Press "Enter" to skip to content

शेतकरी कामगार पक्षाचा ७४ वा वर्धापनदिन उरणमध्ये साजरा

कोरोना प्रतिबंधामुळे मोजकेच कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत पार पडला सोहळा

युट्युब लाईव्ह च्या माध्यमातून हजारो कार्यकर्त्यांनी घेतला विचार मंथनाचा आनंद

सिटी बेल | उरण | प्रतिनिधी |

शेतकरी कामगार पक्षाचा ७४ वा वर्धापनदिन उरण येथील एस एस पाटील इंटरनॅशनल इंग्लिश स्कूल मध्ये पार पडला. आमदार बाळाराम पाटील या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी उपस्थित होते तर रायगड जिल्हा चिटणीस एड.आस्वाद पाटील प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. परंपरा संघर्षाची, वज्रमूठ निर्धाराची! असा कानमंत्र देत आमदार बाळाराम पाटील यांनी कार्यकर्त्यांच्यात नवचैतन्याची उर्मी जागविली.

विधान सभा निवडणुकीत पनवेल-उरण मध्ये विधानसभा निवडणुकांच्यात उमेदवारांची हार, कर्नाळा बँक प्रकरणामुळे झालेली पक्षाची बदनामी या पार्श्‍वभूमीवर शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांच्यात एक प्रकारची मरगळ दिसून येत होती. परंतु सोमवार दिनांक २ ऑगस्ट रोजी उरणच्या द्रोनागिरी नोड येथे झालेल्या शेतकरी कामगार पक्षाच्या वर्धापनदिन मेळाव्यात ही मरगळ झटकून शेकाप कार्यकर्ते नवचैतन्याच्या ऊर्मीने पुन्हा कामाला लागल्याचे चित्र दिसत होते.

कोरोना कालावधीतील प्रतिबंध ध्यानात घेता केवळ दोनशे कार्यकर्त्यांच्यात सामाजिक अंतर राखून वर्धापन दिन सोहळा पार पाडण्याचे ठरविण्यात आले होते. त्यामुळे निवडक पदाधिकारी आणि मुख्य कार्यकर्ते यांना आमंत्रित करण्यात आले होते. अन्य हजारो कार्यकर्त्यांसाठी युट्युब लाईव्ह च्या माध्यमातून सोहळ्याचे थेट प्रक्षेपण करण्यात आले ज्याचा जवळपास नऊ हजार कार्यकर्त्यांनी घरी बसून आनंद लुटला.

कार्यक्रमाचे सुरुवातीला शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते, ११ वेळा एकाच पक्षाच्या झेंड्यावर एकाच मतदारसंघातून निवडून जाणारे विक्रमवीर भाई गणपतराव देशमुख अर्थात आबासाहेब यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. गणपतराव देशमुख यांच्या निधनाचा दुखवटा असल्यामुळे शेतकरी कामगार पक्षाचा लाल बावटा अर्ध्यावरती उतरवण्यात आला होता. सुरेश पाटील यांनी मागच्या वर्धापन दिनापासून शेकाप च्या उरण आणि पनवेल मतदारसंघातील निधन पावलेल्या कार्यकर्त्यांच्या शोक संदेशाचा प्रस्ताव मांडला. त्यानंतर निलेश म्हात्रे यांनी विविध क्षेत्रात दैदिप्यमान कामगिरी करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव वाचला. उरणचे तालुका चिटणीस मेघनाथ तांडेल यांनी प्रास्ताविकातून अत्यंत आक्रमक पणे आपले विचार मांडले. त्यांच्या भाषणाने कार्यकर्त्यांच्यात आवेश दिसून आला.त्यानंतर पनवेल महानगरपालिका जिल्हा चिटणीस नगरसेवक गणेश कडू, उरण तालुका महिला आघाडी प्रमुख सीमाताई घरत, पनवेल विधानसभा मतदार संघाचे अध्यक्ष काशिनाथ पाटील, पनवेल महानगरपालिका जिल्हा महिला आघाडी प्रमुख अनुराधा ठोकळ यांनी मनोगते व्यक्त केली.

आपले मनोगत व्यक्त करताना आमदार बाळाराम पाटील म्हणाले की, जशी आषाढी एकादशीला पांडुरंगाच्या भेटीची ओढ वारकरी संप्रदायाला लागते आणि ते वारीमध्ये सहभागी होतात तशीच ओढ शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्याला वर्धापनदिन मेळाव्याची लागलेली असते.

कोरोनाविषाणू च्या प्रादुर्भावामुळे मागच्या वर्षी वर्धापन दिन सोहळा होऊ शकला नाही. कार्यकर्त्यांना मरगळ झटकून उर्मी देता यावी या उद्देशाने आम्ही जिल्हा चिटणीस यांच्या परवानगीने पनवेल-उरण विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांकरता वर्धापनदिन सोहळ्याचे मिनी रूप आयोजित करण्याचे ठरविले.

आमदार बाळाराम पाटील पुढे म्हणाले की प्रतिवर्षी वर्धापनदिन मेळाव्यामध्ये आपण अहवाल वाचन करतो परंतु या मेळाव्यात आपण संकल्प वाचन करणार आहोत. आणि हा संकल्प आहे शेतकरी कामगार पक्षाच्या दैदीप्यमान इतिहासाला घरोघरी पोचवण्याचा. विरोधकांच्या भूमिकेवर आक्रमकपणे आसूड ओढताना ते म्हणाले की, विवेक पाटील साहेबांना अटक झाल्यानंतर ज्यांनी फटाके फोडले त्यांना माझे नम्रपणे सांगणे आहे, जर ठेवीदारांचे पैसे परत मिळाल्यानंतर तुम्ही विजयोत्सव साजरा केला असतात तर तुमचे अभिनंदन करण्यात मला जराही कमीपणा वाटला नसता.

नवी मुंबई विमानतळ नामांतराच्या वादाबाबत आपली भूमिका स्पष्ट करताना आमदार बाळाराम पाटील म्हणाले की, धूर्त राजकारण्यांनी कावेबाज पद्धतीने केलेले हे राजकारण आहे. आगामी पंचायत समिती आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुकांना सामोरे जाताना भाजपा वाल्यांकडे कुठलाही मुद्दा शिल्लक राहिला नसल्याकारणाने त्यांनी हा अनाठाई मुद्दा उचलून धरला आहे. आज नवी मुंबई विमानतळाला लोकनेते दी बा पाटील यांचे नाव लाभले तर सगळ्यात जास्त आनंद शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्याला होईल. महाविकास आघाडीची भूमिका ठरवण्यापूर्वी विरोधकांनी पद्धतशीरपणे आंदोलन हायजॅक केले. वास्तविक नवी मुंबई विमानतळाला लोकनेते दि बा पाटील साहेब यांचे नाव देण्याबाबत भारतीय जनता पक्षात एकमत नाही. नागरी उड्डाण मंत्री हरदीपसिंग पुरी हे तर नामांतराचे बाबत दिग्गज नेत्यांची तुलना संताबंता सारख्या काल्पनिक व्यंगचित्रांशी करतात हे दुर्दैव आहे. आज नवी मुंबई विमानतळ साठी नावाचे राजकारण करणाऱ्यांनी त्यांच्या पक्षाची भूमिका जनतेसमोर मांडावी.

आस्वाद पाटील आपल्या भाषणात म्हणाले की अत्यंत सुंदर पद्धतीने आयोजित केलेल्या या सोहळ्यात मला सहभागी होता आले त्याबद्दल उरण शेतकरी कामगार पक्षाच्या तमाम कार्यकर्त्यांना धन्यवाद देतो. आगामी काळात आम्ही तालुकानिहाय दौरे करून पराभवाची कारणमीमांसा करणार आहोत. कुठे युत्या आणि आघाड्या करायच्या याबाबत आम्ही सजग असून कार्यकर्त्यांनी त्या गोष्टी आमच्यावर सोडाव्यात.

वर्धापनदिन मेळाव्याला आमदार बाळाराम पाटील, एड आस्वाद पाटील, पनवेल नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष जे एम म्हात्रे, पनवेल विधानसभा मतदार संघाचे अध्यक्ष काशिनाथ पाटील, पनवेल महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे, रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष योगिता पारधी, उरण तालुका चिटणीस मेघनाथ तांडेल,माजी तालुका चिटणीस नारायण शेठ घरत, मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक राजेंद्र पाटील, पनवेलचे तालुका चिटणीस राजेश केणी, पनवेल कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती डॉक्टर दत्तात्रय नागो पाटील, पनवेल महानगरपालिका जिल्हा चिटणीस नगरसेवक गणेश कडू,पनवेल महानगरपालिका जिल्हा महिला आघाडी प्रमुख अनुराधा ठोकळ, उरण तालुका महिला आघाडी प्रमुख सीमाताई घरत त्यांच्यासह पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, कृषी उत्पन्न बाजार समिती सदस्य, नगरसेवक, सरपंच, उपसरपंच,जिल्हा चिटणीस मंडळातील निवडक सदस्य उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.