“कोरोना आज हैं कल नही” संकल्पना राबवून मानसोपचार तज्ञ करीत आहेत उपचार
सिटी बेल लाइव्ह / उमेश भोगले #
कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर भारताच्या अर्थव्यवस्थेवरही गंभीर परिणाम होऊ लागला आहे. गेल्या चार महिन्यात अनेक छोटेमोठे व्यवसाय बंद पडले आहेत. मोठ्या कंपन्यांनी उत्पादन थांबवल्यामुळे नोकर कपात केली असून काही कंपन्यांनी वर्क फ्रॉम होम काम करीत असूनही तेथील कर्मचारी पगाराच्या चिंतेत आहे. अर्थचक्राची गती मंदावल्यामुळे एकूणच अस्वस्थता वाढली असून याचे विपरीत परिणाम होण्याची भीती नवी मुंबई येथील तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटल व रिसर्च सेन्टरतर्फे व्यक्त केली गेली आहे.
याविषयी अधिक माहिती देताना तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटलचे मनोविकार तज्ञ डॉ ओंकार माटे सांगतात , “गेल्या दोन महिन्यात अकारण भीती वाटणे, शांत स्वभाव असलेली व्यक्ती अचानक राग प्रकट करणे, नोकरी गेल्यामुळे अथवा धंदा बंद झाल्यामुळे व्यसनाधीन होणे अशा अनेक तक्रारी वाढल्या आहेत. त्यासोबतच कोरोनाग्रस्त नागरिकांमध्ये मानसिक ताणतणाव वाढल्याचे दिसून आले आहे. महत्वाची बाब म्हणजे भारतामध्ये मानसिक आजाराकडे फारच तुच्छेतेने पाहिले जाते कारण आजही ” असा काय वागतोस – डोकं फिरलंय का ? असे संवाद आपण ऐकतच असतो परंतु आजच्या घडीला मानसिक आजारांना गांभीर्याने घेणे गरजेचं आहे, म्हणुनच आम्ही ” कोरोना आज है कल नही ” ही संकल्पना तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटल व रिसर्च सेन्टरमध्ये राबवीत आहोत. आमच्याकडे उपचारासाठी आलेल्या नागरिकांमध्ये कोरोनाची भीती घालविण्याची उपचार पद्धती आम्ही सुरु केली आहे. यामध्ये कोरोना या आजाराबाबत आम्ही सर्व माहिती त्या पेशंटला देतो जेणेकरून त्याच्या मनातील भीती ही दूर होते ,यासोबतच मनः शांती टिकून राहण्यासाठी योगाचे ऑनलाईन प्रशिक्षण तसेच कुटुंबातील सुसंवाद कसा वाढवावा तसेच समस्येतुन संधी कशी निर्माण करावी यावर मार्गदर्शन करतो. मानसिक ताणतणाव वाढून उदास वाटत असेल किंवा चिंता वाढली असेल, तर् आपले मित्र-मैत्रिणी, शेजारी व नातेवाईक यांच्याशी सतत बोला, घरातील वातावरण आनंदी ठेवा त्यातूनही नैराश्य वाढलंच, तर समुपदेशकाबरोबर बोलावं किंवा मानसोपचारतज्ज्ञाचा सल्ला घेणं गरजेचे आहे.मानसोपचार तज्ज्ञांशी फक्त वेडेच बोलतात’ “मानसोपचारतज्ञाकडे गेल्यास लोक काय म्हणतील” या भीतीवर मात करण्यास आम्ही नागरिकांना मदत करीत आहोत. कोरोना संक्रमणाच्या काळात वाचन/लिखाण व व्यायाम करणं, चित्रं काढणं, संगीत ऐकणं, चांगले चित्रपट- विशेषत: हास्यपट- बघणं आणि कुटुंबातील सदस्यांशी संवाद चालू ठेवणं हे सुरु केलं पाहिजे. अमरिकेसारख्या प्रगत देशात अजूनही फक्त ५० टक्के नागरिक मानसिक आजारांवर उपचार करण्यासाठी पुढे येतात व या तुलनेत भारतामध्ये हे प्रमाण ८ ते १० टक्के आहे. कोरोना या महामारीला सामोरे जायचे असेल तर मानसिक आजारांची चर्चा घराघरात झालीच पाहिजे.”
कोरोनामुळे आर्थिक नुकसान झालेल्या कुटुंबामध्ये मानसिक आजारांची त्सुनामी येण्याची चिंता संपूर्ण जगभर व्यक्त केली जात आहे. गेल्या सहा महिन्यात नोकरी गेल्यामुळे अनेक तरुणांना नैराश्याने ग्रासले आहे व यामुळे अनेक जण व्यसनाच्या आहारी जाण्याची भीती विविध आरोग्य संघटनांनी व्यक्त केल्या आहेत. कोरोनाची लागण झालेल्या ६० टक्के व्यक्तींमध्ये मानसिक आजारांची लागण होऊ शकते असा निष्कर्ष लेन्सेट अहवालामध्ये आढळून आला आहे. कोरोनामुळे आता आर्थिक अस्थिरतेचा खूप मोठा धोका भारताला आहे आणि तो दीर्घ काळ टिकणारा आहे. आर्थिक अस्थिरतेमुळे निर्माण झालेल्या बेरोजगारीच्या चिंतेच्या वातावरणात रक्तदाब, मधुमेह व हृदयरोग, लठ्ठपणा तसेच व्यसनाधीनता यांचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात वाढण्याचा संभव असल्याची माहिती मनोविकार तज्ञ डॉ ओंकार माटे यांनी दिली.
Be First to Comment