सिटी बेल | उरण | सुभाष कडू |
महाडमध्ये झालेल्या प्रलयंकारी महापुरामुळे संकटात सापडलेल्या जनतेला उरण तालुका दैनिक पत्रकार संघाने तेथे जाऊन मदतीचा हात दिला आहे.पूरग्रस्तांना संकट समयी केलेल्या या मदतीने त्यांनी आनंद व्यक्त केला आहे.

कोकणात नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीचा फटका चिपळूण, खेड सह महाड तालुक्यात जबरदस्त बसला आहे. सावित्री,काळ या नद्यांनी महाड शहर व त्याच्या काठावर वसलेल्या अनेक वाड्या वस्त्यांची मोठी हानी केली आहे.पुराचे पाणी सुमारे बारा ते तेरा फुटांपर्यंत वाढल्याने अनेकांचे संसार मातीमोल झाले आहेत.नदी काठच्या वाड्या वस्त्या पुराच्या प्रवाहात वाहून गेल्याने अनेकांना आज उघड्यावर यावे लागले आहे.

या भयानक परिस्थितीचा सामना करताना प्रशासकीय यंत्रणा कोलमडली आहे.पूर ओसरला आणि पूरग्रस्तांचे सुरू झालेली परवड थांबविण्यासाठी अनेक मदतीचे हात पुढे आले आहेत.त्यात आपलाही एक मदतीचा हात असावा या हेतूने उरण तालुका दैनिक पत्रकार संघाचे समाजातील दानशूर व्यक्तींना पुरग्रस्तांसाठी मदत देण्याचे आवाहन केले.त्यास अनेकांनी प्रतिसाद दिला.त्यात पत्रकार संघाच्या सदस्यांनी आपला खारीचा वाटा उचलला.जमा झालेली ही मदत उरण तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष मधुकर ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली महाड बिरवाडी,काळीज येथील लक्ष्मी आदिवासी वाडी,आसन पोई बौद्ध वाडी,आकले गाव तसेच भावे येथिल आदिवासी वस्तीत जाऊन पुरग्रस्तांच्या घराघरात मदतीचे वाटप केले.

सावित्री व काळ नदीने आपले पात्र सोडून प्रवाह बदलल्याने सामान्य जनतेची मोठी हानी केली आहे.त्यांचे झालेले नुकसान खूप मोठे असून त्यांच्या पर्यंत पोहचवलेली मदत अल्पप्रमाणात असल्याचे पुरग्रस्तांची स्थिती पाहिल्यावर कळून येते.अशी भावना पत्रकार संघाचे अध्यक्ष मधुकर ठाकूर यांनी व्यक्त केली.ही मदत पुरग्रस्तांपर्यंत पोहचविण्यासाठी पत्रकार संघाचे अध्यक्ष मधुकर ठाकूर,उपाध्यक्ष सूर्यकांत म्हात्रे,खजिनदार जीवन केणी,सेक्रेटरी राजकुमार भगत,सदस्य अनंत नारंगीकर,महेश भोईर,दत्तात्रेय म्हात्रे,सुभाष कडू, प्रदीप पाटील,जगदीश तांडेल यांनी सहभाग घेतला तर या मदतीचे वाटप उरणचे माजी नगराध्यक्ष परमानंद करंगुटकर व बिरवाडी ग्रामपंचायतचे माजी सदस्य विश्वास गुरव यांच्या हस्ते करण्यात आले.









Be First to Comment