Press "Enter" to skip to content

दसऱ्यानिमित्त आपट्याचे रोपण

वटवृक्ष सामाजिक संस्थेच्यावतीने दसऱ्यानिमित्त उलवे येथे आपट्याच्या वृक्षांचे रोपण

सिटी बेल | उरण | विठ्ठल ममताबादे |

उलवे येथील वटवृक्ष सामाजिक संस्थेच्या वतीने दसरा सणाचे औचित्य साधून आपट्याचे रोपन करण्यात आले. दसरा म्हणजेच विजयादशमी. या दिवशी महाराष्ट्रात सोनं म्हणून आपट्याच्या पानांची देवाण-घेवाण केली जाते. दसऱ्याला सोन्यासारखा मान असणारे, लुटता येणारे सोनं म्हणजे आपट्याची पाने.

आज वाढत्या शहरीकरणामुळे आणि नव्याने होत असलेल्या आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या कामामुळे उलवे परिसरातील हजारोंच्या संख्येने वृक्षतोड झाली. त्यामुळे आपटा ही वनस्पती उलवे परिसरातून दिवसेंदिवस दुर्मिळ होत असल्याने आपट्याचे रक्षण व संवर्धन करण्याच्याने वटवृक्ष सामाजिक संस्थेच्या वतीने दसऱ्यानिमित्त आपट्याचे रोप लागवडीचे उपक्रम हाती घेत उलवे सेक्टर 24 श्री. हनुमान मंदिर तलाव परिसरालगत रोपन करुन दसरा साजरा केला.

सोनेरी पानांचा वनराज आपटा हा खडकाळ माळरानावरही तग धरणारा आदर्श वृक्ष आहे. औषधी गुणधर्म असलेला ह्या बहूगुणी वृक्षावर अनेक पक्ष्यांचा अधिवास असतो. त्यामुळे आपटा पर्यावरण दृष्टीने महत्वाचा वृक्ष आहे.

भारतीय सण आणि निसर्ग यांचे अटूत नाते कायम जपण्यासाठी प्रत्येक सणांना ज्या वृक्षाची आवश्यकता आहे त्या त्या रोपांची लागवड वटवृक्ष सामाजिक संस्थेच्या वतीने होत असते आणि ती दरवर्षी केली जाईल असे मत संस्थेचे अध्यक्ष किरण मढवी यांनी मांडले.

सदर कार्यक्रमास उलवे पोलीस चौकीतील पोलिस नाईक गणेश भालेकर, हवालदार राजेश सुतार आणि वटवृक्ष सामाजिक संस्थेचे धनजंय तांबे, मनोहर चवरकर, गणेश मढवी, अनिल कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.