Press "Enter" to skip to content

दोन दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन

पेझारीत १७ व १८ डिसेंबर रोजी श्रीदत्तजयंती उत्सव सोहळा

सिटी बेल | अलिबाग | आदित्य कडू |

सालाबादप्रमाणे यंदाच्यावर्षी देखील भगवान श्रीदत्तात्रेयांचा जन्मदिन दत्तजयंती निमित्त रायगड जिल्हा श्रीपंत सांप्रदायाचे मुख्य ठिकाण असलेल्या अलिबाग तालुक्यातील पेझारी येथील श्रीदत्त मंदिरात शुक्रवार १७ व शनिवार १८ डिसेंबर २०२१ असे दोन दिवस ५६ व्या “श्रीदत्तजयंती” उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती श्रीपंत सांप्रदाय रायगड जिल्हा प्रमुख व श्रीपंत भक्त मंडळ पेझारीचे अध्यक्ष श्री. दिगंबर राणे यांनी दिली आहे.  

शुक्रवार १७ डिसेंबर रोजी सकाळी ७ वाजता प्रेमध्वज पालखी सोहळा श्रीदत्त मंदिरातून निघेल. हा पालखी सोहळा नवजीवन, वरची आळी, खालची आळी, भैरवनाथ, नवीन वसाहत, सरकारी दवाखाना, आंबेपूर, पेझारी नाका मार्गे श्रीदत्त मंदिरासमोर येईल. सायंकाळी ७ वाजता श्रीदत्त मंदिरासमोर शिवाय नमः ॐ व दत्तगुरू जय दत्तगुरू या गजरात प्रेमध्वजारोहण होईल. शनिवार १८ डिसेंबर रोजी पहाटे ५ वाजता श्रींची पूजा व अभिषेक, पहाटे ५.३० वाजता श्री दत्तात्रेय सहस्रनामावली, सकाळी ७ वाजता प्रेमध्वज पालखी सोहळ्याचे प्रस्थान हा पालखी सोहळा श्रीदत्त मंदिरातून निघून पाटील आळी, आस्तान आळी, ढोलपाडा, गणपती मंदिर दिवलांग,  हनुमान मंदिर मार्गे श्रीदत्त मंदिरात परत येईल. दुपारी १ वाजता महाप्रसाद, सायंकाळी ५.३० ते ७.०० या वेळेत “श्रीदत्त जन्मोत्सव” मुख्य सोहळा,  सायंकाळी ७ वाजता प्रेमळ सुनंदाताई राणे महिला मंडळ पेझारी यांचे भजन, रात्री ८.३० वाजता श्रीपंत महाराज बाळेकुंद्री यांच्या श्रीदत्त प्रेमलहरी या भजनगाथेतील पदांवर टिपरी नृत्याचा कार्यक्रम होईल व रात्री १० वाजता आरती अवधूताने श्रीदत्त जयंती उत्सवाची सांगता होईल.

शनिवार १८ डिसेंबर रोजी श्रीदत्त जयंती उत्सवाच्या निमित्ताने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. या महाप्रसादाचा लाभ सर्व भाविक भक्तांना घेता यावा यासाठी महाप्रसाद वाटपाचे शिस्तबद्ध असे नियोजन करण्यात येणार आहे. या दत्तजयंती उत्सवाच्या निमित्ताने २०२२ या नवीन वर्षाची श्रीअवधूत दिनदर्शिका भाविकांसाठी उपलब्ध करण्यात येणार आहे. तसेच शुक्रवार १७ डिसेंबर रोजी पेझारी येथील श्रीदत्त मंदिरासमोर सायंकाळी होणाऱ्या प्रेमध्वजारोहणाचे व शनिवार १८ डिसेंबर रोजी सायंकाळी संपन्न होणाऱ्या श्रीदत्त जन्मोत्सवाचे www.facebook.com/shripantmandir.pezari या फेसबुक पेजवरून थेट प्रक्षेपण करण्यात येणार असल्याची माहिती श्रीपंत भक्त मंडळाने दिली आहे. तरी सर्व भाविक, भक्त व गुरूबंधू भगिनींनी कोरोनाविषयक सुरक्षा नियमांचे पालन करून श्रीदत्त जयंती उत्सवाचा आनंद लुटावा असे उत्सव समिती, श्रीपंत भक्त मंडळ पेझारी ता. अलिबाग यांनी सांगितले आहे. 

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.