घोटनदी वर नवीन पुल उभारावा : नगरसेवक सुरेश पाटील
सिटी बेल | कळंबोली | विकास पाटील |
पनवेल महानगरपालिका हद्दीतील घोट गाव ते कोयनावेळे , फेज -२ ला जोडणारा घोट नदी वरील पूल अत्यंत धोकादायक स्थितीत आला आहे. दोन ते तीन वेळा या नदीपुलाचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्यात आले असून धोकादायक असल्याचे निष्पन्न झाले आहे. तेव्हा कोणतीही जीवीत हानी होण्यापूर्वी या नदीवर पर्यायी पुल उभारावा अशी मागणी नगरसेवक ज्ञानेश्वर सुरेश पाटील यांनी पालिका आयुक्त गणेश देशमुख यांच़्याकडे लेखी निवेदनाने केली आहे.
कोयनावेळ तळोजा फेस – घोटगाव, तळोजा औद्योगिक वसाहतीला जोडणारा घोट नदीवरील पुल महत्वाचा ठरत आहे. नवी मुंबई, मुंब्रा कडून तळोजा औद्योगिक वसाहतीत येण्यासाठी वेळ व पैसा वाचवणारा हा मार्ग कंपन्याच्या बाबतीत सुकर आहे. घोटगाव, तळोजा वसाहत घोटचाल, नितलस, खेरणे या गावाबरोबर या पुलावरून कल्याण, अंबरनाथ उल्हासनगर, मुरबाडकडे जाण्यासाठी वेळ वाचविणारा मार्ग असल्याने या पुलावर सतत वाहनांची वर्दळ असते.

रिक्षा, दुचाकी, ट्रक आदी वाहनांची मोठय़ा प्रमाणात वाहतूक होत असते. घोट नदीवरील हा पूल प्रत्येक पावसात पाण्याखाली जात असून पुलावरून गाडी वाहून गेल्याची घटना घडली होती त्यात कोणतीही जीवीत हानी झाली नाही. पुलावरून वाहने गेल्याने पुलाला हादरे बसत आहेत. हा पुल कोसळण्याच्या मार्गावर आहे. पावसाळ्यात पुराचा सततचा मारा बसत असल्याने धोकादायक झाला आहे.
घोटगाव व औद्योगिक वसाहतीसाठी जोडणा-या.या महत्वाच्या घोट नदीवरील पुलाच्या मध्यभागी लोखंडी सळ्या बाहेर आल्या आहेत. त्यामुळे पुलावरून नदीचे पाणी दिसू लागले आहे. पुलावर अन्य चार ठिकाणी भेगा पडल्या आहेत. पुल कधी कोसळून जीवीत हानी होईल याचा नेम नाही. पुलांच्या दुरुस्तीबाबत व पर्यायी पुल उभारण्यासाठी युद्ध पातळीवर काम सुरू करण्यात यावे अशी विनंती नगरसेवक ज्ञानेश्वर पाटील यांंनी आयुक्त गणेश देशमुख यांच्याकडे केली आहे. याबाबत पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त व बांधकाम अधिकारी जगताप यांना भ्रमणध्वनीवरून संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.








Be First to Comment