Press "Enter" to skip to content

नागोठणे शहर व ग्रामीण विभागात विजवितरणने मांडलाय खेळ

वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे नागोठणेकर नागरिक त्रस्त

सिटी बेल | नागोठणे | महेश पवार |

नागोठणे शहर व ग्रामीण विभागात महावितरणने सध्या खेळ मांडला असून दर अर्ध्या, एक तासाच्या अंतराने तर कधी कधी पाच-पाच मिनिटांनी वीज पुरवठा खंडित होत आहे. याचा नाहक त्रास नागरिकांना सोसावा लागत आहे. विजेच्या लपंडावाने “नागरिक त्रस्त, तर महावितरण मस्त” असे चित्र शहरात पहायला मिळत आहे. वीज खंडित होण्याची कोणतीच ठराविक वेळ नसून रात्री बेरात्री, तर दिवसा कधीही अर्ध्या, एका तासाच्या अंतराने वीज खंडित होत आहे. कधी पाच मिनिटे तर कधी अर्धा किंवा एक-एक दोन-दोन तास वीजपुरवठा खंडित होत आहे.

महावितरणच्या या गलथान कारभाराने जणू काही शहरात अघोषित लोडशेडिंग करण्यात येत असल्याचा प्रत्ययच नागरिकांना येत आहे. वीज खंडित का झाली याची माहिती घेण्यासाठी कार्यालयाशी संपर्क केल्यास वीज खंडित झाल्याबरोबर कार्यालयातील ‘फोन’ अनेकदा बंद असल्याचा अनुभव ग्राहकांना येत आहे. त्यामुळे नागरिक चांगलेच वैतागले आहेत. तर अधिका-यांच्या भ्रमणध्वनीवर संपर्क केला असता नेहमीच कुठे ना कुठे तरी तांत्रिक बिघाड झाल्याचा सूर त्यांच्याकडून ऐकण्यास मिळत आहे.

मागील काही दिवसांपासून तर नागोठणे शहरात विद्युत पुरवठा खंडित होणे, विद्युत दाब अचानक कमी जास्त होणे यासारखे प्रकार नेहमीचेच झाले आहेत. अलिकडच्या काही दिवसापासून नेहमी वीजपुरवठा खंडित होत असतो. चुकून एखादे वेळी वीजपुरवठा सुरू झाला तर तो पुन्हा कधी खंडित होईल याचा अंदाजही नसतो. अचानक विद्युत पुरवठा खंडित होत असल्याने व विद्युत दाब अचानक कमी-जास्त होत असल्याने विजेवर चालणाऱ्या उपकरणात बिघाड होत आहेत.

नागोठण्यात वेळी अवेळी वीजपुरवठा खंडित होत असल्यामुळे याचा विपरित परिणाम विजेवर चालणाऱ्या उपकरणावर होत आहे. यामुळे अनेकांच्या टीव्ही, फ्रिज, कुलर, पंखा, झेराक्स मशीन, कॉम्युटरमध्ये बिघाड होत आहेत. त्यामुळेही नागरिकांना नाहक आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. त्यामुळेच वीज देयकांच्या वसुलीसाठी वीज ग्राहकांच्या मागे तगादा लावणाऱ्या व एक देऊळ जरी दिले तरी संबंधित वीज ग्राहकाचा वीजपुरवठा बंद करण्याची कारवाई करणाऱ्यास आपल्या कर्मचाऱ्यांना भाग पाडणा-या महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.

दरम्यान वीज बील भरायला थोडा जरी उशीर झाल्यास वीज वितरण कंपनीचे वायरमन लगेचच वीज कनेक्शन तोडण्याची धमकी देतात. मग, वीज गायब झाल्यानंतर कंपनीचे अधिकारी व कर्मचारी तोंडे का लपवतात, असा सवाल करीत नागरिक वीज वितरणाच्या सध्या सुरु असलेल्या विजेच्या लपंडावाबद्दल तीव्र संताप व्यक्त करीत आहेत.

यासंदर्भात वीज वितरण कंपनीचे नागोठण्यातील सहाय्यक अभियंता वैभव गायकवाड यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, नागोठणे विभागात लाईट जाते याला अनेक कारणे आहेत. मी गेली सहा वर्षे नागोठणे मध्ये काम करतोय. महापुर असु द्या वा चक्रीवादळ असुद्या. प्रत्येक वेळी पुढे येऊन नागोठणे महावितरणने आपले काम केले आहे. यावेळी नागोठणे विभागात पाऊस पडून पाणी आले तरी सर्व विभागातील लाईट अखंडित चालू होती. वीज वितरणाची नागोठण्यातील सिस्टीम जुनी असल्याने काही ठिकाणी पावसामुळे वायर तुटते, इंन्शुलेटर फुटतात, लाईनचे जम्पर जातात. परंतु लाईनमध्ये अडचण झाल्यावर रात्री-अपरात्री सुद्धा काम करून आम्ही सर्व विद्युत पुरवठा सुरळीत करतो. नागोठणे विभागामध्ये फक्त मी धरून पाच कर्मचारी कायमस्वरूपी आहेत. त्यामुळे कामात थोडा उशीर होतो. तरीपण लवकरात लवकर लाईट सुरु करण्याचा आमचा प्रयत्न असतो. एक-दोन दिवसात अजून बारकाईने पाहणी करून लाईन मध्ये काय अडचणी असतील त्या दूर करण्यात येतील असेही वैभव गायकवाड यांनी सांगितले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.