Press "Enter" to skip to content

शेकडो आदिवासी कुटूंबे विटभट्टी वर काम करण्यासाठी होत आहेत स्थलांतरीत

रोजगारा अभावी आदिवासींचे स्थलांतर, मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न होत आहे गंभीर

सिटी बेल | काशिनाथ जाधव |
पाताळगंगा |

हाताला काम मिळत नसल्याने पोटाची खळगी भरण्यासाठी तालुक्यातील आदिवासी गावपाड्यातून शेकडो कुटूंबे विटभट्टी वर काम करण्यासाठी स्थलांतरीत होत आहेत. त्यामुळे काही वस्त्या ओस पडण्याची चिन्हे दिसत आहेत.

तालुक्यातील आदिवासी कुटूंबे पावसाळ्यात आपला पारंपारीक व्यवसाय शेती, भातशेती करतात. परंतु पावसाळ्यानंतर आठ महिने काम नसल्याने आपल्या कुटूंबाची आर्थिक गुजराण करणे या कुटुंबांना अशक्य होते. त्यामुळे पावसाळा संपल्यानंतर रोजगाराची संधी शोधण्यासाठी त्यांना तालुक्याबाहेर जावे लागते.

शहराकडे बांधकाम व्यवसाय, कारखाने, छोट्या मोठय़ा पाड्यांमध्ये मजुरीसाठी घर गाव सोडुन जावे लागते. परंतु ,या कामापेक्षा बहुतेक कुटूंबे ही वीट व्यवसायीकांकडे जातात. पावसाळ्यात चार ते पाच महिने शेतीसाठी बी-बियाणे, खत व खर्चासाठी विटव्यवसायीकांकडून काही कुटूंबे आधीच पैसे आणत असल्याने बरीच कुटुंबे वर्षानुवर्ष एकाच विटव्यवसायीकाकडे काम करताना दिसतात.

वीटव्यवसायाकडे शेकडो कुटूंबे दरवर्षी बाहेर गावी कामावर जात असल्याने या कुटुंबातील मुलांच्या शिक्षणाची समस्या गंभीर आहे. सात आठ महिने गावापासून दुरवर अशा ठिकाणी रोजगारासाठी जात असल्याने मुलांना लहानपणी शाळेत किंवा आश्रम शाळेत शिक्षण काहीना शक्य होते तर काहींना ते शक्य होत नाही.तसेच पालकही मुलांना शाळेत दाखल करण्याऐवजी लहानपणापासून आपल्या विटाच्या कामात मदतीसाठी घरीच ठेवणे पसंत करतात. त्यांच्या अज्ञानामुळे गरीब मुलांना शिक्षणापासून वंचित राहावे लागते.हीच वस्तुस्थिती सध्या निर्माण झालेली अनेक ठीकाणी पहावयास मिळत आहे.तर काही शाळेय शिक्षण घेवून आपल्या वडीलांना या कामात मदत करीत असल्यांचे चित्र सध्या तालुक्याच्या ठिकाणी पहावयास मिळत आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.