Press "Enter" to skip to content

एकत्रित बिलांऐवजी तीन महिन्यांची बिले वेगवेगळी द्या : उरण पत्रकार संघाची मागणी


सिटी बेल लाइव्ह / उरण(वैशाली कडू)

कोरोना कोविड १९ च्या महामारीत पूर्णपणे लॉकडाऊन असल्याने सर्वच ठप्प होते. त्यामुळे सर्वसामान्य जनतेचा कोरोनाच्या भीतीने कामधंदा नसल्याने जीव मेटाकुटीस आला होता. त्यात काही दिवसांपासून लॉकडाऊन शिथिल केल्यामुळे थोडाफार आधार मिळू लागला होता.
लॉकडाऊनमुळे वीज मीटरची रिडींग नेण्यात आली नव्हती. मात्र ग्राहकांना एकदाच जून महिन्यात तीन महिन्यांचे एकत्रित आलेले बिल पाहून एकदम शॉकच बसला आहे. तरी ३ महिन्यांचे एकत्रित आलेल्या बिला ऐवजी ते विभागून ३ महिन्यांची ३ बिले देण्याची मागणी उरण तालुका मराठी पत्रकार संघाने केली आहे.
महावितरणने एकत्रित तीन महिन्याचे बिल देताना त्यात युनिटची बेरीज केली आहे. त्यामुळे युनिटचा स्लॅब ही वाढला आहे. महावितरणने तीन महिन्याचे मिटर रिडींग न घेता आपल्या चुकीचा भुर्दंड नागरिकांच्या माथी मारला आहे. त्यामुळे आपल्याला जास्त युनिटचा दर भरावा लागत आहे. ३ महिन्यांचे एकत्रित बिल देण्या ऐवजी ३ महिन्यांची वेगवेगळी बिले दिली तर नक्कीच बिल रकमेचा आकडा कमी होईल असा विश्वास वाटत आहे.
महावितरणचे दर प्रति युनिटला हे १ ते १०० युनिटला ३.४६, १०१ ते ३०० युनिटला ७.४३, ३०१ ते ५०० युनिटला १०.३२ तर ५०१ ते जास्त युनिट याला ११.७१ असा आकरला जात आहे. त्यामुळे महावितरणने वीज ग्राहकांना सलग ३ महिन्यांचे एकत्रित युनिटचे बिल दिले आहे. त्या ऐवजी ३ महिन्यांचे एकत्रित युनिट विभागून ३ महिन्यांचे वेगवेगळे बिल द्यावेत. त्यानंतर युनिटचा स्लॅब प्रति महिना युनिटच्या कोणत्या दरात बसतो हे पाहून बिल भरण्याची सवलत द्यावी, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, ऊर्जामंत्री नितीन राऊत व उरण वीज अभियंता यांच्याकडे उरण तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष घन:श्याम कडू यांनी केली आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.