सिटी बेल | कर्जत | संजय गायकवाड |
अतिवृष्टीमुळे कर्जत शहराच्या मध्यभागातून वाहणारी उल्हास नदी मध्यरात्री नंतर उलटली आणि काही कळण्याच्या आतच शहराच्या बाजारपेठ, कर्जत न्यायालय परिसर, इंदिरानगर, कोतवाल नगर मधील म्हाडा कॉलनी, विठ्ठलनगर मधील सत्यम अपार्टमेंट,निलेश अपार्टमेंट,चंदन अपार्टमेंट, मुद्रे येथील शिवम कॉम्लेक्स, नेमिनाथ रेसिडन्सी, सिद्धार्थ नगर या परिसरातील नागरिकांच्या घरात पाणी शिरले, त्यामुळे घरातील वस्तू पाण्यावर तरंगू लागल्या, घरातील धान्य, सोफे, गाद्या भिजल्या नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
दि. 21 जुलै व दि. 22 जुलै रोजी अतिवृष्टीमुळे कर्जत शहरात पाणी घुसले त्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे,कर्जत नगरपरिषदेचे मुख्याधिकारी डॉ. पंकज पाटील यांनी नगरपरिषद हद्दीतील स्वच्छतेची पाहणी केली.

नागरिकांच्या घरात पाणी शिरल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले घरात भिजलेले सामान, वस्तू, साफ केलेला मातीचा गाळ नागरिकांनी घराच्या बाहेर रस्त्याच्या बाजूला जमा करून ठेवला.या पुराच्या पाण्यात नगरपरिषदेच्या कचरा संकलन करणाऱ्या गाड्या पाण्यात बुडाल्या होत्या.त्यामुळे कचरा, भिजलेले सामान कसे संकलन करायचे मोठा प्रश्न होता, मात्र नगरपरिषदेच्या सफाई कामगारांनी मोठ्या जिद्दीने ट्रॅक्टर, सायकल च्या माध्यमातून कचरा उचलून वाहतूक केला.व नगरपरिषद परिसर स्वच्छ करण्याचा प्रयत्न केला.

मुख्याधिकारी डॉ. पंकज पाटील यांनी कर्जत नगरपरिषद हद्दीतील पुरग्रस्त भागाची पाहणी केली.यावेळी त्यांच्या समवेत आरोग्य निरीक्षक सुदाम म्हसे उपस्थित होते.पूरग्रस्त भागाची संपूर्ण साफ सफाई केली असून ब्लिचिंग पावडर तसेच फवारणी केली आहे असे मुख्याधिकारी डॉ.पंकज पाटील यांनी सांगितले.








Be First to Comment