Press "Enter" to skip to content

दुर्गवीर प्रतिष्ठानने केली सुरगडावरील बुरुजाकडे जाणाऱ्या पायऱ्या व  बुरुजाची डागडुजी

सुरगडावरील बुरुज व तटबंदीला मिळाली नवसंजीवनी ; दुर्गवीर प्रतिष्ठानची सुरगड संवर्धन व स्वच्छता मोहीम फत्ते


सिटी बेल | रायगड | धम्मशील सावंत |

मुंबई गोवा महामार्गावरील खांब गावाजवळ असलेल्या सुरगड किल्ल्यावर दुर्गवीर प्रतिष्ठानने नुकतीच संवर्धन व स्वच्छता मोहीम राबविली. यावेळी सुरगडावरील बुरुजाकडे जाणाऱ्या पायऱ्या व  बुरुजाची डागडुजी करण्यात आली. तसेच इतर अवशेष व परिसर स्वच्छ करून सुस्थितीत करण्यात आला. या मोहिमेत एकूण 16 शिलेदार सहभागी झाले होते.     

गडावर दोन टीम विभागून काम करण्यात आले , एका टीमने गडावर प्रवेश केल्यावर असलेले मारुतीचे मंदिर आणि गडावरील सदर या परिसरात वाढलेले गवत, झाडी काढून तिथला परिसर साफ केला. तर दुसऱ्या टीमने गडावरील ढालकाठी बुरुजावर जाण्यासाठी काळाच्या ओघात मातीने गाडल्या गेलेल्या पायऱ्या साफ केल्या व त्यांची डागडुजी केली. तसेच बुरुजाला लागून असलेल्या तटबंदीतील दगड एका ठिकाणी निसटून बाहेर आले होते. त्यामुळे तेथे भगदाड पडले होते. परिणामी त्या तटबंदीला भविष्यात धोका निर्माण झाला असता. तो धोका लक्ष्यात घेऊन तेथील पडलेले भगदाड बुजविण्यासाठी ते दगड पुन्हा योग्यरित्या रचून  संभाव्य धोका टाळून त्या तटबंदीला  नवसंजीवनी देण्यात आली. 

या मोहिमेत अर्जुन दळवी, एकनाथ अस्वले, भूषण पाटील, तेजस खेडेकर, प्रज्ञेश कानडे, विनोद घाडीगांवकर, कृपेश बेलकर, सिद्धेश माने, हेमंत निपाने, चेतन शिंदे, हेमंत जामकर, प्रतीक इंदूलकर, प्रथमेश घोने, प्रतीक साटले, अमित हेगिष्टे व गौरव चव्हाण हे शिलेदार सहभागी झाले होते.     

सुरगडचा कायापालट

आपले गडकिल्ले जिवंत राहिले तरच आपला हा इतिहास टिकेल. महाराष्ट्राचा इतिहास गड किल्ल्यांमध्ये लपला आहे. हा इतिहास जगासमोर यावा व आपला हा गौरवशाली ऐतिहासिक ठेवा जपण्यासाठी दुर्गवीर प्रतिष्ठान मागील 13 वर्षांहुन अधिक काळापासून दुर्गसंवर्धन व स्वच्छता मोहीम राबवित आहे. सुरगडावर गेल्या 10 वर्षांपासून दुर्गवीर प्रतिष्ठानने येथील पाण्याच्या टाक्या साफ करणे, झाडे झुडपे तोडणे, पायवाट दुरुस्ती करणे, पायऱ्या सुस्थितीत करणे, तसेच स्थलदर्शक व दिशादर्शक, सुचना व माहितीचे फलक लावणे. वाडे व घरांचे भग्न अवशेष सुस्थितीत करणे. पायथ्याशी असलेल्या आदिवासींना मदत करणे अशी विविध कामे यशस्वीपणे करत आहे. त्यामुळे गडाच्या कामाला सुरुवात केली होती तेव्हाच्या सुरगडात आणि आत्ताच्या सुरगड मध्ये फार बदल झाला आहे. इतकी वर्षे दुर्गवीरने या गडाच्या संपूर्ण कायापालट दुर्गवीरांच्या शिलेदारांच्या मेहनतीने केला आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.