ्यांसोबत आत्मदहन करणार असल्याचा सूचक इशारा राष्ट्रवादी काॅंग्रेसचे जिल्हा अध्यक्ष सुरेश लाड यांनी प्रशासनाला दिला आहे. अलिबाग येथील आयोजित पत्रकार परीषदेत ते बोलत होते.यावेळी अलिबाग तालुकाध्यक्ष दत्ता ढवळे देखील त्यांच्यासोबत उपस्थित होते.

खालापूर तालुक्यातील मौजे नंदनपाडा, गोहे व गोठीवली या गावांमध्ये जमिनी खरेदी करण्याकरीता ६३/१/अ अन्वये जिल्हाधिकारी कार्यालयाकडून परवानगी देण्यात आली आहे. वास्तवीक पाहता ती जमीन औद्योगिकीकरणा करीता देण्याचे निश्चित असल्यामुळे ६३/१/अ या कायद्याचा वापर झालेला आहे. मात्र त्यात नजराणा ऑर्डर जी झालेली आहे त्या शेतकऱ्यांना धानादेश दिले आहेत. मात्र धनादेश बॅकेत पैसे नसल्यामुळे वटलेले नाहीत. उलट न्युमिलेनियम कंपनी आता कोरोना आणि मंदी असल्याचे कारण सांगून ती जमीन इतरांना विकण्यासाठी परवानगी मागत आहे.

६३/१/ अ या कंपनी कायद्याप्रमाणे औद्योगिकीकरणा करिता परवानगी देण्यात आलेली आहे. या जमिनीमधील काही जमिनी या लोकप्रतिनिधींचे नातेवाईक आणि सरकारचे सचिव या पदावर कार्यरत असलेल्या व्यक्तींनी खरेदी केलेल्या आहेत. त्यामुळे शेतकरी वर्ग वारंवार खरेदी ऑर्डर रद्द करण्यांत यावी यासाठी मागणी करत आहे. परंतु याबाबत अद्याप पर्यंत कोणाताही निर्णय झालेला नाही, अशी माहिती सुरेश लाड यांनी पत्रकार परीषदेत दिली. तसेच या साऱ्या घटनेमध्ये शेतकऱ्यांची फार मोठया प्रमाणात फसवणुक होत आहे. कुठल्याही प्रकारचे खरेदीखत न होता 63/1/अ या आदेशाने न्यु मिलेनियम च्या नावावर जमिनी झालेल्या आहेत. परस्पर जमिनी विक्री झाली तर शेतकरी पैशांपासून वंचित राहील व शेतकऱ्यांची यामध्ये फसवणुक होईल म्हणून 63/1/अ चा आदेश रद्द करून धानादेश मुदतीत न वटल्यामुळे त्याजमिनी पुर्ववत शेतकऱ्यांच्या नावावर करावी अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.

त्याकरिता दिनांक १८ ऑक्टोबर रोजी संबंधीत शेतक-यांनी खालापूर तहसिल कार्यालय येथे उपोषण केले होते. व न्यु मिलेनियम इंडिया प्रॉपर्टी डेव्हलपर्स प्रा. लि. यांनी शासनास अदा केलेल्या रक्कम व्यतिरिक्त एकूण उर्वरित रक्कम रू. ३ कोटी ५२ लाख ३ हजार ७१८ रुपये शासन जमा करणे शिल्लक आहे. हे मान्य देखील केले आहे. असे असताना कोणतीही कार्यवाही झाली नाही असे चित्र आहे. त्यामुळे पुन्हा संबंधीत शेतकरी वर्गाने दि. ३० नोव्हेंबर रोजी उपोषणाला सुरवात केल्यावर त्यांना तहसलिदारांनी कार्यवाहीचे लेखी अश्वासन दिले. परंतु त्यानंतर आजपर्यंत कोणतीही कार्यवाही झालेली दिसत नाही. त्यामुळे शेतक-यांवरती झालेल्या अन्यायाविरोधात दिनांक २३ डिसेंबर रोजी खालापूर तहसिल कार्यालयासमोर सकाळी ११ वाजता शेतकरी आत्मदहन करणार आहेत. त्यांच्यावरील होणारा अन्याय आणि कार्यवाहीसाठी होणारी दिरंगाई पाहता मी सुध्दा त्यांच्या सोबत आत्मदहन करणार असल्याचे लाड यांनी सांगितले आहे. तेव्हा आता लाड व शेतकरी यांच्या या आक्रमक भूमिकेनंतर प्रशासनला जाग येणार का ? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.