Press "Enter" to skip to content

उरण परिसरातील रस्त्यांची चाळण : फुटलेल्या रस्त्यांना वाली कोण ?

सिटी बेल| उरण | घनःश्याम कडू‌ |

उरण तालुक्यातील बहुतांश रस्त्यांची अक्षरशः चाळण झाल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. या रस्त्यावरून सर्वच राजकीय पक्षाचे नेतेमंडळी, आजी माजी लोकप्रतिनिधी, शासकीय व कंपनीचे अधिकारी वर्ग या रस्त्यावर दररोज येजा करीत असूनही त्यांना याचे कोणतेही सोयरसुतक नसल्याबद्दल आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे. मात्र सर्वसामान्य जनतेचे कंबरडे मोडत त्यांना अनेक व्याधी जडत आहेत. वाहनचालकांची वाहने वारंवार नादुरुस्त होत आहेत. याकडे कोणीतरी लक्ष देऊन हा प्रश्‍न मार्गी लावावा अशी मागणी जोर धरू लागली आहे.

तालुक्यातील विविध विभागांच्या अखत्यारित असलेल्या काही रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडले आहेत. यामुळे रस्त्यातून प्रवास करणे वाहनचालकांसाठी दिवसेंदिवस कठीण होऊन बसले आहे. उरण परिसरातील सिडको, सार्वजनिक बांधकाम विभाग, रायगड जिल्हा परिषद, जेएनपीटी, ओएनजीसी आदी विभागांच्या अखत्यारित काही रस्ते आहेत. पावसामुळे आणि संबंधित विभागाच्या दुर्लक्षामुळे परिसरातील काही रस्त्यांची अक्षरशा चाळण झाली आहे.

सिडकोच्या द्रोणागिरी नोड परिसरातील काही रस्त्यांवर खड्डे पडले आहेत, तर रायगड जिल्हा परिषदेच्या अखत्यारित असलेल्या नवघर फाटा ते नवघर गाव, खोपटा गाव परिसरातील अनेक अंतर्गत रस्त्यांची चाळण झाली आहे. जासई ते न्हावा दरम्यान मोठमोठे खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांत पाणी साचत असल्याने, रस्ता कुठला आणि खड्डा कुठला, यांचा अंदाज वाहनचालकांनाही येत नाही. यामुळे या रस्त्यावरून रात्री-अपरात्री मालाची वाहतूक करणार्‍या वाहनचालकांना अपघाताची भीती वाटू लागली आहे.

उरण चारफाटा ते करंजा रस्त्यावरील आंबेनगर येथील साकवाची दुरवस्था झाली असून तो कधी ही कोसळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्याची वेळीच दुरुस्ती झाली नाहीतर करंजा गावाचा संपर्क तुटण्याची शक्यता आहे. ओएनजीसीच्या अखत्यारित असलेल्या बोकडवीरा फाटा ते उरण ओएनजीसी प्रकल्पादरम्यानच्या रस्त्यावरही मोठमोठे खड्डे पडले आहेत.

चारफाटा येथील रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डेच खड्डे पडले आहेत. जेएनपीटी परिसरातील काही रस्तेही खड्ड्यांनी भरलेले आहेत. या खड्डेमय रस्त्यातून प्रवास करताना वाहनचालकांची कसरत होत आहे. रस्त्याचे काम करणार्‍या ठेकेदारांनी काम केल्यानंतर त्याची दुरुस्ती करण्याची जबाबदारी असतानाही ते याकडे दुर्लक्ष करीत पुन्हा नव्याने खड्डे भरण्याचे काम काढण्याकडे त्यांचा कल असतो.

चाळण झालेल्या रस्त्यावरून येजा करणार्‍या सर्वसामान्य जनतेला कमरेच्या आजाराने ग्रासले आहे. तर वाहन चालकांनाही वाहनांना वारंवार गॅरेजला नेऊन त्यांनाही डॉक्टर अथवा दररोज कमरेला व पायांना बाम लावल्याशिवाय झोप येत नसल्याचे ते सांगतात. तरी या जाचातून कोणीतरी आमची सुटका करावी अशी वाहन चालकांची मागणी जोर धरू लागली आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.