रायगड जिल्ह्यातील रोहिदास ठोंबरे एक “गड” वेडा माणूस
सिटी बेल | रसायनी | राकेश खराडे |
रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यामधील चौकआसरोटी येथील तरुण रोहिदास राघो ठोंबरे हा स्वतः तर ‘गड’ वेडा आहेच पण इतरांना सुद्धा गडकिल्ले फिरून माहिती दाखवतो आणि त्याने सर्वांना ट्रेकिंग आणि गड फिरण्याचे वेड लावलं आहे. रोहिदास ठोंबरे यांनी आतापर्यंत १०० हुन अधिक गडकिल्यांना भेटी दिल्या आहेत.
गडकिल्ले ही आपली अस्मिता आहे हे ओळखून रोहिदास ठोंबरे यांनी गुरुवार दि.११ नोव्हेंबर २०२१ ते रविवार दि.१४ नोव्हेंबर २०२१,अशा चार दिवसांची गडकोट अभ्यास मोहीम नुकतीच पार पाडली.
दि.११ रोजी ठाणे जिल्ह्यातील अत्यंत थरारक,सह्याद्रीची लांबच लांब रांग, कराल कातळसुळके गगनाला भिडलेले आहेत असा अभेद्य सुमारे २१३७ फूट उंच गोरखगड सर केला.तर दुसऱ्या दिवशी पुणे जिल्ह्यातील सुमारे ३००० फूट उंच असलेला कोरीगड सर केला तर १३ नोव्हेंबर रोजी पेण तालुक्यातील अत्यंत दुर्गम भागात वसलेला सुमारे ८५० फूट असलेला अवघड दोन कातळटप्पा असलेला सांकशी किल्ला अभ्यासला तर शेवटी १४ नोव्हेंबर रोजी २५०० फूट उंच असलेल्या किल्ले कर्नाळा. कर्नाळा किल्ले या ठिकाणी आपल्या सलग चार दिवस गडकोट अभ्यास मोहिमेची सांगता केली.
ही अभ्यास मोहीम त्यांनी आपल्या वैकुंठवासी आईवडील यांना अर्पण केली.या चार दिवसांत समुद्र सपाटीपासून सुमारे ८४८७ फूट दुर्ग चढाई केली.या मोहिमेत गोरखगडला आकाश गोडीवले,प्रसाद जाधव,रोशन ठोंबरे व जितेंद्र कदम यांनी सोबत दिली तर कोरीगड ला राजेश मांडे तर सांकशी ला शंतनू पंदेकर आणि कर्नाळा किल्ल्यावर प्रशांत शेलार हा दुर्गसेवक सोबत होता.

रोहिदास ठोंबरे हे व्यवसायाने शिक्षक आहेत. गेली १९ वर्षे खालापूर तालुक्यातील रोहिदास कोचिंग क्लासेस चे संचालक म्हणून ते विद्यार्थ्यांना शिकवत आहेत.तसेच ते शिवकार्य ट्रेकर्स या दुर्गसंवर्धन संस्थेचे संस्थापक असून सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान या दुर्गसंवर्धन संस्थेचे सदस्य आहेत. याशिवाय ते पत्रकार व लेखक आहेत. आपल्या अत्यंत व्यस्त वेळेतून सुद्धा ते गडकोट अभ्यास मोहीम करीत आले आहेत.आपल्या सर्वोत्तम लेखणीच्या माध्यमातून व आपल्या रोहिदास ठोंबरे या यूट्यूब चॅनेल च्या माध्यमातून तसेच फेसबुक, इन्स्टाग्राम,व्हाट्स अप यासारख्या सोशल मिडीयाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील गडकिल्ले, त्यांचा प्राचीन इतिहास, तेथील जनजीवन,तेथील संस्कृती असे महत्वाचे विषय ते आजपर्यंत मांडत आले आहेत.
या अभ्यास मोहिमेच्या वेळी त्यांचं मत असं की प्रत्येकाने किल्ल्यांना भेटी द्याव्यात. आपला इतिहास समजून घ्यावा. मात्र आजकाल गडकिल्यांवर तरुणाई मोठ्या प्रमाणात येत आहेत. गडकिल्ले यांचे काही पठार आकाराने लहान आहेत त्याकारणे अति उत्साह नको.अशा ठिकाणी जास्त गर्दी नको.आपल्या गर्दी कारणे किल्ल्यांचे नुकसान होणार नाही आणि पर्यावरणाचे समतोलही बिघडणार नाही याची सर्वप्रथम आपण काळजी घेतली पाहिजे.शेकडो वर्षांपूर्वी बांधलेल्या या ऐतिहासिक किल्ल्यांच्या संवर्धनासाठी आपण सर्व पुढे आलो पाहिजेत.ज्या ज्या किल्ल्यांवर जाल त्या त्या किल्ल्यांवर कचरा होणार नाही याची पुरेपूर दक्षता आपण घेतली पाहिजे. तरच येणाऱ्या पुढील पिढीला आपण सांगू शकतो गडकिल्ले इतिहास असं ते यावेळी म्हणाले.त्यांच्या अनोख्या उपक्रमाचं संपूर्ण रायगड जिल्ह्यातून सर्वच स्थरातून कौतुक होत आहे.










Be First to Comment