Press "Enter" to skip to content

मास्क व सॅनिटायझरचा विसर

दिवाळीच्या खरेदीत नागरिकांना मास्क व सॅनिटायझरच्या खरेदीचा पडला विसर : मास्क व सॅनिटायझरची  विक्री ५० टक्क्यांनी झाली कमी

सिटी बेल | आरोग्य प्रतिनिधी |

गेली दोन वर्षे  आपण कोरोनाच्या महामारीविरोधात लढत असून अजूनही कोरोनाचे संकट पूर्णपणे टळले नसून कोरोना पसरू नये म्हणून खबरदारी घेणे गरजेचे आहे. कोरोनाच्या महामारीशी लढण्यामध्ये कोरोना लसीकरणाचा मोठा वाटा असला तरीही मास्क, सॅनिटायझर व सोशल डिस्टंसिंग महत्वाचे आहे परंतु याचा विसर नागरिकांना पडत असल्याचे समोर आले आहे. मुंबई व लगतच्या शहरांमध्ये दिवाळी व इतर सणांच्या निमित्ताने बाजारामध्ये खरेदीसाठी झुंबड उडत असून सोशल डिस्टंसिंगचा विसर पडला आहे. तसेच मास्क व सॅनिटायझरच्या विक्रीमध्ये सुद्धा कमालीची घट आली असून आपण सर्वजण नकळतपणे तिसऱ्या लाटेकडे जात तर नाही ना याचाही विचार झाला पाहिजे.

याविषयी याविषयी अधिक माहिती देताना कल्याण येथील स्टारसिटी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे संचालक व जेष्ठ फिजिशियनव व छातिरोग तज्ञ डॉ. प्रवीण भुजबळ म्हणाले, ” आज कोणत्याही बाजारामध्ये रस्त्यांच्या दुतर्फा गर्दी, त्यात वाहनांची कोंडी तसेच  फेरीवाल्यांची  गर्दीत भर पडत असून सोशल डिस्टंसिंग व मास्कचा विसर नागरिकांना पडला असल्यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढू शकतो. याशिवाय तिसरी लाट रोखताना नागरिकांनाही आपलं कर्तव्य पार पाडावे लागणार आहे. लसीकरण पूर्ण होत नाही तोपर्यंत अनावश्यक घराबाहेर पडणं, मास्क वापरणे हे पाळावं लागेल. काही गोष्टींसाठी सरकारला जबाबदार धरताही येईल, पण त्याचे परिणाम मात्र आपल्या स्वतःला भोगावे लागतात. त्यामुळे नागरिक म्हणून कोरोनाच्या नियमांचे व आपल्या कर्तव्यांचं पालन गरजेचे आहे. नागरिकांनी गथलाथनपणा केला, मास्किंग केलं नाही, सोशल डिस्टन्सिंग केलं नाही. परत अनेक ठिकाणी लोक गर्दी करु लागले तर  तिसरी लाट येण्याचा धोका निर्माण होईल. मास्क व सॅनिटायझर हे अत्यंत गरजेचे असून नागरिकांनी याचा योग्य वापर केला पाहिजे. मोफत आरोग्य शिबिरासोबतच मोफत मास्क व सॅनिटायझर नागरिकांना देण्यासाठी आता पुढाकार घेणे गरजेचे आहे.”

पनवेल यथील मास्कची विक्री करणारे संतोष थोरात सांगतात , ऑक्टोबर महिन्यात मास्कची विक्री खूप कमी झाली असून हॅन्ड सॅनिटायझरचा खप गेल्या दोन महिन्यापासून खूपच कमी झाला आहे . कोरोनाची लस आपण घेतली असून आपण आता कोरोनमुक्त झालो या अविर्भावात नागरिक वागत असल्याचे मत घणसोली येथील त्रिभुवन मेडिकल स्टोरचे आकाश पाटील सांगतात. कोरोना महामारीची दुसरी लाट सुरु असताना अनेक नागरिक आपल्याकडे छोटी सॅनिटायजरची बाटली ठेवत होते, नियमित मास्क बदलत होते परंतु आता याचे प्रमाण खूपच कमी आले आहे. अनेक छोट्या दुकानातून मास्क व सॅनिटायझरची विक्री बंद झालं आहे. कोरोनाच्या सुरुवातीच्या काळात थर्मामीटर, ऑक्सिमीटर अशा वस्तूंच्या मागणीत मोठी वाढ झाली होती. परंतु आता ही मागणी पूर्ण ठप्प झाली आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.