Press "Enter" to skip to content

दीपक फर्टिलायझर्स च्या सी एस आर फंडातून पमपा ला ॲम्बुलन्स ची भेट

आमदार बाळाराम पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत लोकार्पण संपन्न

सिटी बेल | पनवेल |

दीपक फर्टिलायझर्स आणि त्यांच्याशी संलग्न असणारी ईशान्य फाउंडेशन यांच्या वतीने बुधवार दिनांक 4 ऑगस्ट रोजी पनवेल महानगरपालिकेला अद्ययावत रुग्णवाहिका भेट देण्यात आली. कोकण शिक्षक मतदार संघाचे महाराष्ट्र विधान परिषदेत प्रतिनिधित्व करणारे आमदार बाळाराम पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत रुग्णवाहिकेचे लोकार्पण संपन्न झाले.

यावेळी दीपक फर्टिलायझर्स ने पुढाकार घेऊन पनवेल महानगरपालिकेला रूग्णवाहिका प्रदान केल्याबद्दल आमदार बाळाराम पाटील यांनी कंपनी व्यवस्थापनाचे आभार मानले. ते म्हणाले की, कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावा मध्ये दुसरी लाट पसरली असताना रुग्णवाहिकांचा प्रचंड तुटवडा जाणवत होता. तज्ञ मंडळींच्या म्हणण्यानुसार या विषाणूची तिसरी लाट देखील येणार आहे. जगभरात त्याचे पडसाद सुद्धा उमटत आहेत. प्रशासन ही लाट थोपविण्यासाठी सर्वार्थाने सज्ज असले तरीदेखील त्यांचे हात मजबूत करण्यासाठी दीपक फर्टिलायझर्स सारख्या कंपन्या पुढे येत असल्याचे निश्चितच कौतुक करावे लागेल.

आयुक्त गणेश देशमुख प्रसिद्धी माध्यमांशी संवाद साधताना म्हणाले की, दीपक फर्टिलायझर्स आणि ईशान्य फाउंडेशन यांनी पनवेल महानगरपालिकेला सीएसआर फंडातून जे सहाय्य केले आहे त्याचे अनुकरण अन्य कंपन्यांनी करणे गरजेचे आहे. सीएसआर फंडातून महानगरपालिकेला सहाय्य करत असताना महानगरपालिकेला नेमकी कोणत्या गोष्टीची उणीव भासत आहे त्याचे अध्ययन करून सहकार्य केल्यास ते जास्त फलदायी ठरेल, जेणेकरून जास्तीत जास्त नागरिकांना आपण सोई-सुविधा उपलब्ध करून देऊ शकू.

दीपक फर्टिलायझर्स च्या एच आर हेड जयश्री काटकर म्हणाल्या की आमच्या कंपनीने यापूर्वी पनवेल तालुक्यातील रुग्णांना उपयोगी पडावी या हेतूने तहसीलदार यांच्याकडे एक रुग्णवाहिका सुपूर्द केली आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेसोबतच महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यांना दीपक फर्टिलायझर्सने रुग्णवाहिका भेट दिल्या आहेत. कोरोना महामारी च्या काळात रुग्णवाहिकांचा जाणवणारा तुटवडा लक्षात घेत आमच्या कंपनीने हे पाऊल उचलले. तसेच दीपक फर्टिलायझर्स च्यारुग्णवाहिकेमध्ये आम्ही मोबाईल क्लिनिक सुरू केले होते. महामारी च्या कालखंडात गावोगावी जाऊन आमच्या फिरत्या दवाखान्यानी विनामूल्य रुग्णसेवा दिली. खाजगी बाह्यरुग्ण विभाग बंद असल्या कारणाने दुर्गम ग्रामीण विभागात आमच्या फिरत्या दवाखाने नागरिकांना अत्यंत मोलाची रुग्णसेवा प्रदान केली. दीपक फर्टिलायझर्स च्या माध्यमातून कोरोना विषाणू प्रतिबंध यासाठी आम्ही कार्यतत्पर होतो व येथून पुढे देखील राहू असा मला विश्वास आहे.

रुग्णवाहिकेच्या लोकार्पण सोहळ्याला आमदार बाळाराम पाटील यांच्यासमवेत आयुक्त गणेश देशमुख, पनवेल महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे, दीपक फर्टिलायझर्स चे प्लांट हेड राधेश्याम सिंग, एच आर हेड जयश्री काटकर, अरुण शिर्के, नगरसेवक गोपाळ भगत, रवींद्र भगत, डॉक्टर सुरेखा मोहकर, शंकर शेठ म्हात्रे, प्रज्योती प्रकाश म्हात्रे,विष्णू जोशी,अरविंद म्हात्रे उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.