Press "Enter" to skip to content

तळीये गावाच्या तात्पुरत्या पुनर्वसनासाठी प्रशासनाकडून पर्यायी जागेची झाली पाहणी

सिटी बेल | अलिबाग | अमूलकुमार जैन |

महाड तालुक्यातील तळीये गावात दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेनंतर या गावाचे तात्पुरत्या स्वरूपात पुनर्वसन करण्यासाठी प्रशासनाने कंबर कसली आहे. यासाठी पर्यायी जागा शोधण्याची कार्यवाही सुरू होती.

तळीये गावाजवळच एका 90 गुंठे पर्यायी जागेची प्रशासनाकडून आज पाहणी करण्यात आली. यावेळी जिल्हा परिषद सदस्य मनोज काळीजकर, तहसिलदार दिलीप रायन्नावार, पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता श्री.म्हात्रे, बांधकाम विभागाचे उपअभियंता श्री. देशमुख, तळीये गावचे सरपंच श्री. संपत तांडलेकर, उपसरपंच श्री.मस्के, इतर संबंधित अधिकारी कर्मचारी, आदी उपस्थित होते.

गावाच्या पुनर्वसनासाठी जी जागा पाहण्यात आली आहे, ती जागा तात्पुरत्या पुनर्वसनाकरिता देण्यासाठी “सुरेखा तुळशीराम म्हस्के” या संबंधित जागा मालकिणीने त्यांची “नाहरकत” प्रशासनाला तात्काळ लेखी दिली आहे. त्याचबरोबर या ठिकाणी पाणी, वीज पुरवठा होण्याबाबतची सुविधा उपलब्ध होईल किंवा कसे याबाबतचीही पाहणी पाणीपुरवठा व महावितरणच्या अधिकाऱ्यांनी केलेली आहे. या जागेस त्यांच्याकडूनही संमती देण्यात आली आहे.

या कामाकरिता जिल्हाधिकारी निधी चौधरी व मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.किरण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तहसिलदार दिलीप रायन्नावार हे समन्वयकाची जबाबदारी पार पाडीत आहेत.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.