Press "Enter" to skip to content

मधुमेह रुग्णांची डॉक्टरांकडे धाव !!

कोरोनाच्या भीतीमुळे दिवाळी साजरी करण्यापूर्वीच मधुमेह रुग्णांची डॉक्टरांकडे धाव !! वाचा तज्ञ डॉक्टरांचा सल्ला

सिटी बेल | आरोग्य प्रतिनिधी |

मधुमेह व दिवाळीची मैत्री कधीच होऊ शकत नाही कारण मधुमेहींना गोड पदार्थ वर्ज्य आणि दिवाळी म्हणजे बुंदीचे, रव्याचे, बेसनाचे लाडू, गोडाचे सारण भरलेल्या करंज्या व विविध प्रकारच्या मिठाईची रेलचेल १० ते १५ दिवस सुरु असते. दोन वर्षे कोरोना महामारीच्या संकटामुळे धूम धडाक्यात दिवाळी साजरी करणे अनेक नागरिकांना जमले नाही परंतु या वर्षी कोरोनाची साथ आटोक्यात आली असून दिवाळी सणाची धूम आपल्याला बाजारपेठांमध्ये दिसून येत आहे . दरवर्षी दिवाळीनंतर गोडं पदार्थे खाल्ल्यामुळे साखर वाढली अशी तक्रार करणारे नागरिक आता दिवाळी साजरी करताना कोणती काळजी घ्यावी यासाठी डॉक्टरांकडे धाव घेत आहेत. कोरोना महामारीत ” मधुमेह” व “उच्च रक्तदाब” हे दोन आरोग्याचे शत्रू सर्वसामान्य माणसांना कळून चुकले आहेत त्यामुळे या दोन शत्रूंपासून आपले कसे रक्षण होईल याकडे अनेक नागरिकांचा कल आहे.

याविषयी अधिक माहिती देताना नेरुळ येथील शुश्रूषा हार्ट केयर व स्पेशालिटी हॉस्पिटलचे संचालक व हृदय शल्यविशारद डॉ. संजय तारळेकर सांगतात , ” दिवाळीमध्ये घरामध्ये गोड-धोड पदार्थांची रेलचेल सुरु असते अशा वेळी मनावर कितीही कंट्रोल केला तरीही अनेकांचा जिभेवर कंट्रोल राहत नाही व जास्त प्रमाणत गोड पदार्थ खाल्ले जातात. कोरोना महामारीमुळे मधुमेह घराघरात चर्चेला आला व त्याची दहशत आजमितीला दिसत आहे त्यामुळे अनेक मधुमेह असलेले रुग्ण व सामान्य नागरिकांकडून दिवाळीत गोड पदार्थ खाऊन आरोग्य कसे राखावे याबाबत विचारणा होत आहे , अशा सर्वांना माझे एकच सांगणे आहे कि नियमित रक्त शर्करा चेक करणे हे महत्वाचे आहे तसेच दिवाळीत तुम्ही घरात बनविलेले पदार्थ खा परंतु ज्यांना घरी पदार्थ बनविणे शक्य नाही त्यांनी कमी प्रमाणात मिठाई व इतर पदार्थ खावे. मधुमेह हा एक सर्वसामान्य आजार झाला असून त्याला न घाबरता सामोरे गेली पाहिजे.

रोज एक तास चालणे, पोटाला हवे तेवढेच खाणे, नियमित मेडिटेशन करणे, राग न करणे व व्यसनांपासून दूर राहणे अशा साध्या बाबींचे पालन केल्यास आपण मधुमेहाला दूर ठेवू शकतो. चालण्यासारखा उत्तम व्यायाम दुसरा नाही. चालण्याच्या व्यायामानं वजनही कमी राहतं, रक्ताभिसरण उत्तम होतं, विशेष म्हणजे चालण्यामुळे मधुमेहासोबत बऱ्याचदा असलेला रक्तदाब, हृदयविकार, रक्तातील कोलेस्टेरॉल यांच्या नियंत्रणात फायदा होतो.

उत्सवाच्या निमित्तानं औषधांकडे दुर्लक्ष करू नका. नियमितपणे आपली औषधे घ्या त्यामुळे साखर नियंत्रणात राहील. साखरेचा त्रास टाळण्याचा उत्तम मार्ग म्हणजे बदाम, अक्रोड, काजू खाण्यावर भर दिला पाहिजे.”
दिवाळीमध्ये साखर वाढण्याची अनेक कारणे आहेत दिवाळीच्या काळात लोक मोठ्या प्रमाणात गोड, तळलेले आणि भाजलेले पदार्थ खातात. बरेच लोक जास्त प्रमाणात मद्यपान देखील करतात.

मधुमेह असलेल्या नागरिकांना सल्ला देताना कल्याण येथील सिद्धिविनायक मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलचे संचालक डॉ.अभय गायकवाड म्हणाले, ” मधुमेह रूग्ण बाहेरच्याऐवजी घरी बनवलेल्या मिठाई खाऊ शकतात. घरगुती मिठाईत ग्लाइसेमिक इंडेक्स कमी असते, ज्यामुळे आपल्या शरीरात साखरेचे प्रमाण नियंत्रित होते. घरगुती मिठाईत वापरलेले तूप, नारळ, डाळी आणि शेंगदाणे ग्लाइसेमिक इंडेक्स कमी करतात. आपल्यापैकी बर्‍याचजणांना याची माहिती नसते. या सर्व गोष्टी पदार्थांची चवही वाढवतात आणि साखरही नियंत्रणात ठेवतात. मधुमेह रुग्णांनी एकाचवेळी गोड पदार्थ खाऊ नये त्याऐवजी दिवसातून ३ ते ४ वेळा कमी प्रमाणात खावे. दारू व सिगारेटचे सेवन करू नये.”

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.