संस्थेच्या माध्यमातून बौद्ध संस्कृतीची विचारधारा सर्वत्र पोहचवा — भीमराव आंबेडकर
सिटी बेल | पेण | वार्ताहर |
भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून संपूर्ण भारतभर धम्म परिषदेचे आयोजन होत असताना समाजाने धम्माचा प्रचार आणि प्रसार करणे गरजेचे असल्याने येणाऱ्या काळात आपण अधिक बौद्ध संस्कृतीची विचारधारा सर्वत्र पोहचविण्याचे काम करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन भारतीय बौद्ध महासभेचे कार्याध्यक्ष तथा डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू भीमराव आंबेडकर यांनी पेण वाशी येथे केले.
भारतीय बौद्ध महासभा पेण तालुक्याच्या वतीने नुकतेच वाशी येथे एक दिवसीय धम्म परिषदेचे आयोजन तालुकाध्यक्ष चंद्रकांत सोनावणे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले होते.
या धम्मपरिषदेला बौद्ध महासभेचे प्रदेशाध्यक्ष भिकाजी कांबळे, समता सैनिक दलाचे प्रमुख अनंत गायकवाड, कोषाध्यक्ष विजय कांबळे, प्रचार व पर्यटन सचिव अशोक केदारे, विभागीय सचिव विजय जाधव, रायगड जिल्हा अध्यक्षा संपदा चव्हाण, सरचिटणीस विजय गायकवाड, कोषाध्यक्ष मारुती शिंदे, पेण तालुकाध्यक्ष चंद्रकांत सोनावणे यांच्यासह जिल्ह्यातील असंख्य कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना भीमराव आंबेडकर म्हणाले की, जगाला शांतीचा मार्ग दाखवणाऱ्या तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या विचारांचे आपण पाईक आहोत त्यामुळे त्यांचे विचार समाजाने तेवत ठेवले पाहिजे कोकणातील पेण आणि महाड या शहरातील भुमी या ऐतिहासिक आहेत.कोकणातच डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी क्रांती घडवली त्यामुळे कोकणतल्या पेण मधील धम्म परिषदेला येणाऱ्या काळात गत वैभव प्राप्त होणार असल्याचे त्यांनी शेवटी सांगितले.तर यावेळी तालुकाध्यक्ष चंद्रकांत सोनावणे यांनी सांगितले की या धम्म परिषदेला बाबासाहेबांच्या नातवाचे पाय लागले यामुळे पेण तालुका धन्न झाले असून संस्थेच्या माध्यमातून इतरही धम्म कार्य अधिक जोमाने करण्यात येणार आहे.यावेळी तालुक्यातील ५२ महिला उपासकांचा यशवंत आंबेडकर यांच्या हस्ते यथोचित सन्मान करुन प्रमाणपत्र देण्यात आले.
Be First to Comment