डॉ. दाभोळकरांच्या हत्येच्या तपासाला जाणीवपूर्वक विशिष्ट दिशा दिली जात आहे, याचा तपास व्हायला हवा ! – अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर
सिटी बेल | गोवे-कोलाड | विश्वास निकम |
20 ऑगस्ट 2013 ला डॉ. नरेंद्र दाभोळकर यांची पुणे येथे हत्या झाल्यानंतर पुणे पोलिसांनी खंडेलवाल आणि नागोरी यांना अटक केली होती. नंतर ‘सीबीआय’कडे हा तपास आल्यावर त्यांनी सारंग अकोलकर आणि विनय पवार यांना या प्रकरणी आरोपी ठरवून डॉ. वीरेंद्र तावडे यांना मुख्य सूत्रधार ठरवून अटक केली. प्रत्यक्षदर्शी साक्षीदारही उभे केले. नंतर वर्ष 2018 मध्ये याच ‘सीबीआय’चे तेच अधिकारी म्हणातात, ‘सारंग अकोलकर आणि विनय पवार यांनी नाही, मात्र सचिन अंधुरे आणि शरद कळसकर यांनी दाभोळकरांवर गोळ्या झाडल्या.’ याला तपास म्हणायचा का ? या तपासाच्या विश्वासार्हतेविषयी कोणी बोलत नाही. या प्रकरणातील आरोपींना जामीन मिळत नाही. अजूनही डॉ. तावडे कारागृहात आहेत. या घटनेचा तपास योग्य पद्धतीने झालेला नाही; मात्र दाभोळकरांच्या हत्येच्या तपासाला विशिष्ट दिशा जाणीवपूर्वक दिली जात आहे, याचा तपास व्हायला हवा, अशी मागणी हिंदु विधीज्ञ परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी केली.
हिंदु जनजागृती समिती आयोजित ‘दाभोळकर हत्या प्रकरण : वास्तव आणि विपर्यास !’ या ‘ऑनलाईन’ विशेष संवादात ते बोलत होते. हा कार्यक्रम १२ सहस्रांहून अधिक दर्शकांनी पाहिला.
अधिवक्ता इचलकरंजीकर पुढे म्हणाले, ‘दाभोळकर हत्या प्रकरणात एकूणच तपासयंत्रणांकडून सोयीनुसार सर्व गोष्टी भरकटवत नेल्या जात आहेत. हे न्यायालयात स्पष्ट होईलच. ज्या प्रकारे मडगाव प्रकरणात सनातन संस्थेच्या 6 साधकांची निर्दोष सुटका झाली. त्याप्रमाणे या प्रकरणातही असे होईल, अशी आम्हाला आशा आहे.’
हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र राज्य संघटक श्री. सुनील घनवट म्हणाले, ‘स्वत:ला विवेकवादी म्हणवणार्या दाभोळकरांच्या ट्रस्टमधील अनेक आर्थिक घोटाळे आम्ही पुराव्यानिशी उघड केले आहे. तशीच निरीक्षणे सातारा धर्मादाय आयुक्त कार्यालयातील निरीक्षक, अधीक्षक आणि साहाय्यक आयुक्त यांनी नोंदवली आहेत. इतकेच नव्हे, तर याच संघटनेचे कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांनी ट्रस्टच्या कारभारावर, तसेच तो ट्रस्ट स्वत:च्या नियंत्रणात ठेवू पाहणार्या दाभोळकर कुटुंबियांवर जाहीर आरोप केले, यातून आम्ही केलेले आरोप खरे होते, हेच सिद्ध होते. त्यामुळे ‘अंनिस’च्या गैरकारभाराची सखोल चौकशी झाली पाहिजे. ‘अंनिस’च्या ट्रस्टवर तातडीने प्रशासक नेमला पाहिजे.’
सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ता श्री. चेतन राजहंस म्हणाले, ‘मानवीय नास्तिक मंच’ असे पूर्वीचे नाव असलेल्या संघटनेचे ‘अंधश्रध्दा निर्मूलन समिती’ असे आताचे गोंडस नाव आहे; मात्र त्यांचा खरा प्रचार नास्तिकतेचा चालू आहे. धर्माला अफूची गोळी माननात, ते व्यक्तीश: नास्तिक आहेत. त्यांचा राजकीय विचार हा कम्युनिष्ट आहे. शारीरिक पातळीवर संघर्ष करताना हे नक्षलवादी असतात, तर वैचारिक पातळीवर संघर्ष करताना हे ‘अर्बन नक्षलवादी’ बनतात. म्हणून धर्म न मानणार्या अशा चळवळीपासून आपण दूर रहा, असे आवाहन आम्हाला करावेसे वाटते.’








Be First to Comment