सिटी बेल | कर्जत | संजय गायकवाड |
संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी झालेल्या आंदोलनात हुतात्मा झालेल्यांना कर्जत मधील स्मृती स्तंभाला वंदन करून कर्जत तालुका काँग्रेसच्या वतीने आज क्रांती दिनी आदरांजली वाहिली.
कर्जत शहरातील हुतात्मा स्तंभाला कर्जत तालुका काँग्रेसचे अध्यक्ष मुकेश तुकाराम सुर्वे यांनी माजी नगराध्यक्ष व काँग्रेसचे माजी जिल्हा सरचिटणीस धंनजय चाचड, माजी उपनगराध्यक्ष संजय सुर्वे, अल्पसंख्याक सेल जिल्हा सचिव इस्माईल दिवाण, शहर सरचिटणीस सुभाष मदन, शहर अध्यक्ष इरफान अत्तार, माजी शहराध्यक्ष हेमंत देशमुख, चांदभाई मुजावर समवेत पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली.
यावेळी बोलताना मुकेश सुर्वे यांनी, ‘हुतात्म्यांमुळेच आपण सुखी जीवन जगत आहोत. पूर्वीच्या लोकांनी ज्या खस्ता खाल्ल्या, कष्ट केले हे हल्लीच्या पिढीला माहीत नाही. त्यांना सर्व सुविधा उपलब्ध असल्याने त्यांना त्याची जाणीव नाही. देशासाठी ज्यांनी हौतात्म्य पत्करले त्यांच्या आठवणी व त्यांचे कर्तृत्व नवीन पिढीला सांगणे गरजेचे आहे.’ असे सांगितले.
‘या स्मृती स्तंभाच्या परिसराचे पावित्र्य राखण्यासाठी सर्वांनी एकत्रित येऊन प्रयत्न करणे गरजेचे आहे असे मी मागील वर्षी सूचित केले होते नगरपरिषदेने येथील सुशोभीकरण केल्याने हा परिसर सुंदर झाल्याने आता येथील पावित्र्यही जपले जाईल.’ असे धनंजय चाचड यांनी स्पष्ट केले.








Be First to Comment